03 June 2020

News Flash

BLOG : इरफान, तुमको याद रखेंगे गुरू!

हळूहळू इरफानचं क्षितिज विस्तारत गेलं...  मित्रांचं वर्तुळही बदलत गेलं

दिवंगत अभिनेते इरफान खान यांना महिन्याला अवघे २५ रूपये मिळत होते. त्यांनी आपल्या पहिल्या कामाईमधून स्वतःसाठी एक सायकल विकत घेतली.

अमित भंडारी

“यह शहर हमें जितना देता है… बदले में कही ज्यादा ले लेता है…”

या संवादाचा उल्लेख काल परवाच एका मित्राशी बोलताना झाला… इरफान अन् त्याच्याबद्दल बोलणं झालं… अन् सकाळी फोनवर आलेल्या एका मेसेजने इरफानच्या जाण्याची बातमी मिळावी… कसला दैवदुर्विलास …

काही जण आपल्या जवळ असतात… काळाच्या ओघात ते मोठे होतात…. एका गुरुत्वाकर्षणाच्या शक्ती बाहेर गेलेल्या सॅटेलाइटसारखा होता तो स्वच्छंदी… हरफनमौला… स्वतःला त्या गुरूत्वाकर्षण रेषेच्या बाहेर स्वतःला फेकण्यासाठी काय काय केले होते. ३०० रूपये पर डे मिळणाऱ्या एका मालिकेतला त्याचा ‘यू आर अंडरअरेस्ट’ म्हणणाऱ्या एका देशभक्तीपर मालिकेतल्या पदार्पणापासून ते आताच्या ‘अंग्रेजी मीडियम’पर्यंत… व्हाया हॉलिवूड. स्वतःला सिद्ध करणं अन् तेही सतत अगदी आजच्या सकाळच्चा कोकिलाबेन हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डमध्ये न्यूरो इंडोक्राइन ट्यूमरसाठीची ही झुंज कायम राहिली. काहींना स्ट्रगल चुकलेला नसतो… अगदी स्टारडम मिळूनही…

 

काही जणांच्या चेहऱ्यावरचा स्ट्रगल हा कायम दिसत राहतो. तसा तो त्याच्या चेहऱ्यावरही दिसायचा. त्याच्या असामान्यत्त्वामध्ये असलेला एक स्वाभाविकपणा त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवायचा. आपण वेगळे आहोत, ही त्याच्यामध्ये जाणीव असली तरी त्याच्या वागण्याबोलण्यात तो अभिनिवेश नसायचा हे त्याचं मोठेपण…

‘लाइफ इन अ मेट्रो’मधील इरफानच्या तोंडची ओळ कानात आज पुन्हा घुमली. तो भेटलाय खूप अगोदर… आपलं बोलणं कान देऊन ऐकणारा… डोळ्यांच्या कोपऱ्यात स्थिरावलेल्या बुबुळांमधून रोखून बघत स्वतःचा मुद्दा मांडताना अगदी मोजकेच शब्दात व्यक्त होताना त्याच्या बोलण्याला एक विनोदाची झालर असायची. कधी खोचक बोचरेपणा जरी असला तरी ते जिव्हारी लागणारं नव्हतं. बोलताना केसांवरून हात फिरवण्याची त्याची लकबही अजब होती. अलिकडच्या काळात केस वाढवले होते. त्यावेळी त्या जुल्फांवरून हात फिरवण्याची शैलीबद्दल नंतर जवळचे मित्र टिपण्णी करू लागले होते.

माणसं विचारांनी मोठी असतात… आपल्या मर्यादा जोखून त्यांना ही शक्तीस्थानांमध्ये रूपांतरित कऱण्याची किमया फार कमी जणांना अवगत असते. इरफान हा त्यामधला मातब्बर खेळाडू. ‘मुंबई मेरी जान’च्या वेळी झालेली भेट प्रकर्षाने आठवते. योगेश विनायक जोशीने लिहिलेला निशिकांत कामत दिग्दर्शित आणि कॅमेऱ्यावर संजय जाधव.  त्याचं दिसणं अंगकाठी तशी सामान्य माणसाला साजेशी अशी होती. रात्री गल्लीच्या नाक्यावर सायकलवर उभे राहणारे चायवाला झालेला तो… एक पोलीस हटकतो अन् त्याला छळण्यासाठी म्हणून त्याचं सायकलवरच्या दूध असलेला फिल्टरचा नळ उघडून हफ्ता दिला नाही म्हणून वाया घालवतो.

त्या वाया जाणाऱ्या दुधाकडे बघत असणारी त्याची विषण्ण करणारी नजर… तो सीन सुरू होण्याअगोदर त्याचा निशिकांतसोबत झालेला संवाद कॅमेऱ्यावर असलेल्या संजय जाधवसोबतचं ट्युनिंग अन् त्याच्या मनात चाललेला कोलाहल… तोच इरफान मॉलमध्ये जातो अन् त्या पऱफ्युम काऊंटरवर त्याला आलेला गंध हा आपल्याला ओबेरॉय मॉलमधल्या पीव्हीआरमधल्या खुर्चीतही आला होता. तिथून पाच दहा मिनिटांवर असलेल्या सुचिधाममध्ये सुरूवातीच्या दिवसांमध्ये राहायचा.

मधल्या काळात एका फेस्टिवल दरम्यान परदेशात झालेल्या भेटीत हा बदलला होता… चांगल्या अर्थाने! इंटरव्ह्यू करण्यासाठी आवाज देऊन बोलवून “यार इंटरव्ह्यू शुरू करते वक्त इंट्रोडक्शन मे पुरा नाम मत लेना बस इरफान बोल देना…” असं त्याने ठासून ठासून तीन चार वेळा सांगितलं… मी चमकून पाहिलं… ‘इरफानही बोलना…’ त्याला स्वभाव माहित असल्यामुळे पुन्हा डोळ्याच्या कोपऱ्यातून मिश्किलसा हसला…

इंटरव्ह्यू संपल्यावर इतर इंटरव्ह्यू चहा पीत असताना बोललेलं वाक्य महत्त्वाचं वाटलं… आडनावापेक्षा आपण काय करतो, हे लोकांनी नावानं ओळखलं जाणं गरजेचं आहे. माझा धर्म, जात, वंश … मी कोण आहे… हे त्याने पुरतं स्वतःला ओळखलं असणार… स्वतःला शोधण्यात तो मश्गुल झाला होता. एकीकडे प्रचंड कामाचा वेग वाढला होता…

मीरा नायरच्या ‘द नेमसेक’ मध्ये दिसला होता. तेव्हा हा वेगळा आहे… याची दखल बऱ्याच जणांनी घेतली होती. फिल्मी वर्तुळात तोपर्यंत नसीरजी आणि ओम पुरींचा दबदबा होता… त्यामुळे आपण वेगळं करू शकतो, याची त्याने चुणूक दाखवायला सुरूवात केली होती.

एकीकडे विशाल भारद्वाजचा तो ‘मकबूल’… तर कधी तिग्मांशू धुलियाचा ‘पानसिंग तोमर’ होऊ लागला होता. ‘पिकू’, ‘हैदर’, ‘तलवार’मध्ये ठसा उमटवून गेला होता. तो पर्यंत ‘इन ट्रीटमेण्ट’सारखी टेलिव्हिजन सीरीज अन् ‘हिस्स’ वगैरे पण करत असताना मुख्य प्रवाहातील सिनेमांना नाकं मुरडत नव्हता. ‘सण्डे’, ‘बिल्लू’, ‘ऩॉक आऊट’ असे तद्दन कमर्शिअल सिनेमे करत होता. ‘हैदर’च्या वेळेस भेटला त्यावेळेसही हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलत राहिला होता.

कामाने गती पकडली होती अन् त्याला ही जाणीव झाली होती आपण जे करतो ते आवडतंय लोकांना. कामावरची निष्ठा ढळली नव्हती. प्रत्येक सीन तितक्यात आत्मीयतेने करायचा असं त्याच्यासोबतच्या दिग्दर्शकांशी बोलल्यावर जाणवायचं. प्रमोशनसाठी लोकं बोलतातही खोटं… पण त्याचा विषय निघाला की दिग्दर्शक त्याच्यासोबत कॅरेक्टरला धरून इरफानने केलेल्या व्हॅल्यू ऍडिशनबद्दल पण बोलायचे… त्यावरून करिअरमध्ये मिळालेल्या गतीच्या आवेगात तो स्वतःला हरवून बसला नव्हता.

‘जुरासिक वर्ल्ड’ ‘स्पायडर मॅन’मध्ये दिसल्यानंतर त्याने तिथल्या गोष्टींचे इथे आल्यानंतर किस्से नव्हते केले. इथल्या भाषेत स्वतःची टिमकी वाजवताना प्रमोशन करताना हॉलिवूड आणि ब़ॉलिवूड अशी तुलना कऱण्यापेक्षा तिथल्या कामाची पद्धत अन् आपल्या कामात काय पद्धतीचा बदल अपेक्षित आहे, याबद्दल माफक अन् मोजकं बोलायचा, पण तेही मार्मिक असायचं. मिशीला कोकम लावून तूप सांगणाऱ्यांच्या दुनियेत हे फार महत्त्वाचं वाटत होतं.

पण छक्के पंजे तसे माहित नव्हते. जितकं सरळ रेषेत चालता येईल तेवढा चालण्याचा प्रयत्न करेन असं नेहमी म्हणायचा… तसा तो होता… दुटप्पी… अप्पलपोटा असा नाही वाटला कधी… मित्रांमध्येही  तो तसा नव्हता…

कामाच्या वेगात थोडीशी उसंत मिळत असेल तर ती कॅमे-यासमोर असं तो म्हणायचा. सतत व्यक्तिरेखा, त्याचं वर्किंग इतकं असायचं, असं केलं तर मी असं केलं तर हे पात्र आता असं व्यक्त होईल… अस का नाही होणार, अशी हुज्जत पण दिग्दर्शकासोबत घालायचा पण एकदा दिग्दर्शकान त्याला पटवून दिले तर मग त्याचे शंभर टक्के तो द्यायचा.

इनफर्नोच्या वेळेस भेटला त्यावेळेस टॉम हँक्स अन् हॉलिवूड असं बरंच बोलत होता. त्याने सांगितल्याप्रमाणे देशात पहिला इंटरव्ह्यू तुला देईन, हा शब्द या मित्राने पाळला होता… अजूनही आठवतं लख्ख. कधी नव्हे ते इंटरव्ह्यूसाठी चक्क सकाळी साडेआठ वाजता महाशय हजर झाले होते. त्यावेळी पीआर करणारा आता मित्र असलेला गुरदेवसिंग लाडा पण एवढ्या सकाळी आम्हाला शिव्या घालत हीच वेळ मिळाली काय, म्हणून सुनावत होता. ‘नो बेड ऑफ रोझेस’, ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’, ‘टोकिओ ट्रायल’बद्दल त्यावेळी बरंच काही सांगत होता. त्याच्या प्रगतीने सुखावलो होतो. आपल्यासोबत काही काळ व्यतीत करणारा हा माणूस देशातल्या उत्तम अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला होता… तो आता हॉलिवूडमध्ये आपला झेंडा रोवत होता. या सगळया गोष्टींनी अभिमान वाटत होता… अन् त्यासाठी काय किंमत मोजावी लागत होती, हे त्याचं त्यालाच ठाऊक होतं.

‘मदारी’ आपण कसा प्रोड्युस करतोय… अन् निशिकांत कामतने त्यावेळी रफ कट्स दाखवले होते, काही सीन्सबद्दल बोलणं झालं असं सांगितल्यावर त्याही वेळी त्याच्या डोळ्यात कसं वाटतंय… बरं होतंय… हे जाणून घेताना त्याच्या डोळ्यात लहान मुलाचं कुतूहल होतं. बॉलिवूडमधल्या आयकॉनिक फिगरला माझ्याकडून ते जाणून घेण्यात अजूनही कुतूहल होतं. त्या कुतूहलाने त्याला सतत स्वतःचा शोध घ्यायला लावला. ‘पिकू’मधल ट्रॅव्हल एजण्टच्या आयुष्यातील प्रवास त्या राणाच्या नजरेतून दाखवला ते ‘तलवार’मधला शोध घेणारा अश्विन कुमार त्याला स्वतःचा शोध घेताना सापडला असेल असंच वाटतं. कारण जितका तो सहज वाटायचा तितकाच तो माणूस म्हणून समजून घ्यायला जटिल होता, हे त्याच्या जवळचे मान्य करतील.

हळूहळू त्याचं क्षितिज विस्तारत गेलं…  मित्रांचं वर्तुळही बदलत गेलं. काही वर्तुळांपेक्षा काही जाळी असतात… त्यामध्ये आपण कधी गळाला लागतो… हे कळत नसतं. कामाच्या नशेइतकीच आणखी नशा रक्तात भिनत गेली. कामावर परिणाम होत नव्हता. कामाचा आलेख उंचावतच राहिलेला. तोपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार ‘पद्मश्री’ असं सारं काही गुणवत्तेला न्याय देणारे मानाचे तुरे त्याच्या शिरपेचात खोवले गेले होते. कामावर परिणाम झाला नाही म्हणूनच की काय शरीरावर परिणाम झाला… दृष्ट लागली, असं जवळचे मित्र म्हणतात. ‘चॉकलेट’मध्ये त्याच्या तोंडी एक संवाद होता. शैतान की सबसे बडी चाल है वह सामने से नही आता… तसं

खऱं तर पटकन व्यक्त व्हावं, हा माझा स्वभाव नाही. पण इरफानचं जाणं तसं चटका लावून जाणारट…डोळ्यासमोरून सारा पट उलगडून गेला.

‘Inside I am very emotional outside I am very Happy’

हे त्याचं शेवटचं ट्विह ठरावं… फिल्म प्रमोशनसाठी असलं तरी त्याच्या जगण्याचं सार त्याच आलंय…

यह शहर हमें जितना देता है… बदले में कही ज्यादा ले लेता है लाइफ इन मेट्रो मधलं वाक्य जसं लक्षात राहिलं तसा आज हा इरफान नावाचा माणूस हिरावून नेला.

त्याच्या हासिल सिनेमातला एक डायलॉग होता…

तुमको याद रखेंगे गुरू हम, आई लाइक आर्टिस्ट… हे वाक्य त्याच्यासाठी एवढ्यात लिहावं लागेल असं वाटलं नव्हतं.
आता कुठून तरी येईल… आवाज देईल… अमितबाबू…

आणि कुसुमाग्रजांच्या नांदीतल्या ओळीतलं अखेरचे संवाद म्हणेल

‘एक अर्करूप अस्तित्व संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त इथे माझ्याजवळ, माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेले आहेत.
मी एक होतो तो हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे.’

अमित भंडारी

(ब्लॉग लेखक सोनी मराठी या वृत्तवाहिनीमध्ये असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 7:37 pm

Web Title: special blog on irrfan khans films serials and overall career scj 81
Next Stories
1 BLOG : मै था, मै हूँ और मैही रहुंगा!
2 BLOG : डिजिटल व्हायरस पासून सावध राहा
3 कोरोनाच्या काळात बदलेल्या भावना; बस प्रवास एक पर्वणी!!!
Just Now!
X