News Flash

BLOG : द्रौपदी ते हिंगणघाटची पीडिता… नराधम बदलले विकृती नाही

समाजात असलेली विकृत मानसिकता कधी बदलणार? हा खरा प्रश्न आहे

समीर जावळे

हिंगणघाटच्या पीडितेचा आज मृत्यू झाला. हा मृत्यू म्हणजे हत्याच आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. मात्र या अशा घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. महाभारतापासून सुरु झालेली स्त्रीची विटंबना थांबलेली नाही. घटनांमधली पात्रं बदलली पण त्यांच्यातली विकृत मनोवृत्ती कायम राहिली.

पुराणकाळापासून समाजात बरेच बदल घडले. मात्र पुरुषांची मानसिकता बदलली नाही. स्त्री प्रगत झाली, शिकली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली मात्र तिला बरोबरीचा दर्जा देण्याच्या नुसत्या चर्चा होतात. प्रत्यक्षात तिला आजही कमी लेखलं जातं. गेल्या काही वर्षांमधल्या घटना हेच दर्शवतात.

महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या काही घटना

३० मार्च १९९०- उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील या मुलीला परीक्षा केंद्रातच जाळण्यात आलं. तिच्या प्रियकरानेच तिच्यावर हा हल्ला केला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनेनी महाराष्ट्र हादरला होता.

या घटनेनंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला तो १९९२ मध्ये मुंबई सेंट्रलमध्ये झालेल्या विद्या प्रभुदेसाईच्या हत्येने. तिला भर दिवसा रस्त्यात जाळण्यात आलं. हा हल्लाही एकतर्फी प्रेमातूनच झाला होता.

१९९२ मध्ये मुंबईतील कांदिवली या ठिकाणी असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या नात्यात असलेल्या तरुणानेच अॅसिड फेकलं

१९९८ मध्ये सांगलीत एकतर्फी प्रेमातून अमृता देशपांडेची बस स्थानकाजवळ हत्या करण्यात आली.

२००९ मध्ये डोंबिवलीत प्रेमप्रकरण मुलीच्या घरी सांगणाऱ्या रुपाली पाटीलला दोन शाळकरी मुलांनी जिवंत जाळलं

२०११ मध्ये नांदूरघाट येथील साधना जाधव या तरुणीला घरात शिरुन जाळण्यात आलं.

२०१८ मध्ये वाशिम येथील सावळमध्ये १८ वर्षांच्या तरुणीला जाळून मारण्यात आलं

२०१८ मध्ये ठाण्याजवळच्या मुंब्रा या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून प्राची झाडेची हत्या करण्यात आली

जुलै २०१९ मध्ये अमरावतीत भररस्त्यात तरुणीची हत्या करण्यात आली.

नोव्हेंबर २०१९ मध्ये मुंबईतील तलासरीमध्ये १५ वर्षांच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्यात आला

पुण्यातील नीता हेंद्रे या तरुणीलाही ठार करण्यात आले आधी तिचा गळा आवळण्यात आला, त्यानंतर तिचा गळा चिरुन तिला संपवण्यात आलं.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात जान्हवी तुपे या मुलीवर प्रसन्न पंडित या मुलाने गोळ्या झाडल्या आणि नंतर आत्महत्या केली.

बत्तीस शिराळ्याची आरती जोशी, कागलची मानसी शहा, जळगावची सारिका मुनोत, मनमाडची शोभा तांदळे अशा कितीतरी तरुण मुली नव्वदीच्या दशकात एकतर्फी प्रेमाच्या शिकार झाल्या.

या काही प्रमुख घटनांवर नजर टाकली तर लक्षात येतं की तरुणींवर हल्ले होण्याचं प्रमाण कमी नाही. आजच्या घडीला म्हणजे २१ व्या शतकात जर या गोष्टी घडत असतील तर त्याची एक समाज म्हणून आपल्याला लाज वाटायला हवी. जोपर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत असे हल्ले थांबणार नाहीत. गेल्या आठवड्यात वर्ध्यातील हिंगणघाटच्या तरुणीला भर चौकात जाळण्यात आलं. ४० टक्के भाजलेल्या या तरुणीची सोमवारी प्राणज्योत मालवली. तिचा मृत्यू आत्तापर्यंत झालेल्या या सगळ्या घटनांभोवती एक प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेला आहे. महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य म्हणतो, ते कशामुळे? कोणत्या जोरावर? स्त्रीचा, कोवळ्या वयातल्या मुलींचा असा अपमान राजरोसपणे होतो, ते राज्य ‘पुरोगामी’ कोणत्या अर्थानं आपण म्हणवून घेतोय?

मुलींना, स्त्रियांना आजही अनेकदा शोषणाला बळी पडावं लागतं. बलात्कार, विनयभंग, बालिकांवर होणारे बलात्कार, चॉकलेटच्या आमिषाने होणारे बलात्कार यांच्याही घटना कमी नाहीत. एवढंच काय मुंबई, पुण्यातही असे प्रकार घडतात. अनेकदा बदनामीच्या भीतीने ते समोर येत नाहीत. दिल्लीतलं निर्भया प्रकरण घडलं तेव्हा तिच्या पालकांनी समोर येण्याची हिंमत दाखवली. जी पाहून अनेक मुली, अत्याचारग्रस्त स्त्रिया हिमतीने पुढे आल्या आणि बलात्कार, अत्याचार यांसारखे गुन्हे समोर येऊ लागले. गुन्हे नोंदवण्याची संख्या वाढली काही प्रमाणात शिक्षा होण्याचे प्रकारही वाढले पण त्यान विकृत मनोवृत्तीत तसूभरही फरक पडल्याचं दिसत नाही.

मुली, स्त्रिया आजही सहन करतात

मुलींना आजही कमी लेखलं जातं. वंशाचा दिवा हवा हा आग्रह आजही असतो. त्या जन्माला आल्यापासून त्यांना हेच शिकवलं जातं की ‘मुलगी म्हणजे परक्याचं धन’. ‘तुला दुसऱ्याच्या घरात जायचं आहे.’ ‘तुला सासरी गेल्यावर नावं ठेवतील.’ ‘तुला नवऱ्याचं ऐकायचं आहे’, ‘अंगभर कपडे घाल’, ‘समाज काय म्हणेल?’ ‘लोक काय म्हणतील?’ याची भीती म्हणा किंवा त्याला कोणतंही नाव द्या. संस्कार या गोड नावाखाली हे सगळं मुलीला शिकवलं जातं. पण त्याचवेळी घराघरांमध्ये पुरुषांना, मुलांना स्त्रीचा साधा आदर राखण्याचंही शिकवलं जात नाही. उलट ‘तू काय रडतोस मुलीसारखा?’ ‘ही कामं तुझी नाहीत ही मुलींची आहेत.’ ‘नवऱ्याने बायकोला धाकात ठेवायचं असतं’ या आणि अशा सगळ्या गोष्टी पुरुषांना, मुलांना शिकवल्या जातात किंवा भोवताली ते पाहतात आणि त्यातून आपोआप शिकत जातात. आजही मासिक पाळी आली आहे हे सांगण्याचं, त्याबद्दल खुलेपणाने बोलण्याचं धाडस मुलींमध्ये नाही. सगळं सहन तिलाच करायचं असतं आणि वरुन कुणी हसणार नाही याची काळजीही घ्यायची असते. अशावेळी पुरुषांना, मुलांना त्याकडे सजगपणे पाहण्याचं का शिकवलं जात नाही? ‘तू आणि तुझी बहीण एकच आहात दोघांमध्ये काहीही फरक नाही’ हे घराघरातून का शिकवलं जात नाही? ‘तू रडतोस म्हणजे तुलाही संवेदना आहेत तू व्यक्त होऊ शकतोस’ हे घराघरांमधून कधी शिकवलं जाईल? सीतेला अग्निदिव्य करायला सांगणारा समाज पुरुषालाही अग्निदिव्य करायला लावेल का? या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरीत आहेत. गरज आहे ती मोठ्या मानसिक बदलांची

हिंगणघाट पीडितेचा बळी गेला आहे. आज आणखी एक मुलगी अकारण मृत्यूला सामोरी गेली आहे. ज्या वयात तिने लग्नाची, सुखी संसाराची, करिअरची स्वप्नं पाहिली त्या वयात तिला अन्यायाला सामोरं जावं लागलं आहे. तो सहन करुन मरण नशिबी आलं आहे. ती कुणाची तरी मुलगी होती, बहीण होती. त्यांचा टाहो हा विषण्ण कराणाराच आहे. अशा घटना तोपर्यंत घडतील जोपर्यंत विकृती ठेचली जात नाही. विकृतांना कायद्यानुसार शिक्षा तर व्हायला हवीच. ती होईलही. यात काहीही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र विकृत प्रवृत्ती ठेचणं, ती फोफावू न देणं याची गरज जास्त आहे.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpess.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 5:48 pm

Web Title: special blog on hinganghat girl who dies in hospital scj 81
Next Stories
1 मोदी मंत्रिमंडळात नाही एकही माजी मुख्यमंत्री, मग फडणवीस असतील?
2 मराठी ते हिंदुत्व! राज ठाकरेंच्या मनसेचं काय होणार?
3 मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न: महाविकास आघाडीतील संभाव्य मिठाचा खडा?
Just Now!
X