१९९२ मध्ये अगदीच लहान होतो, माझ्या मामाने मला सांगितलं होतं अरे अयोध्येला चाललोय तिथली एक वीट घेऊन येणार आहे. त्याने ती वीट दाखवलीही होती मला नंतर.. कसलं भारी वाटलं होतं. रामाबद्दल एक आकर्षणही निर्माण झालं होतं अगदी माझ्याही नकळत, आपोआपच! त्यामुळेच नाशिकला म्हणजेच मामा आणि मावशीकडे गेल्यावर अगदी मागे लागून रामाची मूर्तीही आणली होती. अजूनही ती माझ्या देव्हाऱ्यात आहे. मात्र रामाच्या नावे राजकारण होतंय हे समजायला पुढची काही वर्षे गेली. लहान होतो तेव्हा फक्त इतकंच कळलं होतं की मशीद पाडली. भिवंडीत रहात होतो त्यामुळे बऱ्यापैकी तणावपूर्ण शांतता काय असते त्याची कल्पना आलीच होती. ती अनुभवलीही..

लहान असताना फार काही कळत नव्हतं. पण वाचत गेलो, पत्रकारितेत आलो तेव्हा समजलं की राम मंदिराचं फक्त राजकारणच केलं जातं आहे. प्रभू रामचंद्रांशी खरंतर कुणाला काहीही देणंघेणंच नाही. भक्तीचा बाजार सक्तीचा बुरखा घालून भरवला जातो आहे. ‘मंदिर वहीं बनाएंगे’च्या घोषणा ऐकतोय त्याला २५ वर्षे लोटली. मंदिर न बांधण्याचं कारण काय तर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणे.. इच्छाशक्ती असेल तर कशावरही पर्याय निघू शकतो. एखादा प्रश्न किती दिवस भिजत ठेवायचा याला आपल्या देशात काहीही मर्यादाच नाहीत हेच खरं. राम मंदिर आणि बाबरी मशीद हा वाद आत्ताचा नाहीये.. अगदी १५ व्या शतकापासूनचा आहे. ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ हे गाणं ऐकायला गोड वाटतं पण त्याच्या जन्मभूमीवरुन सुरु झालेला वाद आठवला की… भयंकर! भीषण अशाच आठवणी येत राहतात. एखाद्या गोष्टीत ‘राम नसणं’ ही म्हण बहुदा याच वादावरुन पडली असावी असंही वाटतं

इतकं सगळं भोवताली घडत असलं तरीही देव्हाऱ्यातल्या रामाबद्दलची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. मात्र राम मंदिराचं राजकारण करणाऱ्यांबाबतची चिड तेवढीच वाढत गेली. कारण प्रभू रामचंद्रांच्या नावाने देशात जे काही घडतं आहे ते पाहून प्रत्यक्ष रामचंद्रांनाही कदाचित त्यांच्या नावाचा खेद वाटेल. ‘रामाचं’ नाव घे म्हणून मारहाण करणारी, लोकांची हत्या करणारी कोण टोळकी आहेत? त्यांचा धर्म कोणता आहे? याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही मला एवढं ठाऊक आहे की ते रामाचे भक्त नाहीत. रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचे ते भक्त आहेत. आकाशात देव असतो असं आजी सांगायची.. तेव्हा खरं वाटायचं. गोष्टीतला, रामायण सीरियलमधला रामही किती आकर्षित करणारा होता हे शब्दात मांडणं कठीण आहे कारण तो अनुभवच होता. आजी म्हणायची त्याप्रमाणे राम जर आकाशातून ही सगळी स्थिती पहात असेल तर मी काय आदर्श घालून दिला होता? आणि लोक काय करत आहेत? रामराज्य आणण्याच्या नावाखाली कसा रक्तपात घडवत आहेत? हे प्रश्न त्याला नक्कीच पडले असतील. हे सगळं पाहून तोही त्याचं आकाश सोडून निघून गेलेला दिसतोय.

‘जय श्रीराम’चे नारे देऊन काय काय घडलं नाहीये या देशात? कल्पना केली तरीही अंगावर काटा येतो. अगदी मारहाण असो किंवा संसदेत नुकतेच दिले गेले नारे असोत. आता अनेक रामभक्त(?) म्हणतील तुम्हाला ‘अल्ला हो अकबर’चे नारे चालतात का? नाही.. तेही देणाऱ्यांच्या विरोधातच आहे मी.. असं विचारणाऱ्यांना एक उत्तर आवर्जून द्यावसं वाटतं.. त्यासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ सिनेमातला एक प्रसंग आठवतो, बादशहा खानला राकेश मारिया सांगत असतात, अरे टायगर मेमनने वापर केला तुमचा. कारण त्याला माहित होतं की तुमची ती लायकी आहे. धर्माच्या नावावर त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलं कारण तुम्ही मूर्ख आहात, तुम्हीच नाही तर तुम्हाला मारणारा तो प्रत्येक हिंदू मूर्ख आहे जो धर्माच्या नावावर तुम्हाला मारतो आहे. या सिनेमावरही बंदी घातली गेली होती.. हे संवाद आजही त्या सिनेमात आहेत. सिनेमा समाजाचं प्रबोधन करतो असं म्हणतात. पण हा सिनेमाही या मूर्खांना थांबवू शकला नाही. मग लक्षात आलं की प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र जिथे या कुणालाही थांबवू शकत नाहीत तर तिथे एक सिनेमा काय करणार?

निर्मोही आखाडा, राम मंदिर समिती, वक्फ बोर्ड, सुन्नी पंथ, शिया पंथ एक ना दोन.. अनेक लोक या वादात पडले आहेत. कोर्टात कुणीही माघार घ्यायला तयार नाही. अलाहाबाद कोर्टातून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी पाडली तेव्हा किती मारले गेले, त्यानंतरच्या दंगलींमध्ये किती मारले गेले? १९९३ च्या बॉम्बस्फोटात किती मारले गेले? या सगळ्या मृत्यूंना जबाबदार कोण? हे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. मात्र भांडण काही संपलेलं नाही. १५ व्या शतकापासून सुरु झालेला वाद ‘जैसे थे’ आहे. सुप्रीम कोर्टात आहे.. ज्याला जमेल तशी प्रत्येकजण राम मंदिर निर्मितीच्या आणि बाबरी मशिदीच्या वादाच्या तापल्या तव्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो आहे. हे किती काळ चाललंय? त्याला काहीही अंत नाहीच.. परवा तर नोबेल पुरस्कार विजेत्या अमर्त्य सेन यांनीही रामाच्या नावावरुन होणारी मारहाण योग्य नाही असं म्हटलंय. ज्यावर तुमचा विषय अर्थशास्त्र आहे तुम्ही त्यावर बोला भलत्या विषयात लक्ष घालू नका असा इशारा त्यांना देण्यात आला.. काय म्हणायचे याला? हा नेमका कसला माज आहे?

सुप्रीम कोर्टाने या बाबरी मशिद आणि राम मंदिर वादावर मध्यस्थांची समिती नेमली आहे. मध्यस्थांच्या समितीने १८ जुलैपर्यंत निर्णय दिला नाही तर २५ जुलैपर्यंत सुनावणी सुरु होईल असं कोर्टाने म्हटलं आहे. आतातरी ही सुनावणी शेवटची ठरावी आणि मंदिराचा वनवास संपावा अशी अपेक्षा आहे. मंदिर बांधण्याऐवजी तिथे सरळ एखादं रुग्णालय किंवा शाळा बांधावी, त्यात सगळ्या धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जावा असं माझं मत आहे इतका या वादाचा कंटाळा आला आहे. (हे मत अनेकांचं असू शकतं कदाचित) दुसरी बाब (ज्याची शक्यता अधिक आहे) जर मंदिर बांधयचा निर्णय झालाच तर लवकरात लवकर घेतला जावा आणि राम मंदिर निर्मितीचं काम सुरु व्हावं. ज्यामुळे ‘रामराज्य’ वगैरे निर्माण होईल की नाही माहित नाही. पण ‘जय श्रीराम’चे नारे दिले जातील, मोठमोठ्या घोषणाही दिल्या जातील पण आता जसं वारंवार रामाचं नाव घ्या नाहीतर हे करु किंवा ते करु असं धमकावल्यावर ‘हे राम’ म्हणण्याची वेळ येते तशी ती येणार नाही. कदाचित तुमच्या माझ्या देव्हाऱ्यातला आणि अयोध्येत झालेल्या मंदिरातला राम एकच होईल!

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com