डॉ. नीरज देव

बालपणापासून ऐकत आलो होतो ‘भारत’ नावाची कोणी माता आहे. ती सर्वांचीच अगदी राष्ट्रपिता म्हणविणा-याचीसुद्धा माता आहे. या स्वातंत्र्यदिनी तिला भेटून यावे, तिच्याशी गुजगोष्टी कराव्यात असे मनांत आले पण तिचा पत्ता कोणाकडेच मिळेना. मी विचार केला की, ती विधानभवनात असावी म्हणून मुंबईस पोहोचलो. तेथे कसाबसा प्रवेश मिळविला. तेथे कोणी ‘खूर्ची कशी पळवली ‘ विषयी बोलत होते तर कोणी खूर्चीवर तिघाडी बसली ‘ तिला खाली कसे खेचावे ‘ यावर गप्पा करत होते, क्वचित बेळगांव व पाण्याविषयी कर्नाटक-आंध्राचे काय करावे? यावर खडाजंगी चालली होती. बंगळुरुला पोहोचलो तर तेथे महाराष्ट्राचे कंबरडे मोडायची चर्चा ऐकायला मिळाली. गांधीनगरला गेलो तर तेथे सारा देश कसा गुजरातविरोधी त्याची चर्चा चालू होती. चेन्नईत हिंदी लोक कसे बदमाष याची चर्चा होती तर लखनौत एक साधू राजा होऊन बसला होता. भारतमाता कोठे ही भेटली नाही. नाइलाजाने शेवटी मी दिल्लीला संसदेत पोहोचलो. तेथे लवकर प्रवेश मिळत नव्हता, पण अतिरेक्याचा वेष घेताच चटकन मिळाला. तेथे भारतमाता नव्हती. बारामती, अमेठी, गांधीनगर इ ची इत्थंभूत माहिती तिथे होती पण भारत नावाचा देश आहे याची पुसटशी माहिती दोनचार जण वगळता फारशी कोणालाही नव्हती. तेथे कसला तरी कुजट कुबट वास भरलेला होता; परस्पर द्वेषाचा, व्यक्तीगत स्वार्थाचा, आत्मप्रौढीचा असाच काहीसा होता तो ! मी तेथून कसाबसा बाहेर पडलो.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

मनांत शंकेची पाल चुकचुकली की, सध्या भारतमाता बहुधा तुळजापूर, कोल्हापूर वा वैष्णवदेवी कुठेतरी असावी. मी तुळजापुरी गेलो. तेथील बडव्यांना चुकवित मंदिरात शिरलो. तेथे ना भवानीमाता भेटली ना भारतमाता ! तीच गत झाडून सा-या तीर्थक्षेत्रांवर झाली. गंमत म्हणजे तेथे सुद्धा ते ते देवही आपापल्या जागेवर नव्हते. मात्र सारे बडवे-पुजारी ईमानेइतबारे भक्तांची सेवा घेत होते.

‘इथे नाही तिथे नाही, मग भारतमाता रहाते कुठे ‘? या विचारांत तळमळत मी अंथरुणावर पडलो. तो भर मध्यरात्रीच्या काळोखात माझे पाय आपोआप चालत एका घोर जंगलात मला घेऊन गेले. तेथे एका झाडाखाली एक तेजःपूंज; पण जिचा चेहरा चिंतेने पोळलेला आहे, अशी वृद्ध तरी चिरयुवा वाटणारी स्त्री बसलेली होती. तिला पाहताच मला वाटले हिला नक्कीच भारतमातेचा पत्ता ठाऊक असेल. मी आदराने तिला विचारले, ‘‘आई, भारतमाता कोठे भेटेल? ’’
कुतुहलमिश्रित डोळ्यांनी माझ्याकडे पहात तिने मला विचारले, ‘‘तुला रे तिच्याशी काय काम आहे? ’’
‘‘आईशी भेटायला काम का लागते?’’ माझ्या या प्रश्नाने तिच्या डोळ्यात पाणी तरारले.
ती उत्तरली, ‘‘बेटा खरंय तुझे आईला भेटायला कारण लागत नसते. पण माझ्या मुलांना हेच समजत नाही. बरे एखाद्याला नाही उमजले तर समजू शकते, पण सव्वाशे कोटी पोरांची हीच गत. ’’ तिने सव्वाशे कोटी म्हणताच मी अचूक हेरले; चटकन तिचे पाय धरुन मी तिला म्हणालो, ‘‘आई तूच ना आमची भारतमाता. मग कां लपवित होतीस स्वतःला माझ्यापासून?’’

‘‘काय करु रे बेटा ! उठसुठ कोणी ही येते आग्रहाने मला गाडीतून घेऊन जाते अन् सत्ता मिळाली वा भाषणीप्रेम दाखवून झाले की मला सोडून देते. पार वैतागले मी या गोष्टीला. पूर्वी असे नव्हते रे ! माझी मूलं मला खरच आई म्हणायची अन् मानायची. माझं दुःख त्यांना त्यांचे वाटायचे. अरे माझ्या डोळ्यातून गळणा-या एकेका अश्रूबिंदुसाठी लढाया लढणारे पुत्र माझ्याच पोटी निपजले होते. ’’ तिच्या त्या पुत्रांची याद येऊन ती रोमांचित झाली होती ‘‘आणि आता?…’’ दीर्घ श्वास सोडीत ती मौन झाली.

तिची व्यथा ऐकणे असह्य होऊन मी विषय बदलवित पुसले, ‘‘आई तूं आता स्वतंत्र आहेस मग अशी जंगलांत झाडाखाली कां रहातेस? दिल्लीच्या संसदेत वा मुंबईच्या विधान….’’माझे वाक्य ऐकताच कानावर हात ठेवीत ती किंचाळली,‘‘अरे नाव नको घेऊस तिथं नुसती दुर्गंधी आहे दुर्गंधी !’’

‘‘आई काहीतरीच काय किती टापटीप आहे तिथे एकदम पॉश आहे. ’’ मी
‘‘पॉश नाही वॉश म्हण बेटा वॉश. अरे सगळा देश धुवून स्वित्झर्लंडला नेणारे तिथेच वावरतात. तिथे गेले ना की नाही नाही त्या गोष्टी पहाव्या लागतात. फारच किळसवाणे वाटते रे. चुकून जर तिथे राहिले ना तर मलाच विकायला ते लोक कमी करणार नाहीत किंवा त्या स्वित्झर्लंड की कोणच्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेऊन देतील. ’’ संसदेत राहणा-यांविषयीचे तिचे मत रास्त आहे असे मला वाटले.

‘‘आई आपल्याकडे एवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे कोणीही एक खोली देईल तुला.”

‘‘पोरा तिथे माझ्या आईपणाची पुसटशी जाणीव तरी आहे कां? तेथील मोलकरीणसुद्धा इंग्रजीत बोलते मला कुठचे येणार ते?’’ ती उत्तरली.

‘‘मग तूं एखादी जागा विकत घेऊन कां राहात नाहीस?’’

‘‘जागा घ्यायला पैसा लागतो.’’

‘‘तुला तर कोणतीही बँक कर्ज देईल. तुला ठाऊक नाही किती आकर्षक गृहकर्ज योजना आहेत त्यांच्या, शिवाय ती नवी प्रधानमंत्री योजना ही आहे .’’

‘‘त्यासाठी आयकराचे विवरणपत्र लागते आणि माझ्याकडे तर फक्त ‘व्यय’कराचे विवरण पत्र आहे.’’
‘‘म्हणजे?’’ मी काहीही बोध न होऊन पुसले.
‘‘अरे आईचे खाते नेहमीच व्ययासाठी असते असे माझ्या मुलांना वाटते ’’े ती

‘‘मग आई, एखाद्या मंदिरात का नाही उतरत?’’ मी

‘‘मंदिरात? अरे तो देव तरी देवळांत रहातो कां? देवच देवळात रहात नसेल तर त्याला मंदीर तरी का म्हणावे? देवाचे खरेच आहे म्हणा; दर्शनाचे पैसे, चेंगराचेंगरी, लोटालोटी, बडव्यांची मनमानी पाहण्यापेक्षा तोच त्याच्या देऊळातून पळून गेला….मग तूंच सांग देव नसलेल्या देवळांत मी कां राहू? आणि राहायचे ठरविले तर कपर्दीकही जवळ नसलेल्या मला कोण ठेऊन घेणार?’’ ती.

भरल्या डोळ्यांनी व दाटल्या कंठाने मी पुसले, ‘‘आई मग एखाद्या धर्मशाळेत कां नाही उतरत?’’ आपण काय विचारतो याचेही भान मी हरवले होते.
‘‘धर्मशाळेत गेले होते पण तेथे बिना पैशाचे व तीन दिवसावर कोणी राहू देत नाही. तुला सांगते एकदा एकाने बळजबरीने मला त्याच्या घरी नेले. पण माझ्यावर प्रेम करणा-या त्याच्या घरांत त्याच्या जन्मदात्या आईलाच जागा नव्हती. त्याची आई म्हणजे माझी मुलगीच नां ? जिथे तिची वणवण होते तिथे मी कां राहू? आणि हो, मला सांग स्वातंत्र्यानंतर माझी एवढी मुले बेघर असताना त्यांना वा-यावर सोडून मला घरात तरी कसे राहविले जाईल? खरं सांगू कां, या स्वतंत्र भारतात या भारतमातेला घर नाही, हक्काची जागा नाही.’’ उपरोधाने हसून तिने मलाच पुसले, ‘‘इथे रहा तिथे रहा सांगणारे मला खूप भेटतात पण ‘माझ्या घरी चल’ म्हणणारा कोणीच भेटत नाही. तूं मला याच्या त्याच्या घरी राहण्याचा सल्ला देतोस मग तुझ्याच घरी कां नाही बोलवत?’’
‘मलाच घर नाही’ हे सांगून तिच्या दुःखांत मी भर कां घालावी? आईला सुख देता आले नाही तर दुःख तरी देऊ नये, या उक्तीप्रमाणे मी गप्प बसलो. मला घर नाही याचे दुःख मी कोठल्याकोठे विसरलो. फक्त एवढाच प्रश्न मला सतावतोय की, कोठल्यातरी १५ ऑगस्ट पर्यंत तरी तिला घर मिळेल का ?

(ब्लॉग लेखक डॉ. नीरज देव मनोचिकित्सा तज्ज्ञ व दशग्रंथी सावरकरने सन्मानित आहेत)