सुनीता कुलकर्णी

सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी सातत्याने समाजमाध्यमांवर आपली उपस्थिती नोंदवावी लागते. पण ती नोंदवताना एखादा अंदाज चुकला, एखादी गफलत झाली तर तिचा फटकाही बसतो, असा अनुभव नुकताच टॅम्पॉनच्या ‘टॅम्पॅक्स’ या ब्रॅण्डला आला. टॅम्पॉन हे स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात योनी मार्गात वापरण्याचं एक साधन आहे. मासिक पाळीच्या काळात होणारा रक्तस्त्राव हे साधन शोषून घेतं. ते योनीमार्गाच्या आत वापरायचं असल्यामुळे खेळाडूंनी, शारीरिक धावपळीचं काम करणाऱ्यांना ते सोयीचं ठरतं.

तर प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल समूहातील ‘टॅम्पॅक्स’ या अमेरिकी कंपनीने अलीकडेच एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये ग्राफिक डिझायनर ब्रिटनी हॅरिस यांनी तयार केलेलं पाच व्यक्ती दाखवणारं एक चित्र होतं. आणि त्याच्यासोबत पुढील ओळी होत्या.

वस्तुस्थिती – सगळ्याच स्त्रियांना मासिक पाळी येत नाही.
आणखी एक वस्तुस्थिती- ज्या लोकांना मासिक पाळी येते, ते सगळेच स्त्री असतातच असं नाही. मासिक रक्तस्त्राव होणाऱ्या सगळ्याच लोकांचं आम्ही स्वागत करतो.

अर्थात हे असं ट्विट उगीचच उठून करायचं म्हणून केलं नव्हतं. ते करण्यामागे ‘टॅम्पॅक्स’ या ब्रॅण्डचा एक विचार होता. ज्यांना मासिक रक्तस्त्राव होतो, पण ज्यांची समाजात स्त्री अशी ओळख नाही, (उदाहरणार्थ- तृतीयपंथी/ ट्रान्स मेन, जेंडर नॉन बायनरी) अशा सगळ्यांना आपल्याशी जोडून घेणं या उद्देशाने ते ट्वीट करण्यात आलं होतं. पण काही जणांना ते समजलं नाही आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

एकजण लिहितात, टॅम्पॅक्स, तुमची उत्पादनं थोडी महाग आहेत, पण तरीही मी गेली दहाबारा वर्षे ती वापरते आहे. पण आता यापुढे मी ती वापरणार नाही. माझा किंवा माझ्या मुलीचा उल्लेख जे कोणी ज्यांना रक्तस्त्राव होतो असे लोक असा करतात, त्यांना यापुढे माझ्याकडून एक पै देखील मिळणार नाही.

एकीने लिहिलं आहे, तुमच्यासारख्या मोठ्या कंपनीने हे एकदम चुकीचं म्हटलं आहे. ज्यांना रक्तस्त्राव होतो अशा तुमच्या सगळ्या ग्राहकांची ओळख स्त्री अशीच आहे.  या ट्विटची चर्चा होण्याला लेखिका जे. के. रोलिंग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांना मासिक रक्तस्त्राव होतो अशा लोकांसाठी कोविड १९ च्या महासाथीनंतर अधिक समानता असलेलं जग निर्माण करण्याबाबतचं मत या लेखाला प्रतिसाद म्हणून केलेल्या ट्विटची पार्श्वभूमी होती.

रोलिंगबाईंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की ज्यांना रक्तस्त्राव होतो असे लोक? मला असं वाटतं की अशा लोकांसाठी आपल्या भाषेत काही शब्द आहेत. Womben? Wimpund ? Woomud ? यापैकी कोणता शब्द ? कुणी मला सांगेल का? त्यांच्या म्हणण्यामधला गर्भित अर्थ लक्षात न घेताच काही लोकांनी त्यांना शहाणपणा शिकवायचा प्रयत्न केला होता तर काही लोकांनी जे. के. रोलिंग यांच्यावर त्या तृतीयपंथीय विरोधी असल्याची टीका केली होती.

फक्त मासिक रक्तस्त्रावावरून एखाद्या व्यक्तीला स्त्री ठरवायचं की नाही यावरून हा सगळा वाद आहे. तृतीयपंथीयांना मासिक रक्तस्त्राव होतो, ऋतुमती होण्याआधी आणि रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना मासिक रक्तस्त्राव होत नाही मग त्या स्त्री नाहीत का काही स्त्रियांना काही शारीरिक दोषांमुळे मासिक रक्तस्त्राव होत नाही. मग त्यांना स्त्री म्हणायचं नाही का, असे प्रश्न या सगळ्या चर्चेत उपस्थित केले गेले आहेत.