05 April 2020

News Flash

BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम

पानिपतचे युद्ध ही मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा आहे

समीर जावळे 

पानिपत ! आजही पानिपत म्हटलं की आपल्याला आठवते ती पानिपतची लढाई, मराठ्यांनी केलेला संघर्ष आणि शेवटी झालेला त्यांचा पराभव. मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला तरीही ते ज्या निकराने लढले त्याची गोष्ट आहे पानिपत. १४ जानेवारी १७६१ हा मराठेशाहीतल्या इतिहासातला काळा दिवस मानला जातो. मात्र त्यामुळे मराठ्यांचा पराक्रम हा तसूभरही कमी होत नाही.  पानिपतची लढाई आणि त्यातला पराभव ही मराठेशाहीतली भळभळती जखम म्हणून ओळखली जात असली तरीही ती मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे. मराठ्यांनी जे शौर्य दाखवलं, ज्या त्वेषाने ते लढले त्या लढाईला २५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव यांच्यासह अनेक दिग्गजांना या लढाईत वीरमरण आलं.

पानिपतच्या तीन लढाया

पहिली लढाई १५२६ साली बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली होती. यामध्ये बाबराचा विजय झाला

दुसरी लढाई १५५६ साली हेमू आणि अकबर यांच्यात झाली. ही लढाई अकबराने जिंकली

तिसरी लढाई १७६१ मध्ये मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली ही लढाई अहमद शाह अब्दाली जिंकला

१७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरचा बराच काळ मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही. इकडे पेशवाईतला पराक्रम सुरु झाला होता. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४० लढाया केल्या ज्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. मराठ्यांच साम्राज्य विस्तारू लागलं. उत्तर भारतापर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. थोरले बाजीराव यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे गादीवर बसले. १७५० च्या दशकात उत्तर भारतात मराठ्यांनी मोठमोठ्या मोहिमा काढल्या आणि तो प्रदेश जिंकून आपल्या राज्याच्या सीमा आणखी विस्तारल्या. अगदी अटकेपार झेंडे लावून त्यांनी आपला पराक्रम दाखवला. (अटक हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.)

भारताच्या सीमा ओलांडून मराठे जाऊ लागल्याने मराठ्यांवर अंकुश ठेवायला हवा हे बाहेरील इस्लामी सत्तांना वाटू लागले. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला. ज्यानंतर मराठ्यांना रोखण्याचा चंग अहमद शाह अब्दालीने बांधला. पानिपतच्या युद्धाची नांदी याच वर्षांमध्ये आहे. १७५९ मध्ये बलुच, पश्तुन आणि अफगाणी लोकांची मोठी फौज अब्दालीने उभारली आणि मराठ्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. अशात उत्तर भारतात काही दशकांमध्ये मिळवलेले वर्चस्व आपण गमावू शकतो हे लक्षात आल्याने पेशव्यांनी पानिपतची मोहीम नानासाहेब पेशव्यांनी आखली. या मोहिमेला सुरुवातीला रघुनाथराव जाणार होते. मात्र दरबारात त्यांनी जवळपास ८० लाखांच्या वर खजिन्याची मागणी केली. जी सदाशिवराव भाऊ यांनी धुडकावून लावली. सदाशिवराव भाऊ यांचा उल्लेख राघोबादादांनी (रघुनाथराव) बोरुबहाद्दर असा केला. कारण या मोहिमवेर जाण्याआधी सदाशिवराव भाऊ हे पेशव्यांचे हिशेबनीस म्हणून काम करत होते. राघोबादादांनी केलेला अपमान सहन न झाल्याने भर दरबारात सदाशिवराव भाऊ यांनी बोरू मोडून टाकला आणि पानिपतच्या मोहिमेसाठी सज्ज झाले. नानासाहेब पेशव्यांनीही त्यांना जाण्यास संमती दिली. त्यांच्यासोबत विश्वासरावही पानिपतच्या मोहिमेवर गेले.

नानासाहेब पेशवे

१ लाखाहून मोठी फौज उभारुन सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी पानिपतकडे मोर्चा वळवला. वाटेत त्यांना होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्याही तुकड्या मिळाल्या. १७५९ ते १७६१ या कालावधीत मराठे आणि अब्दालीची फौज यांच्यात अनेकदा चकमकी झाल्या. चकमकीत ३ हजारांपेक्षा जास्त सैन्य मारलं गेलं. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते, तर अहमद शाह अब्दाली हा पानिपतच्या दक्षिणेकडे होते. मराठे आणि अब्दाली या दोघांनी एकमेकांची वाट अडवली होती. अब्दालीने तह करण्याचा प्रयत्न केला मात्र नजीबाने ते होऊ दिले नाही. इस्लामच्या नावे युद्ध झालंच पाहिजे अशी भूमिका त्याने घेतली. सदाशिवरावभाऊ यांना असे वाटत होते की तह होईल. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे मराठ्यांचा धान्यसाठा संपत आला. यामुळे युद्ध करा किंवा तह असे दोनच पर्याय उरले.

 

सदाशिवराव भाऊ

‘रसद पुरवा’ असा निरोप पुण्यात धाडून मराठे युद्धासाठी सज्ज झाले. युद्धाचा पारंपारिक पोशाख घालून मराठे युद्धाला सामोरे गेले. ते पाहून अहमद शाह अब्दालीने व्यूहरचना युद्धास सुरुवात केली. तोफखान्याने चालून आलेल्या मराठ्यांवर हल्ले सुरु केली. मात्र मराठ्यांच्या तोफांचीही ताकद जास्त होती. इब्राहिम खान गारदी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. त्यानेही अब्दालीच्या तोफांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. युद्धाच्या सुरुवातीला मराठ्यांचा प्रभाव वाढता होता. फक्त तोफखानाच नाही तर मराठे, तिरंदाज, भालदार यांनी अफगाण आणि रोहिल्यांना कापून काढले. दुपारनंतर मराठी सैन्यच तोफांसमोर आल्याने इब्राहिम खानाला तोफखाना बंद करावा लागला. सदाशिवराव भाऊंनी अफगाणी सैन्याचा पाडाव होतो आहे हे पाहून घोडदळासह त्यांच्यावर चालून जाण्याचे आदेश दिले. मात्र अनेक घोडे उपासमारीमुळे मधेच कोसळले. जो दणका घोडदळाने केलेल्या आक्रमणातून द्यायचा होता तो तसा अफागाणी सैन्याला बसला नाही. अफगाणी सैन्याची उजवी बाजू इब्राहिम खानाने संपवली होती. मध्यभागी सदाशिवरावभाऊंचा प्रभाव होता.

अहमद शाह अब्दाली

 

मात्र मराठ्यांचे घोडदळाचे प्रयत्न असफल ठरल्याचे लक्षात येताच अब्दालीने राखीव सेना बाहेर काढली. १५ हजार कसलेले योद्धे, बंदुका आणि उंटांवर लादलेल्या छोट्या तोफा या सैन्याकडे होते. राखीव सैन्याचा प्रभाव पडतो आहे हे लक्षात आल्यावर आणखी १० हजार सैनिकांची राखीव सेना मराठ्यांवर चाल करुन गेली. दिवसभर युद्ध करुन दमलेले मराठे ताज्या दमाच्या सैनिकांना संपवण्यात कमी पडू लागले. इथेच मराठ्यांचा पराभव निश्चित झाला होता. राखीव फौज आणि उंटावरचा तोफखाना यामुळे लढाईचे चित्र काही क्षणांमध्ये बदलले. विश्वासराव मारला गेला, ज्यानंतर मराठी सैन्याने पळ काढण्यास सुरुवात केली. पळणाऱ्या मराठी सैन्यांवर आणि बुणग्यांवर अफगाणी भालदार आणि घोडदळ तुटून पडलं. जो दिसेल त्याला कापून काढण्यात आलं. अंधार होईपर्यंत शक्य तेवढ्या मराठ्यांना अफगाणी सेनेने कापून काढलं. सदाशिवराव भाऊही मारले गेले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीलाही सैनिकांची आणि बुणग्यांची कत्तल करण्यात आली. पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठ्यांची दुर्दशा करणारे ठरले. या युद्धात विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, जनकोजी शिंदे, इब्राहीम खान, यशवंत पवार, तुकोजी शिंदे ही मातबर मंडळींचा या युद्धात मृत्यू झाला. मराठ्यांची एक कर्ती पिढीच या युद्धाने संपवली. दोन मोती गळाले, २७ मोहरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही असं पानिपतच्या पराभवाचं वर्णन केलं जातं. मराठेशाहीच्या इतिहासातली ही भळभळती जखम पानिपत या नावाने ओळखली जाते. आजही दिवस आठवताना आपण हळहळतो.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 7:26 am

Web Title: special blog on panipat battle 14th january 1761 scj 81
Next Stories
1 BLOG : शंका घेण्यास वाव आहे !
2 BLOG :मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना !
3 दिल्लीत आपचा ‘विकास’ जिंकणार की भाजपाचा ‘राष्ट्रवाद’?
Just Now!
X