डॉ अजय शंकर धनावडे

पूर्वेस उत्तुंग पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेस फेसाळलेला अथांग अरबी समुद्र या दरम्यानच्या चिंचोळ्या पट्टीला भौगोलिकदृष्ट्या कोकण म्हणतात. प्राचीन काळी याचे क्षेत्र अगदी भारताचे दक्षिण टोक असलेल्या केरळ पर्यंत असावे, परंतु सध्या मात्र उत्तरेकडे तापी नदी ते दक्षिणेकडे गोमंतक प्रदेश अशा किनारी भागास कोकण असे म्हटले जाते. या निसर्गरम्य भागाला प्राचीन इतिहास आहे. परंतु आजही म्हणावे असे संशोधन कोकण भागात झालेले दिसत नाही.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

गेल्या पन्नास वर्षात प्रादेशिक इतिहास म्हणजे स्थानिक इतिहासास प्राधान्य देणारी चळवळ भारतात उभी राहिली. महाराष्ट्रात देखील इतिहास संशोधन व लेखन अनेक संस्थांकडून केले जाते भारत इतिहास संशोधक मंडळ, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई इतिहास संशोधक मंडळ, विदर्भ संशोधन केंद्र, मराठवाडा इतिहास परिषद, खानदेश इतिहास परिषद अशा अनेक मान्यवर संस्था इतिहासातील शोध आणि ग्रंथ निर्मितीचे कार्य करीत आहेत. मात्र दुर्लक्षित कोकणचा इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करणारी एकही संस्था नसल्यामुळे या विषयाकडे लक्ष जाण्यासाठी २ ऑक्टोबर २०१० रोजी कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून कोकणातील जनमानसात इतिहासप्रेम व कोकणी वारशाबाबत जनजागृती केलेल्या कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय एक दिवसीय अधिवेशन यावर्षी रविवार दि २ फेब्रुवारी २०२० रोजी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे संपन्न होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्षपद माजी संचालक पुरातत्व व वस्तु संग्रहालय महाराष्ट्र राज्य, डॉ. अरविंद जामखेडकर भुषविणार आहेत.

सामान्य लोकांचे औदासिन्य आणि शासकीय स्तरावरील देखभाल-दुरुस्तीच्या अभाव व मर्यादेमुळे संपूर्ण कोकणभर विखुरलेल्या ऐतिहासिक खुणा विकास व आधुनिकीकरणामुळे उध्वस्त होत असताना कोकणचा इतिहास जपण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने डॉ. दाऊद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रवींद्र लाड, श्री सदाशिव टेटविलकर, डॉ. अरुण जोशी, प्रा. भारती जोशी, प्रा. विद्या प्रभू, प्रा. जितेंद्र भामरे इत्यादींनी एकत्र येऊन कोकण इतिहास परिषदेची स्थापना ठाणे येथे केली. ठाणे हे परिषदेचे मुख्य केंद्र असले तरी मागील वर्षात परिषदेचे कार्य वाढून कल्याण, रायगड, सिंधुदुर्ग आणि गोवा येथेहि परिषदेच्या शाखा कार्यान्वित झाल्यात. परिषदेची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत परिषदेच्या सर्वदूर पसरलेल्या सदस्यांमध्ये समन्वय साधण्याचे व एकत्रित ठेवण्याचे काम संस्थेचे सचिव व इतिहास अभ्यासक श्री. सदाशिव टेटविलकर यांनी न थकता अविरतपणे सुरू ठेवले आहे. संपूर्ण कोकणात अभ्यासक, संशोधक इतिहासप्रेमींना भेटून त्यांना इतिहास प्रेमाची गोडी लावून त्यांना परिषदेच्या वारीत सामील करून घेण्याचे त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे.

कोकणात इतिहासविषयक काम या परिषदेच्या स्थापनेपूर्वीपासूनच अनेक मंडळी सामूहिक अथवा व्यक्तिगत पद्धतीने करत होती व आजही करत आहेत. अशा सर्व मंडळींनी परिषदेच्या व्यासपीठावर एकत्रित येवून अधिक भरीव कार्य करावे अशी अपेक्षा आहे. या परिषदेचे तीन विभाग असून प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी विभागणी त्यात केली आहे. या अंतर्गत कोकणातील किल्ले, लेणी, मंदिरे, दुर्ग, ताम्रपट, शिलालेख, जंगले, वन्यप्राणी, बोलीभाषा, लोकजीवन, नौकानयन, संस्कृती, सणवार, उत्सव, परंपरा, खाद्यजीवन, सागरकिनारे, प्राचीन घाटवाटा, गरम पाण्याचे कुंड, बंदरे, मशिदी, सायनागॉग, दर्गे, व्यवसाय, व्यापार, चर्च यासारख्या अनेक विषयांचे अभ्यासकेंद्र तयार व्हावे असे परिषदेचे ध्येय आहे. ऐतिहासिक साधनांचे संकलन करणे त्यांचा तज्ञ संशोधाकांकडून अभ्यास करून इतिहासाचे पुनर्लेखन करणे, दुर्मिळ ग्रंथ, नाशिवंत कागदपत्रांचे डीजीटलाइजेशन करणे हे परिषदेचे आणखी एक उद्दिष्ट आहे. आपल्या ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्थानिक नागरिकांना उद्युक्त करणे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक अवशेषा विषयी जागरूकता निर्माण करणे, गड-किल्ल्यांचा डोळसपणे धांडोळा घेत भटकणे, अभ्यासक व संशोधकांसाठी चर्चासत्र आयोजित करणे, प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन संशोधन मोहिम राबविणे आदी उपक्रम परिषदे मार्फत राबविले जातात. इतिहासप्रेमी देणगीदार व सभासदांच्या वर्गणीतून परिषदेचा कारभार चालतो.

कोकण इतिहास परिषदेच्या मागील नऊ वार्षिक अधिवेशनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. आता पर्यंत झालेल्या शोध निबंधांचे नऊ खंड प्रसिद्ध झाले असून नववा शोधनिबंध संग्रह खंड येत्या अधिवेशनात प्रसिद्ध केला जाणार आहे. इतिहास क्षेत्रासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संशोधक, अभ्यासक अशा मान्यवरांना परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथील संशोधक श्री. अण्णासाहेब शिरगावकर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक डॉ सदाशिव गोरक्षकर, कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर श्री. जयंत साळगावकर, मुंबई विद्यापीठाचे माजी इतिहास प्रमुख प्रा. जे. व्ही नाईक, पुराभिलेखाचे सखोल अभ्यासक डॉ प्रकाशचंद्र शिरोडकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ रवींद्र रामदास, पुरातत्त्वज्ञ व संशोधक श्री अशोक मराठे, पाली भाषा आणि बौद्ध साहित्य अभ्यासक डॉ मीना तालीम, ज्येष्ठ संशोधक श्री आप्पा परब आणि यावर्षीचा मानाचा असा हा पुरस्कार माननीय नाणेतज्ञ व इतिहास संशोधक श्री शशिकांत धोपाटे, पुणे यांना दिला जाणार आहे.

येत्या परिषदेत कोकणातील आदिम ते नागर संस्कृतिवर अनेक अभ्यासक शोधनिबंध सादर करतील. मागील वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास दिला जाणारा पुरस्कार या वर्षी “भारतीय नौकानयनाचा इतिहास”चे लेखक डॉ. द. रा. केतकर यांना देण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी कोकण इतिहास विषयक कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तीचा पुरस्कार यावर्षी साडेचारशेहून अधिक किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती करणाऱ्या हमिदा अनवर खान यांना मिळणार आहे. याशिवाय अनेक पुस्तकांचे प्रकाशन, छायाचित्र प्रदर्शन, ग्रंथदालन, भारतीय दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन यांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

जैवविविधतेने नटलेल्या व नुकताच जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या पश्चिम घाटाचा महत्वाचा भाग असलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगेने आद्य ऐतिहासिक काळापासून इथला भूतकाळ घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारतात प्राचीन संस्कृती फुलली-फळली सुपीक नद्यांच्या काठावर, पण कोकणातील संस्कृती मात्र बहरली ती खाऱ्या व मचूळ चव असलेल्या पण रुपेरी वाळू व काळ्या-तांबड्या मातीच्या नद्यांच्या व खाड्यांच्या किनारी स्थानिक भाषेत खलाटी आणि वलाटी भागात. इथल्या जांभ्या सड्यावर आदिम मानवाने रेखाटलेली व संशोधकांना कोडी घालणारी पहिली कलाकुसर म्हणजे कोकणातील कातळशिल्पे. यात कुठे रानडुक्कर, कुठे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांपासून ते कोकणात आज औषधालाही न आढळणारा एकशिंगी गेंडा, कुठे सिंधू संस्कृतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करणारे वाघांशी झुंज देणाऱ्या वीराचे चित्र, कुठे जणूकाही परग्रहावरील मानवाने काढलेली वाटावीत अशी सर्किटच्या आकाराची अनाकलनीय गूढ चिन्हे तर कुठे अगदी नाजूकपणे चितारलेला फुलाच्या पाकळ्यात बंदिस्त झालेला भ्रमरही पाहायला मिळतो.

सातवाहन काळापासून ते आजच्या महाराष्ट्राच्या भूगोल व इतिहासाला खरा अर्थ व आकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांच्या शौर्यकथा व त्यांचा प्रचंड पराक्रम सांगणारे किल्ले व जलदुर्ग आहेत. इथे बौद्ध भिक्खू, जैन श्रमण, व्यापारी, सार्थवाह यांसारख्या पांथस्तांची अनादीकाळापासूनची कुजबुज ऐकलेल्या घाटवाटा आहेत. एरव्ही संथ व तितकेच खोल पण पावसाळ्यात रौद्ररूप धारण करून आपल्याच काठावरील गावांना गिळंकृत करणाऱ्या, नक्र-मकरादींनी भरलेल्या नदीपात्रात अनेक शतके व्यापारी, प्रवाशांची वाट पाहत कुठे अगतिकपणे अथवा जीर्णावस्थेत तर कुठे आधुनिकतेचा साज चढवून दिमाखदारपणे उभी असलेली इथला आर्थिक विकास करणारी बंदरे इथे आहेत.

कोकणची लोक संस्कृती आणि त्याची क्षितिजे यांचा थांग लावणे त्यांना समजून घेण्यासाठी कुठेही इतर ठिकाणी न आढळणाऱ्या गावऱ्हाटी, बारा-पाच संप्रदाय, चाळा, गावपळण सारख्या प्रथा-परंपरा या मागील प्रेरणांचा, लोकमानसाचा अर्थ लावणे ते उलगडणे म्हणजे कोकणचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास उलगडल्या सारखे होईल. कोकणचे वैशिष्ट्य असलेली इथली दैवते रवळनाथ, सातेरी, तरंग, शासनकाठी हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलसारख्या गावात उत्कृष्ट पद्धतीचे कोरीवकाम असलेले लाकडी स्तंभ आहेत. यावर चौसष्ठ योगिनी कोरल्या असाव्यात असा अंदाज केला जातो त्यांची ओळख मध्यप्रदेशातील बेडाघाट, मोरेना तसेच ओडीसातील हिरापूर येथील चौसष्ठ योगिनीशी करण्याचे काम अजून बाकी आहे. बौद्धप्रभाव धर्माच्या प्रभाव काळात हिंदू धर्माच्या कातळगाव-जावडे येथील चवथ्या-पाचव्या शतकातील शैव व वैष्णव लेण्यांच्या प्रेरणांचा छडा लावणे धर्मेतीहास समजून घेण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. गावऱ्हाटीतील जैनाचा धोंडा समजून घेण्यासाठी इथला प्राचीन जैन प्रभाव लक्षात घ्यावा लागेल.

मध्ययुगीनकाळात उत्तरेत हिंदू धर्मस्थळांवर हल्ले होत असताना साटवलीयेथील विठ्ठल मंदिर उभारणीस आदिलशहाने दिलेल्या देणगीचे महत्व त्यामुळेच अभ्यास करण्याजोगे. मध्ययुगात केव्हातरी स्वतच्याच देशातुन हाकलून दिले गेलेले व इतर जगाने देखील नाकारलेले, इथल्या समाजव्यवस्थेत शनिवारतेली म्हणून रुळलेल्या ज्यू लोकांचा इतिहास कोकणी मानसिकता समजून घेण्याच्यादृष्टीने तितकाच महत्वाचा आहे.

खरंतर आजच्या खासगीकरण, औद्योगिकीकरण व जागतिकीकरणाच्या युगात कोकण इतिहास परिषदेचे काम वाढलेले आहे. हे युग म्हणजे सांस्कृतिक सपाटीकरण होय. जुन्या मंदिरांचा, वास्तूंचा जीर्णोद्धार व आधुनिकीकरणाच्या नावाखाली पांढऱ्या अथवा काळ्या संगमरवरामध्ये सिमेंटची मंदिरे उभारून ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार वाढले आहेत. जुन्या मूर्ती-शिल्पं यांचे विसर्जन करून आपण प्रादेशिक इतिहासाचा फार मोठा पुरावा नष्ट करत आहोत याचे भान राहिलेले नाही. या सगळ्याला खिळ बसावी व लोकांमध्ये आपल्या ऐतिहासिक ठेव्याबाबत जागृती व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कोकणची प्रादेशिक संस्कृती, अस्मिता जपताना त्याचा प्रादेशिक इतिहास लिहताना संकुचित स्थानिकतावाद, प्रादेशिकतावाद या पासून दूर राहून काळाबरोबर बदलणाऱ्या राजकीय सत्तांच्या मागे न लागता इतिहासकारांनी जागृत राहून समाजस्वास्थ्य न बिघडवता राष्ट्रीय ऐक्य टिकवून ठेवणे हि भूमिका कोकण इतिहास परिषदेची आहे आणि असे झाले तरच भारताच्या इतिहासाशी घट्ट नाळ जोडून ठेवणारा आपल्या कोकणचा इतिहास कोरडा न ठरता त्याला कोकणच्या संस्कृतीचा आंबेमोहोर गंध असेल.

– डॉ अजय शंकर धनावडे
अध्यक्ष – कोकण इतिहास परिषद, रायगड शाखा