जय पाटील
वर्ष सरत आलं आहे आणि वेळ आली आहे, थोडं थांबून वर्षभरातल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकण्याची. अलिकडे जगात काहीही घडलं तर ते तातडीने प्रतिबिंबित होण्याची जागा म्हणजे ट्विटर. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काय घडामोडी घडल्या याचा आढावा घेताना ट्विटरवर त्या क्षेत्रातल्या कोणत्या घटनांची चर्चा अधिक झाली, हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. मनोरंजनाचं माध्यम म्हणून रुळू पाहणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना या वर्षभरात भरभराटीचे दिवस पाहायला मिळाले. एकंदर मनोरंजन क्षेत्रासाठी जीवघेणी ठरलेली टाळेबंदी ओटीटीसाठी मात्र सुवर्णसंधी ठरली. त्याचं प्रतिबिंब ट्विटरवर उमटलं आणि खरी मजा आणली ती मिर्झापूर २, आर्या आणि मनी हाइस्टने.

या तीन वेबसीरिज २०२०च्या मोस्ट ट्विटेड अबाऊट सीरिज ठरल्या आहेत. अँमेझॉन प्राइम व्हिडीओची सीरिज असलेल्या मिर्झापूर पहिल्या सिझनमधली दमदार पात्रररचना, संवाद आणि रक्तरंजित शेवटामुळे पुढच्या सिझनविषयी आधीपासूनच उत्सुकता ताणली गेली होती. दुसऱ्या सिझनचा ट्रेलर रिलिझ झाल्यापासूनच ट्विटरवर नव्या सिझनमधील संवाद, पात्रांचा समावेश असलेल्या मिम्सचा पाऊस पडू लागला. नवा सिझन रिलिझ झाल्यादिवशीच अनेकांनी लागोपाठ सर्व भाग पाहून संपवले आणि लगोलग त्यावर व्यक्त होऊ लागले. टीकाही झाली, वादही झडले. ट्रेलर आणि सिझन रिलिझ झाले, तेव्हा ट्विटरवर मिर्झापूरशी संबंधित अनेक हॅशटॅग्ज ट्रेंड झाले होते.

 

 

स्पॅनिश टेलिव्हिजन मालिकेचे वेबसीरिजमध्ये रूपांतर केलेली नेटफ्लिक्सची मनी हाइस्टही ट्विटरवर चर्चेत राहिली. या सस्पेन्स थ्रीलर सीरिजचे चार सिझन याआधीच रीलिझ झाले होते. हाती वेळ असल्यामुळे असेल कदाचित, पण पाचवा सिझन प्रेक्षकांनी अधिक उचलून धरला. त्यातील वेशभूषा, गाणी लोकप्रिय झाली आणि ट्विटरवरच्या मीम्समधून ती लोकप्रियता प्रतिबिंबितही झाली.

 

 

आर्या ही हॉटस्टारची वेबमालिका ट्विटरवर प्रचंड चर्चेत राहिली. दमदार कथानक हे या सीरिजचं वैशिष्ठ्य आहेच. शिवाय यातून अभिनेत्री सुश्मिता सेन कमबॅक करणार असल्यामुळे त्याविषयी उत्सुकता होती. अंमली पदार्थांच्या व्यापाराचं चित्रण असलेली ही सीरिज देखील मोस्ट ट्विटेड अबाउट सीरिज ठरली.