समीर जावळे

आजही ज्याच्या डान्स स्टेप्स कॉपी केल्या जातात… आजही त्याचं नाव घेतलं की लोकांना पॉप आठवतं. ज्याने जगाला आपल्या तालावर नाचवलं.. अनेकदा त्याच्या डान्स स्टेप्स, त्याची एंट्री पाहून मुली बेशुद्ध व्हायच्या.. त्याच्या मून वॉकवर अख्खं जग फिदा आहे… त्याच्या नावाचं गारुड आजही जगावर आहे.. ते नाव म्हणजे मायकल जॅक्सन. उणापुऱ्या ५१ वर्षांचं आयुष्य तो जगला. पण ते अत्यंत रंजक, प्रसिद्धीने भरलेलं.. वादांनी माखलेलं ठरलं. मायकल हे जग सोडून गेला त्याला आता ११ वर्षे उलटली आहेत. तो आजचाच दिवस होता ज्यादिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी मायकलच्या निधनाची बातमी आली… अवघं जग त्यादिवशी हळहळलं तोच हा दिवस.

Astad Kale and Aditi Sarangdhar play MasterMind entertainment news
आस्ताद काळे व अदिती सारंगधर यांचे ‘मास्टर माईंडम्’
shah rukh khan and gauri khan had three wedding ceremonies
शाहरुख व गौरी खानने तीन पद्धतीने केलं होतं लग्न, प्रसिद्ध निर्मात्यांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “त्यांच्या लग्नात…”
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
udaan fame actress kavita chaudhary biography
व्यक्तिवेध: कविता चौधरी

‘Have you Seen My childhood? I am Searching for the world that i come from’ हे म्हणणं होतं मायकल जॅक्सनचं… त्याची डोळे दिपवून टाकणारी अमाप संपत्ती, प्रायव्हेट जेट्स.. त्याचा ताफा, एकाहून एक सरस अशा कार आणि जगाने दिलेलं प्रचंड यश हे सगळं पायाशी लोळण घेणारा मायकल हा कुठेतरी आतून उदास होता. त्याचं हे वाक्य खूप काही सांगून जातं…

कडक शिस्तीतलं बालपण
मायकलचे वडील जोसेफ हे अत्यंत कडक शिस्तीचे होते. फक्त मायकलच नाही तर त्याच्या भावंडांनाही ते अत्यंत शिस्तीने वागवत असत. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून मायकलची ओळख स्टेजशी झाली. नाचाच्या सरावादरम्यान त्याचे वडील बेल्ट घेऊन फिरत असत.. थोडीशीही चूक बेल्टचा फटका खाण्यासाठी पुरेशी ठरत असे.. एका मुलाखतीत साश्रू नयनांनी मायकलनेच ही गोष्ट सांगितली होती. जोसेफ जॅक्सन यांनी आपलं कुटुंब चालवण्यासाठी बॉक्सिंगचं करिअर सोडलं. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी कामं करुन ते कुटुंब चालवू लागले. आपल्या मुलांचं भवितव्य आपल्यासारखंच पणाला लागू नये हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळेच कठोर शिस्तीत त्यांनी फक्त मायकललाच नाही तर त्यांच्या नऊ मुलांनाही वाढवलं. मायकल त्याच्या नऊ भावंडापैकी आठवा होता. तो आपल्या भावांसोबतच कार्यक्रम करायचा.. पण आपल्या वयाच्या मुलांसोबत खेळण्याचीही त्याला मुभा नव्हती. त्यामुळे त्याचं बालपण त्याला नीट जगता आलं नाही. शेवटचा श्वास घेईपर्यंत ही खंत त्याच्या मनात राहिली होती. रोज तीन ते चार तास अभ्यास आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रेकॉर्डिंग हा मायकलच्या आयुष्याचा एक भाग झाला होता. पत्रकार मार्टिन बशीर यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातला हा पैलू मायकलने उलगडला होता.

 

 

स्ट्रगलचा काळ
जगभरातल्या प्रसिद्ध लोकांपैकी एक नाव म्हणजे मायकल जॅक्सन.. त्याच्या पॉपची जादू आजही कायम आहे. मात्र मायकल चा किंग ऑफ बनण्यापर्यंतचा प्रवास हा तेवढाच खडतरही आहे. संगीताचं बाळकडू त्याला घरातच मिळालं होतं. जॅक्सन ब्रदर्स नावाच्या ग्रुपमध्ये मायकल बॅक अप म्युझिशियन होता. एकदा आईने मायकलला गाताना ऐकलं.. सुरुवातीला जोसेफ जॅक्सन यांना तसं वाटलं नाही.. मात्र काही काळानंतर प्रमुख गायक म्हणून मायकल गाऊ लागला आणि जॅक्सन ब्रदर्सचं नाव जॅक्स फाईव्ह असं झालं. अमेरिकेत या बँडच्या मोठ्या प्रमाणावर टूर होत होत्या. मायकलचा लोण्यासारखा मऊ आवाज लोकांना आवडू लागला… पॉप म्युझिकचा अनभिषिक्त सम्राट होण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल ठरलं. मायकलच्या आयुष्यावर जेम्स ब्राऊन या गायक आणि डान्सरचा मोठा प्रभाव होता. जेम्सची स्टाईल मायकलने पुढे नेली… रुजवली आणि मोठीही केली. १९६८ मध्ये जॅक्सन फाइव्हने बिग बॉय नावाचा त्यांचा पहिला अल्बम प्रदर्शित केला. या अल्बमला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याकाळी प्रसिद्ध असलेली डायना रॉस ही गायिकाही या बँडसोबत जोडली गेली. जॅक्सन फाईव्हची प्रसिद्धी वाढू लागली. Motown Records सोबत झालेला करार हा जॅक्सन कुटुंबासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. मोटाउन रेकॉर्ड्सचे त्याकाळतले प्रमुख बेरी गॉर्डी यांच्यासोबत झालेल्या करारानंतर जॅक्सन कुटुंब लॉस एंजल्स या ठिकाणी वास्तव्यास गेलं. १९६९ मध्ये जॅक्सन कुटुंब हे स्पॅनिश बनावटीच्या एका आलिशान बंगल्यात राहू लागलं.

 

 

१९७१ मध्ये मायकल जॅक्सनचा पहिला सोलो अल्बम आला त्यानंतर मायकलच्या आवाजाची किमया पसरु लागली. Off the wall या १९७९ मध्ये आलेल्या अल्बममुळे डिस्को आणि पॉप जगतात खळबळ माजवली आणि त्यानंतरची पुढची अनेक वर्षे पॉपच्या जगतावर त्याने अक्षरशः राज्य केलं.. मायकलची एंट्री, त्याचा डान्स, त्याचा स्टेजवरचा वावर हे सगळं नजरा खिळवून ठेवणारं ठरलं.. जगभरात मायकलचं नाव होऊ लागलं.. अनेकदा त्याचं नाव गिनिज बुकातही नोंदवलं गेलं. १९८४ मध्ये झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात थ्रीलर या मायकलच्या अल्बमला रेकॉर्डब्रेक आठ बक्षीसं मिळाली. डेंजरस, हिस्ट्री: पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या अल्बममधली ‘मॅन इन मिरर’, ‘ब्लॅक ऑर व्हाईट’, ‘अर्थ साँग’, ‘दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस’ ही गाणी प्रेक्षकांच्या तोंडी आजही आहेत. स्पॅनिश स्टाइलच्या बंगल्यानंतर मायकल जॅक्सन इन्सिनो हाऊस नावाच्या एका प्रशस्त घरात १९८८ पर्यंत राहिला. जिथेच त्याच्या ऑफ द वॉल आणि थ्रीलर या अल्बममधील गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं..

यानंतर मायकल जॅक्सनने नेव्हरलँड येथे स्वतःची प्रॉपर्टी खरेदी केली. एकीकडे मायकल यशाची शिखरं गाठत होता. दुसरीकडे त्याच्यासोबत अनेक वादही जोडले जात होते. त्याच्या स्वभावात आलेला काहीसा तुसडेपणा, त्याची अफेअर्स, त्याची लाइफस्टाईल हे सगळे वादाचा विषय ठरु लागले.

 

 

लैंगिक अत्याचाराचा पहिला आरोप

१९९३ मध्ये मायकलवर त्याच्याच कुटुंबाशी संबंधित असलेल्या एका मित्राच्या लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. या मुलाच्या आईने सुरुवातीला पोलिसांना असा कबुली जबाब दिला होता की मायकल असं करु शकेल असं वाटत नाही. तर या मुलाच्या वडिलांनी पैसे उकळण्यासाठी माझ्यावर हा आरोप केल्याचं मायकलनं म्हटलं होतं. पुराव्यांअभावी ही प्रकरण बंद झालं. द डेंजेरस या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन जेव्हा केलं गेलं तेव्हाही दोन अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले. मात्र या प्रकरणातही कोणतेही पुरावे मिळू शकले नाहीत.

पहिलं लग्न आणि घटस्फोट

मायकल जॅक्सनने एल्विस प्रेस्लीची मुलगी लिसासोबत लग्न केलं.. मात्र हे लग्न दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही. दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला

दुसरं लग्न

१९९५ मध्ये जेव्हा हिस्ट्री हा अल्बम आला तेव्हा तो त्या वर्षातला सुपरहिट अल्बम ठरला. हे वर्ष मायकलसाठी काहीसं दुर्दैवीही ठरलं कारण नाचाची प्रॅक्टीस करत असताना तो पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र सप्टेंबर १९९६ ते १५ ऑक्टोबर १९९७ या कालावधीत मायकल जॅक्सनने हिस्ट्री हा अल्बम जगभरात पोहचवण्याच्या दृष्टीने वर्ल्ड टूर केली. या कालावधीत त्याने ८२ कॉन्सर्ट केले. जे ३५ देशांतील ५८ शहरांमध्ये झाले. याच कालावधीत मायकलने दुसरं लग्न केलं. Debbie Rowe ही डर्मटॉलॉजी नर्स होती. तिच्यासोबत मायकल विवाहबद्ध झाला. या दोघांचं लग्न झालं तेव्हा डेबि सहा महिन्यांची गरोदर होती. १३ फेब्रुवारीला प्रिन्स मायकल जॅक्सन ज्युनियरचा जन्म झाला. तर १९९८ मध्ये त्याच्या मुलीचा म्हणजेच पॅरीस जॅक्सनचा जन्म झाला.

१९९७ ते २००१ या कालावधीत मायकल त्याच्या Invincible या अल्बमवर काम करत होता. तर १९९९ ते २००० या कालावधीत त्याचं वास्तव्य न्यूयॉर्कमध्ये होतं. ब्लॅक ऑर व्हाइट हे गाणं आणि बहीण जेनेट जॅक्सनसोबत सादर केलेलं स्क्रीम हे गाणं यामुळे मायकलला अमाप प्रसिद्धी मिळाली.

पुन्हा लैंगिक शोषणाचा आरोप

२००५ मध्ये पुन्हा एकदा मायकल जॅक्सनवर लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. मायकल जॅक्सनला पॉर्न पाहण्याचं वेड होतं तसंच त्याला लहान मुलांचं लैंगिक शोषण करायला आवडायचं असाही आरोप त्यावेळी झाला. या प्रकरणी मायकलवर १४ आठवडे खटला चालला होता. मात्र पुरावे न मिळाल्याने त्याला मुक्त करण्यात आलं. त्याच्या घरावर तेव्हा पोलिसांनी छापेही मारले होते. मायकल जॅक्सन ड्रग अॅडिक्ट होता असाही आरोप त्याच्यावर झाला. त्याच्या घरात काही वादग्रस्त वस्तू सापडल्या होत्या. ज्यामध्ये रक्त, पशूंचे बळी दिले जाणारे फोटो आणि समागम करणाऱ्या काही प्रौढांचे फोटोही सापडले. त्याच्यावर विविध प्रकारचे १४ आरोप झाले होते. मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत. जॅक्सनच्या मुलीनेही वर्षभरापूर्वी मीडिया मायकल जॅक्सनच्या नावे पैसे उकळण्यासाठी हे आरोप करत असल्याचा दावा केला होता.

 

जून २००९ चा तो दिवस
२००९ मध्ये लंडनला येऊन मी माझा शेवटचा कॉन्सर्ट करणार आहे असं मायकल जॅक्सनने जाहीर केलं होतं. मात्र २५ जून २००९ ला लॉस एंजल्समधल्या घरी हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं. एक पॉपस्टार त्याचं एक वादग्रस्त आयुष्य जगला.. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला आणि अकस्मात मृत्यूने जगाला हादरवूनही गेला. त्याला जाऊन ११ वर्षे झाली आहेत. मात्र त्याची आठवण मनात होती, आहे आणि राहिल यात शंका नाही.

sameer.jawale@indianexpress.com