04 March 2021

News Flash

BLOG : ‘पाताल लोक’ कटामागे दडलेल्या सत्याची रंजक गोष्ट

पाहिली नसेल तर जरुर पाहावी अशी वेबसीरिज

समीर जावळे

“ये जो दुनिया हैं ना दुनिया एक नहीं तीन दुनिया है, सबसे उपर है स्वर्ग लोक जिसमें देवता रहते है. बीचमें धरती लोक जिसमें आदमीं रहते है.. सबसे निचे पाताल लोक जिसमें किडे रहते है.” हा जबरदस्त डायलॉग आहे अ‍ॅमेझॉन प्राइमवर धुमाकूळ घालणाऱ्या पाताल लोक या वेब सीरिजमधला. ९ भाग असलेली ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. या सीरिजच्या पहिल्या भागापासूनच ही आपण खिळून राहतो.  दिल्लीतल्या एका प्रतिथयश टीव्ही पत्रकाराला ठार मारण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक होते. ही कारवाई थेट आयुक्तांकडून करण्यात आलेली असते. त्यानंतर आऊटर जमुना पार्क या ठाण्यात काम करणारा हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत) याच्याकडे ही केस येते आणि सुरु होतो पाताळात दडलेल्या रंजक सत्याची गोष्ट

दमदार अभिनय आणि प्लॉट

असं म्हटलं जातंय की या वेबसीरिजची कथा तरुण तेजपाल यांच्या The Story of My Assassins या पुस्तकावर आधारित आहे. मात्र पाताल लोक पकड घेतलं ते हाथीराम चौधरीमुळेच. अर्थात जयदीप अहलावत या गुणी कलाकाराने मध्यवर्ती भूमिकेचं सोनं केलं आहे. एका हायप्रोफाईल पत्रकाराच्या हत्येचा कट का रचला गेला हे सत्य शोधताना त्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामागचं राजकारण कळतं, रहस्य उलगडतं. काय काय आणि कसं कसं घडत जातं आणि हाथीराम चौधरी त्या सत्याच्या कसा जवळ जातो हे दाखवण्यात आलं आहे. हाथीराम चौधरी हा पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ दिल्लीतल्या पाताल लोक अर्थात आऊटर जमना पार्कमध्ये काम करतोय. त्याच्या आयुष्यात या केसच्या निमित्ताने त्याला पहिल्यांदाच एक संधी मिळते ही संधी मिळाल्यानंतर तो ज्या तडफेने सगळं सत्य शोधून काढतो ते जयदीप अहलावतने जिवंत केलंय.

हतोडा सिंग अर्थात विशाल त्यागी (अभिषेक बॅनर्जी) तोप सिंग उर्फ चाकू (जगजीत संधू), कबीर एम (आसिफ खान), मरिलिन्डो (मरियम रोनाल्डो सिंग ) या चौघांना अटक करण्यात येते. या चौघांचीही गुन्हेगार होण्याची कहाणीही या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. हे चौघे एकमेकांशी संबंधित नसतात मात्र गुन्हेगारी हा एकच समान धागा चौघांमध्ये असतो. ज्यामुळे ते संजीव मेहरा (नीरज काबी) ची हत्या करण्यासाठी एकत्र आलेले असतात. नीरज काबीने संजीव मेहरा रंगवताना त्याच्या लुक्सवर विशेष मेहनत घेतल्याचं जाणवतं. तर चार गुन्हेगारांमध्ये सर्वात मस्त काम झालं आहे ते हातोडा सिंग अर्थात अभिषेक बॅनर्जीचं. एक अत्यंत क्रूर खुनी त्याने ज्या पद्धतीने रंगवला आहे त्याला तोड नाही.

विशाल त्यागीने ४५ खून केले आहेत. हतोड्याने वार करुन अत्यंत निर्घृपणे खून करण्याची त्याची पद्धत आहे. या पद्धतीमुळे त्याची दहशत संपूर्ण चित्रकूटमध्ये आहे. विशाल त्यागीला मास्टरजींशी बोलायचं असतं. त्यांच्याशी बोलणं होत नाही म्हणून तो एक निर्णय घेतो. त्याचं कुत्र्यांवरही भयंकर प्रेम आहे. अत्यंत  गरम डोक्याचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करणारा आणि प्रसंगी अत्यंत शांत वाटणारा खुनी विशाल त्यागी अर्थात अभिषेक बॅनर्जीने अत्यंत खुबीने रंगवला आहे. हाथीराम चौधरीनंतर महत्त्वाची भूमिका कुणाची असेल तर ती हतोडा सिंग अर्थात विशाल त्यागीची आहे. या दोघांनंतर महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल तो गुल पनागचा. गुल पनागने साकारलेली हाथीरामची पत्नीही तेवढीच चांगली झाली आहे.

या वेबसीरिजमध्ये स्वस्तिका मुखर्जी, अनुप जलोटा, नीरज काबी, गुल पनाग, आकाश खुराणा, अनुराग अरोरा, अमित राज, राजेश शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अनुप जलोटा यांनी रंगवेला वाजपेयी हा मुरब्बी राजकारणी आणि त्यांनी सांगितलेली ‘ब्लॅक विडो’ची गोष्ट लक्षात राहणारी.

पाताल लोकवरुन वाद 

१) अनुष्का शर्माने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यामध्ये गोमांस आणि मॉब लिचिंग संदर्भातला त्यावरुनही वाद झाला होता.

२) भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा फोटो एका गुन्हेगारासोबत दाखवल्याचा प्रसंग या वेबसीरिजमध्ये असल्याने विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी मागणी केली होती. तसेच या समाजात गुर्जर समाजाचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचेही म्हटले होते. अनुष्का शर्माने राष्ट्रद्रोह केला आहे असाही आरोप तिच्यावर करण्यात आला.

३) या वेब सीरिजमध्ये गोरखा समाजाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचाही आरोप झाला. त्यानंतर हा शब्द त्यातून वगळण्यात आला.

दिग्दर्शन आणि लेखन

अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय या दोघांनी ही वेब सीरिज दिग्दर्शित केली आहे. पहिल्या भागापासून नवव्या भागापर्यंत पुढे काय होणार ही उत्सुकता ताणून धरण्यात हे दोघे चांगलेच यशस्वी झाले आहेत. तर सुदीम शर्म, सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुणजीत चोप्रा या चौघांनी मिळून या वेब सीरिजचं लेखन केलं आहे. काही काही संवाद तर अत्यंत उत्तम आहेत. उदाहरणार्थ मैने तो मेरे बेटेको मुसलमानभी नहीं बनाया था आपने तो जिहादी बना दिया. हा संवाद विशेष लक्षात राहतो. तो कुणाला उद्देशून आहे हे वेबसीरिज पाहताना लक्षात येईलच.

सेक्रेड गेम्सशी तुलना

अ‍ॅमेझॉन प्राइमवर जेव्हा ‘पाताल लोक’ ही सीरिज आली तेव्हा तिची तुलना लोकांनी ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या गाजलेल्या वेब सीरिजशी केली. मात्र दोन्हीचे जॉनर पूर्ण वेगळे आहेत. दोन्हीमधला समान धागा शोधायचा तर तो एकच आहे तो म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या काळात पोलीस खात्यात राहूनही फारसं काही विशेष न करु शकलेला पोलीस अधिकारी. त्या वेबसीरिजमध्ये जसा सरताज सिंग आहे तसाच या वेब सीरिजमध्ये हाथीराम आहे. पण दोघांची तुलना होऊ शकत नाही. सैफने सरताज सिंगला एका वेगळ्या उंचीवर ठेवलं आहे. तर पाताल लोकमध्ये जयदीप अहलावतने हाथीराम चौधरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. दोघेही आपल्या जागी नितांत सुंदरच आहेत.

क्लायमॅक्स

हाथीराम चौधरी सत्यापर्यंत पोहचतो. एका मोठ्या कटामागे नेमकं काय दडलेलं असतं तिथपर्यंत पोहचतो. पोहचेपर्यंत तो सस्पेंड होतो. तरीही त्याचा शोध थांबत नाही. हाथीराम जेव्हा नेमकं काय घडतं आहे याचा शोध घेण्यासाठी पुढे जात असतो तेव्हा त्याच्या वाटेतून पुरावे पद्धतशीरपणे मिटवले जात असतात. अखेर क्लायमॅक्सच्या सीनपर्यंत तो सगळं काही खरं शोधून काढतो. त्याला सत्य समजतं तेव्हा तेच सत्य तो संजीव मेहरालाही सांगतो. त्याला नोकरीही परत मिळते. कारण सुरुवातीला त्याच्या समोर आलेल्या सत्यामागे एक रंजक करणारं थक्क करणारं सत्य दडलेलं असतं. या दडलेल्या सत्यापर्यंत पोहचतो. ज्या हाथीराम चौधरीच्या भावना असतात त्या प्रेक्षक ओळखू शकतो. हेच या सीरिजचं मोठं यश म्हणावं लागेल यात शंका नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 5:21 pm

Web Title: special blog on paatal lok web series scj 81
Next Stories
1 BLOG : …आणि मला ताप आला!
2 ग्रामीण भागातील वास्तविकतेचे दर्शन घडवणारी धोंडाबाई..!
3 BLOG : सावरकरांची प्रखर व सर्वंकष बुद्धिनिष्ठा !
Just Now!
X