News Flash

BLOG : धरण फोडणारे खेकडे आता करणार विधायक कामं!

खेकड्यांनी तिवरे धरण पोखरल्याने ते फुटलं असा अजब दावा करण्यात आला आहे

खेकडे हवेत खेकडे, लाखोंच्या संख्येनं त्यांची आवश्यकता आहे मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनला… होय एकमेकांचे पाय खेचणारे असतात तेच खेकडे. मराठी माणसाच्या वृत्तीची ज्यांच्याशी तुलना केली जाते तेच खेकडे. कशाला? कशाला काय विचारता, अनेक शतकं खेकड्यांच्या वृत्तीची अवहेलना करणाऱ्या आपल्यासारख्या पामरांना त्यांच्यामधल्या कौशल्याची जाणीवच झाली नव्हती ती माननीय मंत्रीमहोदयांना झाली आहे. जर खेकडे धरणाला खिंडार पाडू शकतात, तर त्यांच्या या विध्वंसक कौशल्याचा विधायक कामासाठी का वापर करू नये? नेमकं हेच करण्याचा मायबाप सरकारचा विचार असून अतोनात पैसा ओतावा लागणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या टनेल बोअरिंग मशिन किंवा टीबीएमऐवजी खेकड्यांना तैनात करण्याचे घाटत आहे.

शिवछत्रपतींच्या मावळ्यांमधला शिरोमणी असलेल्या तानाजी मालुसरेंनी घोरपडीच्या सहाय्यानं कोंढाणा सर केला होता. सारखं खाली पडणाऱ्या घोरपडीला तानाजी मालुसरेंनी “आता जर तू खाली आलीस तर तुझी खांडोळी करून भाकरीसोबत खाईन” अशी धमकी तिला दिली होती. त्यानंतर घोरपडीने ईमान राखलं आणि तानाजींनी मावळ्यांच्या साथीनं कोंढाणा जिंकला. त्याच्या स्मरणार्थ या गडाचं नामकरण सिंहगड करण्यात आलं. तानाजीची मालुसरेंची आठवण होणं साहजिकच आहे कारण आता फक्त फरक इतकाच आहे की घोरपडीची जागा खेकडे घेतील.

व्यवस्थापन क्षेत्रामध्ये परवलीचं असलेलं वाक्य म्हणजे “Maximum Utilisation of Available Resources” किंवा उपलब्ध स्त्रोतांचा कमाल वापर. सध्या खेकडेनामक स्त्रोताचा वापर फक्त खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणे यापलीकडे विधायक कार्यासाठी होत नाही. आता तिवऱ्यामधल्या खेकड्यांनी विध्वसंक कार्याची चुणूक दाखवल्यानंतर त्यांचाही विधायक कार्यासाठी वापर करून घेता येईल हे समोर आलं आहे. त्यामुळेच खेकड्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या बजेटमध्ये विशेष प्रयत्न करण्यात येतील यात काही शंका नाही. आणि एक टेस्ट प्रोजेक्ट म्हणून मेट्रोचा एखादा बोगदा त्यांना खणायला देण्यावर सध्या राज्य सरकारचं मंत्रीमंडळ प्रस्ताव ठेवणार असल्याचं ऐकिवात आहे. जे टनेल बोअरिंग मशिननं करून नाही दाखवलं, ते खेकडे करून दाखवतील असा विश्वासही काही कट्टर पाठिराख्यांनी व्यक्त केला आहे. हे केलं तर एकाच दगडात अनेक पक्षी मरणार आहेत.

महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या धरणांना असलेला धोका ताबडतोब नाहिसा होईल कारण या सगळ्या खेकड्यांना मुंबईत पाचारण करण्यात येईल. राज्यभरातल्या गावागावातल्या गरीब शेतकऱ्यांना खेकडा संवर्धनामध्ये रोजगार मिळेल, उपयुक्तता लक्षात घेता खेकड्यांची खाण्यासाठी हत्या करण्यावर बंदी घातली जाईल, परिणामी लोकं निरामिष आहाराकडे वळून निरामय जीवनशैलीकडे वळण्याची संभाव्यता वाढेल आणि सोने पे सुहागा म्हणजे फुकटात मेट्रोचे बोगदे खणून मिळतील.

समीर जावळे

sameer.jawale@gmial.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:07 pm

Web Title: special blog on minister tanaji sawant statement on tiware dam scj 81
Next Stories
1 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक?
2 BLOG : अंबाती रायुडू, टीम इंडियाचा शापित गंधर्व !
3 मराठी अभिनेत्रींमध्येही धिटाई आली तर आहे…
Just Now!
X