अक्षय दिलीप नाईकधुरे

“या सिजनमध्ये एक ब्रिज पडला.आता पुढच्या सिजनमध्ये काय-काय पडेल याची वाट पाहायची “.सीएसटी कडे धावत जाणाऱ्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाचे हे विधान.अपघात होऊन चोवीस तासानंतरचे हे वाक्य आपल्याला बरंच काही सांगून जाते.सीएसटी जवळील ‘हिमालय ब्रिज’ घटनेने सहा जणांना गिळले.शेतीचा,आयपीएलचा जसा दरवर्षी हंगाम असतो तसा अपघातांचा हंगाम मुंबईत सुरू होतो.दरवर्षी मुंबईत काहिनाकाही घडतेच.पुढे होणाऱ्या घटनांची भविष्यवाणी करण्यासाठी इथे कोणा ज्योतिषाची गरज लागत नाही. कोणताही मुंबईकर आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज देऊ शकतो.दरवर्षी एखाद्या झोपडपट्टीला लागणारी आग असो किंवा एखादा ब्रिज कोसळणार असो,याचे ठराविक अंदाज मुंबईकरांना आरामात देता येतात.सकाळी घरातून बाहेर पडणारा हा मुंबईकर रेल्वे स्टेशनवर लोकलचे ‘रिटर्नचे’ तिकीट तर काढतो मात्र तो खरंच घरी परतले का? याची त्याच्या घरातल्यांना शाश्वती नसते.

देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक हे जीव मुठीत घेऊन लढत असतात.त्यांना परकीयांचा धोका असतो हे ठाऊक असते.मुंबईकरांच्या बाबतीतही तसेच.तेसुद्धा रोज जीव मुठीत घेऊन इकडून-तिकडे पळापळ करत असतात.परंतु इथे त्यांना आपल्याला कोणापासून धोका आहे हे ठाऊक नसते.कोण-कुठला-कधी आपल्या जीवावर उठेल ते सांगणे कठीण आहे.आपली चूक असो वा नसो शेवटी जीव जातो तो जातोच.
सध्याच्या ब्रिज अपघातानंतर अनेकजण बोलण्यास तयार नाहीत.शरमेची बाब म्हणजे अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नाही.अपघाताचे खापर एकमेकांवर ढकलण्यात मात्र सर्वजण नेहमी तयार असतात.महापालिका ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचे यासंबंधी एक अवाक्षरही नाही.ऑडिट रिपोर्टच्या नावाखाली ही घटना जेवढ्या लवकर दाबता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेची ‘बातमी’ करायला गेलेल्या पत्रकारांनासुद्धा मुंबई महापालिकेच्या गेटमध्येच अडवण्यात आले.त्यामुळे अनेक टीव्ही माध्यमांनी रस्त्यावर उतरून कार्यक्रम केले.पण अशा प्रकारे सर्वच बाजुंनी कोंडी झाली तर जाब नेमका कोणाला विचारायचा?

माणसाची सर्वात चांगली सवय म्हणजे ‘जगणे’.या जगात जगण्याला फार किंमत आहे असे म्हटले जाते.पण अशा अपघातांवर एक नजर टाकली की मरण्याला किती किंमत ते कळते.”अरे जाऊ दे रे मेलो तर सरकारकडून पैसे तरी मिळतील” ,”निदान घरच्यांचे तरी भले होईल”.”अशा घटनांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे ” अशा स्वरूपाची मते आज तयार होत आहेत. त्यामुळे हे असले विचार किती लाजिरवाणे आहेत याचा आगामी काळात आढावा घ्यायला हवा.सरकार आणि जनतेची खरी ‘युती-आघाडी’ होण्यासाठी विश्वासाचे नाते जपावे लागेल.पण या नात्यांचे ब्रिज असेच कोसळायला लागले तर पुढे घडणारी क्रांती ही जवळच येऊन ठेपलीय एवढे नक्की.

-अक्षय दिलीप नाईकधुरे