News Flash

BLOG : ओशो नावाचा अवलिया!

ओशो यांचा संपूर्ण जीवन प्रवास विविध घटनांनी ओतप्रोत भरलेला होता

ओशो यांचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर अवलिया असंच करता येईल. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे विविध वादांनी भरलेलं होतं. मात्र तितकंच रंजकही होतं. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा उण्यापुऱ्या 59 वर्षांचा होता. मात्र आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारा गुरु असं त्यांना संबोधलं जाई. गेल्या वर्षी सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचा दुसरा सिझन नेटफ्लिक्सवर रिलिज झाला. त्यामध्ये गुरुजी हे पात्र साकारणाऱ्या पंकज त्रिपाठीची भूमिका ही ओशोंशी काही प्रमाणात साधर्म्य साधणारी होती. तत्त्वज्ञान हा विषय शिकवणारे चंद्रमोहन जैन यांचा ओशो होण्यापर्यंतचा प्रवास मोठा, रंजक आणि थक्क करणारा आहे.

ओशो प्रसिद्ध होते त्यांच्या रोल्स रॉईस कार, उंची कपडे आणि महागड्या घड्याळांसाठी. यावरुन त्यांच्यावर टीकाही होई. मात्र कोणत्याही टीकेची पर्वा न करणारा हा तत्त्ववेत्ता त्याच्या मनाला मानेल तसंच आयुष्य जगला.

तत्वज्ञान आणि ते खास शैलीत मांडण्याची कला ओशोंच्या अंगी होती. त्यांची भाषा मंत्रमुग्ध करणारी असे. त्यामध्ये विनोदही असत. एखाद्या विषयावर ओशो आज एक भूमिका घेत आणि उद्या त्याच्या विरोधात भूमिका घेत त्यामुळे त्यांच्या भूमिकांचं सार काढणं काहीसं कठीण आहे. मात्र तरीही त्यांची व्याख्यानं ही ऐकत रहावीत अशीच असत. त्यामुळेच लोक त्यांच्याकडे प्रभावित होत. त्यांचं वाचन अफाट होतं. गौतम बुद्ध, कबीर, रामकृष्ण परमहंस, अष्टावक्र, महावीर, मीराबाई, कृष्ण यांच्यावर ओशो प्रवचनं देत. ध्यानधारणा शिकवत. जैन धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म या धर्मांमधल्या अध्यात्मिक परंपरांवर विविध व्याख्यानं ते देत असत.

11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातल्या कुचवाडामध्ये रजनीश यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव चंद्रमोहन जैन असं होतं. लहान असल्यापासूनच त्यांना गूढ आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये ओढ वाटू लागली होती असं रजनीश यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीश जबलपूर विद्यापीठात प्राध्यापकी करु लागले. त्यांनी विविध धर्मांवर आणि विचारधारांवर प्रवचन देण्यासही सुरुवात केली. प्रवचनासोबतच त्यांनी ध्यानधारणा शिबीरंही सुरु केली. देशभरात त्यांचे अनुयायी वाढू लागले. अगदी विनोद खन्नाही त्यांचा अनुयायी झाला होता. सिनेमातली कारकीर्द भरात असतानाही विनोद खन्नाने त्यांचे शिष्यत्व पत्करले. तो ओशो आश्रमात सामान्य अनुयायांप्रमाणे राहू लागला. त्यानंतर बऱ्याच काळाने विनोद खन्नाने आश्रम सोडला.माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं असं जग आपल्याला निर्माण करायचं आहे. त्या जगात कोणत्याही जातीभेदाला स्थान नाही असं ओशो कायम सांगत.

अशी मिळाली सेक्स गुरु ही पदवी

ऑगस्ट 1968 मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात प्रेम या विषयावरील पाच व्याख्यांनाच्या मालिकेतील पहिलं व्याख्यान ओशोंनी दिलं. लैंगिक उर्जेच्या रुपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान यांची निर्मिती होते हा विचार त्यांनी मांडला. संभोगातून समाधीकडे असे त्यांचे ब्रीद होते. हे व्याख्यान वादग्रस्त ठरले. लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया आल्याने आयोजकांनी ती व्याख्यानमाला रद्द केली. मात्र या घटनेच्या एक महिन्यानंतर मुंबईतील गोवालिया टँक येथील मैदानावर त्यांनी प्रचंड श्रोत्यांसमोर व्याख्यानं देऊन त्यांच्या व्याख्यानांची मालिका पूर्ण केली. संभोगातून समाधीकडे हा विचार त्यांनी मांडल्याने त्यांना सेक्स गुरु अशीही उपाधी देण्यात आली.

रजनीशपुरम

1969 मध्ये त्यांनी दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत धर्मगुरुंवर स्वार्थी असल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे असेही मत त्यांनी मांडले. त्यांच्या या भाषणावर शंकराचार्य चिडले होते. 1974 पर्यंत मुंबईत राहिल्यानंतर ओशोंना दमा, मधुमेह या व्याधींनी ग्रासले. 1974 मध्ये त्यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी निवास करण्यास ते आले तिथे एक आश्रमही उभारला. मा योग मुक्ता यांच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. मात्र 80 च्या दशकात या आश्रमाबाबतही उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. तेव्हा त्यांनी हा आश्रम 1981 मध्ये सोडला आणि ते अमेरिकेतल्या ओरेगॉनमध्ये गेले. तिथे त्यांनी आश्रम काय स्वतःचं शहरच उभं केलं होतं. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास वादग्रस्त होता. महागड्या कार, घड्याळं, रोल्स रॉईस गाड्या, डिझाईनर कपडे यामुळे ते कायम चर्चेत राहिले. ओरेगॉनमध्ये त्यांच्या शिष्यांनी रजनीशपुरम नावाने एक शहरच उभारलं होतं. मात्र स्थानिकांनी या आश्रमाचा आणि शहराचा विरोध केला.

आनंद शीला आधी अनुयायी नंतर कट्टर शत्रू

या सगळ्या प्रवासात ओशोंच्या अत्यंत जवळची असलेली सहकारी म्हणजे आनंद शीला. आनंद शीला ही ओशोंच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होती. मात्र 1983 नंतर ओशो आणि शीला यांच्यात मतभेदांना सुरुवात झाली. 1985 मध्ये ओशो यांनी व्याख्यानं सुरु केली तेव्हा रजनीशपुरममधून शीला आणि तिच्यासोबत असणारा एक समूह युरोपात निघून गेला होता. शीला यांचा रजनीशपुरम उभारण्यात आणि ओशोंकडे येणारा निधी सांभाळण्यात मोठा वाटा होता. आनंद शीला या त्यांच्या सर्वात जवळच्या अनुयायी मानल्या जात. मात्र जेव्हा ओशो आणि आनंदशीला यांच्यात वाद झाले तेव्हा ओशोंनी आनंद शीला यांच्यावर विषप्रयोग, ड्रग्ज, दूरध्वनीद्वारे संभाषणांवर लक्ष ठेवणं, ओशोंच्या निवासातली माहिती मिळवणं यांसारखे अनेक आरोप केले.

शीलाचा आपल्या अनुयायांवर असलेला प्रभाव दूर करण्यासाठी बुक ऑफ रजनीशिझम या पुस्तकाच्या प्रती 1985 मध्ये जाळण्यात आल्या. त्यावेळी शीला यांचे पोशाखही जाळण्यात आले. शीला आणि त्यांच्या अनुयायांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1985 मध्ये ओशो दिल्लीत आले. त्यानंतर ते 1987 मध्ये पुण्यात परतले. त्यांना विविध आजार जडले होते. 19 जानेवारी 1990 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ओशो कधीही जन्माला आले नाहीत, कधीही मेले नाहीत त्यांनी 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 या काळात पृथ्वी ग्रहाला भेट दिली असा संदेश त्यांच्या समाधीवर लिहिण्यात आला.

ओशो यांचं एकूण आयुष्य हे विविध वादांनी भरलेलं होतं. या वादांमध्ये फ्री सेक्स, मानवी हत्या, ड्रग्जची तस्करी यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यांची वाणी ओजस्वी होती. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा आणि त्यांच्या डोळ्यांचा अनुयायांवर प्रभाव पडत असे. भारताला प्रभावित करणाऱ्य दहा पुरुषांमध्ये ओशो यांचाही समावेश होतो. मात्र त्यांचा मृत्यू आजारपणाने झाला, हार्ट अॅटॅकने झाला, ड्रग्जच्या ओव्हरडोसने झाला की त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता या प्रश्नांची उत्तरं आजही गूढ आहेत. त्याची उकल आज तीस वर्षांनीही होऊ शकलेली नाही.

19 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं?
ओशो यांची प्रकृती खालावली होती. 19 जानेवारी 1990 रोजी त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी डॉ. गोकुळ गोकाणी यांना बोलवण्यात आलं. ओशोंचा मृत्यू याच दिवशी झाला. या बाबत डॉ. गोकाणी यांनी दीर्घ काळ मौन बाळगलं. मात्र आपल्याला चुकीची माहिती देऊन ओशोंच्या डेथ सर्टिफिकेटवर सही करायला लावली असा खुलासा त्यांनी काही वर्षांनी केला. who killed osho ? हे पुस्तक लिहिणारे अभय वैद्य यांनीही ओशोंच्या मृत्यूबाबत लिहिलं आहे. वैद्य म्हणतात, गोकुळ गोकाणी शपथपत्रात असं म्हणतात की, ओशो आश्रमात बोलवण्यात आलं. मात्र ओशोंना तपासू दिलं नाही. काही तास त्यांना आश्रमात फिरवण्यात आलं. त्यानंतर त्यांचं डेथ सर्टिफिकेट द्या असं सांगण्यात आलं. डॉक्टर गोकाणी यांनी ओशोंच्या मृत्यूच्या वेळेबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. हार्ट अॅटॅकमुळे ओशो यांचा मृत्यू झाला असं त्यांच्या अनुयायांनी आपल्याला सांगितल्याचं गोकाणी यांनी म्हटलं आहे. खरंतर ओशो आश्रमात एखाद्या संन्यास घेतलेल्याचा जरी मृत्यू झाला तर तो दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात असे. मात्र ओशो यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ओशो यांची आईदखील पुण्यातील आश्रमात रहात असे. त्यांनाही ओशोंच्या मृत्यूची बातमी उशिरा देण्यात आली. मात्र ओशोंचा मृत्यू कसा झाला हे आजही एक गूढच आहे.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 7:50 am

Web Title: special blog on osho rajneesh scj 81
Next Stories
1 BLOG : मंटो! समाजाला आरसा दाखवणारा लेखक
2 BLOG : विराट ही वेळ प्रयोग करण्याची नाही!
3 BLOG : टीम इंडिया… वेळीच सावरा!
Just Now!
X