जय पाटील
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे द्वेष पसरवणे नव्हे… अखेर मुंबई पोलिसांनी उत्तम कामगिरी करून दाखवली…’, ‘अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या नव्हे, ती तर तेव्हाच झाली जेव्हा गौरी लंकेश यांची हत्या झाली…’ रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आणि ट्विटरवर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला. वास्तुरचनाकार अन्वय पाटील यांना आत्महत्येस उद्युक्त केल्याप्रकरणी अर्णब यांना बुधवारी अटक करण्यात आली आणि लगोलग ट्विटरवर हॅशटॅग वेलडन मुंबई पोलीस, हॅशटॅग अर्णब गोस्वामी, हॅशटॅग पुछता हैं भारत असे परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

कोणी सीआयडी मालिकेतील दयाचं गोंधळलेलं छायिचत्र वापरून ‘या सगळ्यात सुशांत सिंग राजपुतचे चाहते पुरते गोंधळून गेले आहेत, नक्की सुशांतसाठी न्याय मागायचा की अर्णबसाठी’ अशा आशयाचं मीम व्हायरल केलं. तर कोणी संजय राऊत पेटीवर कॉफिन डान्सची धून वाजवत आहेत असा व्हिडीओ पोस्ट केला. कोणी अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचं छायाचित्र पोस्ट करून ‘अर्णबसाठी हळहळणाऱ्यांनो यांच्याविषयीही कोणीतरी जराशी सहानुभूती दाखवा,’ असं आवाहन केलं.

गेल्या काही महिन्यांत अर्णबची अनेक वाक्य आणि मीम्स व्हायरल झाली. याच वाक्यांचा वापर करून ट्विटराइट्सनी बुधवारी काही नवी मीम्स तयार केली. ‘मुझे ड्रग दो, मुझे टीआरपी दो, मुझे टेन्शन दो, मुझे बेल दो’ अशा वाक्यांची मीम्स गाजली. कोणी दीपिका पदुकोणच्या ‘इतना मजा क्यू आ रहा है’ या गाण्याची मीम्स केली, तर कोणी, ‘जर तुम्हाला एक पत्रकार आणि सुपारीबाज यांच्यातला फरक कळत नसेल, तर मी काही बोलूच शकत नाही,’ असं उपरोधिक ट्विट केलं. ‘पोलिसांनी अंतर राखावं, असं अर्णब यांना वाटतं, पण रिया चक्रवर्तीला तुम्ही सर्वजण कसे झुंडीने घेरत होतात, हे आठवतं का?’ असा सवाल काही ट्विटराइट्सनी केला. ‘कार्मा हिट्स बॅक! अनेक निर्दोष माणसांना यांनी छळलं आता त्याची फळं भोगत आहेत,’ असं मत काहींनी मांडलं. ‘आज अर्णब यांना फक्त अटक झाली म्हणून एवढा गदारोळ केला जात आहे, गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा हे सर्वजण कुठे होते,’ असा सवालही काहींनी केला आहे.

अर्णब विरोधकांच्या या ट्विट्सना प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या समर्थकांनीही काही हॅशटॅग्ज व्हायरल केले. ‘आय हॅव बीन बिटन, मुझे मारा गया है, पुलिस ने मुझे मारा है…’ असं सांगणाऱ्या अर्णब गोस्वामी यांची चित्रफित व्हायरल झाली आणि त्यांचे मित्र, चाहते यांनी त्यांच्याविषयी सहानुभूती दर्शवणारी आणि मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र सरकारवर टीका करणारी ट्विट्स केली. थोडक्यात दिवसभर ट्विटरवर अर्णब समर्थक आणि विरोधकांत चांगलीच जुंपली होती.