05 March 2021

News Flash

BLOG : महत्व हात धुण्याचे आणि आरोग्य राखण्याचे !

आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवसानिमित्त खास लेख

महादेव माळी

हात धुणे ही अत्यंत साधी सोपी व रोजच्या जीवनातील नित्याचीच बाब आहे. ही क्रिया सहजगत्या घडणारी पण काळजीपूर्वक न घडता औपचारीकतेचा एक भाग म्हणून सहज केली जाणारी नित्य क्रिया असते हे मात्र खरे. आपणाला होणारे आजारांपैकी ७० टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. वेळच्या वेळी हात स्वच्छ न धुतल्यामुळे, हाताच्या संपर्काने रोगजंतू तोंड ,नाक ,डोळे याचे मार्फत शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे आपण आजारी पडतो. त्यामुळे हात धुण्याची ही क्रिया शास्त्रशुद्ध व्हावी, नित्यनैमित्तिक व्हावी अशी अपेक्षा असते. मात्र तसे समाजात सर्वसामान्य कुटुंबांमध्ये घडत नाही हे खरे आहे आणि त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे याबाबतीतील I E C (संवाद) अगदी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.

आता याबाबतीत सविस्तर पाहू
(1) (I) इन्फॉर्मेशन अर्थात माहिती: जी कृती परिणामकारक व्हावी अशी अपेक्षा आहे त्या कृतीबद्दल त्या घटकाबद्दलची माहिती प्रभावीपणे सांगितली जाणे आवश्यक आहे.
(2) (E) एज्युकेशन अर्थात शिक्षण : हात धुण्याची क्रिया शास्त्रशुद्ध व परिणामकारक होण्यासाठीचे शास्त्रीय ज्ञान साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे.
(3) (C) कम्युनिकेशन अर्थात संवाद: संवाद म्हणजे विचारांचे आचारांचेही आदान-प्रदान. आपल्या मतांची देवाण-घेवाण होय.
एका व्यक्ती द्वारे इतर व्यक्तींकडे अथवा व्यक्ती समूहाकडे माहितीचे प्रक्षेपण म्हणजे संवाद होय तसेच संदेशाद्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद होय. मानवी जीवनामध्ये संवादाला फार महत्वाचे स्थान आहे त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होत असते एखाद्या व्यक्तीवर वा समूहावर प्रभाव निर्माण करता येतो. तसेच आपणास अपेक्षित बदल घडविता येतो. संवाद साधण्याची क्रिया ही निरंतर होत असते. शब्दांद्वारे तसेच नि:शब्द ही.. आपल्या डोळ्यांतून, देहबोलीतून, हावभावातून व प्रत्यक्ष कृतीमधून संवाद घडतो व त्याचा खोलवर परिणामही होतो. त्याचा अपेक्षित परिणाम पहायला मिळतो.

हात धुण्याची अपेक्षित कृती सातत्याने व्हावी अशी अपेक्षा असेल तर त्याबाबत तिचे दृढीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

हात शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे धुवावेत हे माहित आहे? 
हात  शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वच्छ धुतल्यानंतरचे फायदे व हात स्वच्छ न धुतल्यामुळे होणारे तोटे हेही पूर्णपणे माहीत आहेत समजलेले आहेत पण ही क्रिया माझ्याकडून अपेक्षितपणे घडत नसेल तर त्या माहिती असण्याचा व शास्त्रशुद्ध ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असे मला वाटते. त्यामुळेच  याबाबत परस्परसंवाद हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या जीवनावश्यक क्रियेचे सातत्य व नियमितीकरण होणे आवश्यक आहे.
अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि त्यासाठी या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करणे, त्यासाठी प्रभावी संवाद यंत्रणा असणे गरजेचे आहे.

संवाद
(1) शब्दांद्वारे :बोलण्यातून (2) डोळ्यांनी : ती कृती वारंवार पाहिल्याने
(3) काळजीपूर्वक ऐकण्यातून व (4) वारंवारिता : म्हणजे सातत्याने ती क्रिया करत राहिल्याने ती तशी बिनचूक व्हावी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने ती अंगवळणी पडते. आयुष्य जगण्याचा एक भाग बनून जाते : म्हणून संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.
उदाहरणार्थ: एखादी बाब टिव्हीवर वारंवार पाहिल्याने ती मनावर पक्की ठसते, आपण त्याचे अनुकरण करतो.कारण ती कमीत कमी वेळेत अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी बनविली जाते. ती एकदाच दाखवून थांबवली जात नाही तर सकाळपासून रात्रीपर्यंत अहोरात्र तसेच दररोज सातत्याने आपल्या मनावर आदळवली जाते.

काहींच्या बाबतीत तर इच्छा असो अथवा नसो पण ती पहावी लागते. त्यामुळे व्यक्तीच्या मनावर ती एवढी बिंबवली जाते की नैमित्तिक जीवनात त्याची प्रतिक्रिया उमटत राहील असा प्रयत्न केला जातो.

शाळेमध्ये म्हणजे अगदी बालवाडीपासून ते विद्यालयापर्यंत प्रत्येकाच्या मनावर हे प्रभावीपणे बिंबवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी फक्त तोंडी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीद्वारे ते करवून घेणे. त्यामध्ये सातत्य ठेवणे, त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे .त्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध असणे हेही गरजेचे ठरते.

हात धुण्याचे नुसते शास्त्रोक्त ज्ञान आहे पण शाळांमध्ये पुरेसे पाणी नाही हॅन्ड वॉशिंग बेसिन किंवा इतर उपलब्धता नसेल तर त्या ज्ञानाचा व्यवहारात काय उपयोग होणार ?हेही महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी मुलांच्या देखत व्यवस्थित हात धुणे तसेच दुपारी जेवणाच्या वेळी मुले काळजीपूर्वक हात होतात की नाही ते पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावर काळजीपूर्वक लक्ष देणंही आवश्यक आहे.

घरांमध्ये प्रवेशद्वारातच किंवा घरी आल्यानंतर लगेच हात पाय धुण्याची सोयीची जागा पुरेसे पाणी व साबण वगैरे सुविधा उपलब्ध असणे जितके गरजेचे आहे तितकेच घरच्या वडीलधार्‍या माणसांनी प्रत्येक वेळी हात शास्त्रशुद्ध पद्धतीने धुणे आवश्यक आहे.  ते पाहून घरातील इतरांवर लहान मुलांवर योग्य ते परिणाम होतात. मुले त्यांचे अनुकरण करतात. कारण मुले अनुकरणप्रिय असतात, शाळेत शिक्षक व घरात वडिलधारी माणसे जे करतात त्याची सही सही नक्कल करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात तसेच कुटुंबातील मुले वेळेवर योग्य पद्धतीने हात धुत नसतील तर त्यांना अशी क्रिया बिनचूकपणे करण्यासाठी प्रत्येक वेळी वडिलधार्‍या माणसांनी आग्रही राहिले पाहिजे.

कार्यालये व सार्वजनिक ठिकाणीही हात धुण्याची सुविधा योग्य ठिकाणी असणे, तिथे पाणी ,साबण इत्यादी सुविधा उपलब्ध असणे व त्याचा येणाऱ्या प्रत्येकांकडून वापर केला जातो हे पाहणे आवश्यक ठरते. त्यासाठीची व्यवस्था करणे व हे कायमस्वरूपी अंगवळणी पडण्यासाठी प्रयत्न करणे उपयुक्त ठरते. आता माझ्या या विषयाच्या दृष्टीने म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस’ यानिमित्ताने माझे असे मत झाले आहे की …..सध्या आलेली कोविड 19 महामारी म्हणजे करोना रोगाची साथ ही या कामासाठी उपकारकच ठरली आहे, तसे माझे निरीक्षण आहे.
करोनाच्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवघेण्या विषाणूंचा प्रसार हा मुख्यत्वे हातांद्वारे होतो .

त्यामुळे विषाणू संसर्ग होईल अशी ठिकाणे सॅनिटायझर ने निर्जंतुक करणे, अशा जागी वारंवार हात न लावणे , आपले डोळे, नाक वा तोंडाला हाताचा वारंवार स्पर्श होउनयेत म्हणून प्रयत्न करणे ,तसेच हाताला वेळोवेळी सॅनिटायझर लावणे व वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुणे याचा या काळात इतका प्रचार व प्रसार झाला आहे की समाजातल्या सामान्यातील सामान्य माणसांनाही याचे महत्त्व समजले आहे. आता समाजाकडून याचा सातत्याने वापर केला जातो का? हे पाहणे त्यासाठी समाजाच्या अभिव्यक्ती बदलासाठी प्रशिक्षण व प्रभावी संवादाची व्यवस्था केल्यास ते कायमस्वरूपी अंगवळणी पडण्यासाठी उपयुक्त ठरेल.

(लेखक महादेव माळी हे सांगली येथे प्राध्यापक आहेत )

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:43 am

Web Title: special blog on international hand wash day scj 81
Next Stories
1 BLOG : बिर्याणीवर बहिष्कार?
2 BLOG: तथाकथित सवलतीपुढे ‘कर’ माझे जुळती
3 खबरदार, झाडाला हात लावाल तर…
Just Now!
X