जय पाटील

‘रसोडे में कौन था’ने उडवलेली धम्माल अजून विसरला नसाल ना? आता या प्रश्नाला प्रतिप्रश्न करणारी मालिका सोनी सबवर येऊ घातली आहे. ‘काटेलाल अँड सन्स’ नावाच्या या मालिकेतून लिंगभेदाला आणि त्याच्याशी वर्षानुवर्षं जोडल्या गेलेल्या समजांना प्रतिप्रश्न केला जाणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत प्रदर्शित झालं असून, त्यानिमित्ताने ट्विटरवर ‘व्हाय ओन्ली रसोडा’ हा हॅशटॅग व्हायरल झाला. जगात करण्यासारख्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना महिलांची जागा केवळ स्वयंपाकघरातच का? महिला इतर अनेक कामं सफाईदारपणे करतात, मग मालिका त्यांना कायम स्वयंपाकघरातच का डांबून ठेवू पाहतात, असे अनेक प्रश्न ट्विटराइट्सने त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत विचारले.

मालिकांतील सास-बहूची भांडणं नेहमीच अतिरंजित, भडक, अतिशयोक्त स्वरूपात रंगवली जातात. यशराज मुखाते या म्युझिक कंपोझरने स्टार प्लस वाहिनीवरच्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील कोकिलाबेन या पात्राच्या ‘रसोडे में कौन था’ या अशाच वर्गातील एका संवादालाच संगीत देऊन समाजमाध्यमांवर धमाल उडवून दिली होती. मालिकांतील अतिरंजिततेवर त्याद्वारे बोट ठेवण्यात आलं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद लाभला होता.

मालिकांमध्ये महिलांचं एका विशिष्ट चौकटीतलं चित्रण करण्यात येतं, त्यांना नेहमीच घरगुती कामांत, कारस्थानांत, हेव्यादाव्यांत अडकून पडलेलं दाखवलं जातं. ही चौकट भेदण्याचा प्रयत्न ‘काटेलाल अँड सन्स’ मधून करण्यात आल्याचं मालिकेच्या शीर्षक गीतातून दर्शवण्यात आलं आहे. ‘सपनों का जेंडर नहीं होता’ हा विचार त्याद्वारे पोहोचवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ‘व्हाय ओन्ली रसोडा’ हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला आहे आणि अनेक विनोदी मीम्स व्हायरल झाले.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये रसोडे में कौन था? असा प्रश्न करण्यात आला असून त्याला तू थी, मै थी, कौन था, ये राशी थी? असे त्या व्हायरल संवादातील भाग पर्याय म्हणून दिल्याची मीम्स केली आहेत. काहींनी ही नवी मालिका हा स्टार प्लस, कलर्स सारख्या वाहिन्यांसाठी आणि एकता कपूरसारख्या निर्मात्यांसाठी इशारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काहींनी चौकट मोडण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल सोनी सबचं अभिनंदन केलं आहे. रसोडा संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका स्टार प्लसवर ठेवत, आपल्या ट्विट्समध्ये या वाहिनीला टॅग करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

महिलांचं आयुष्य, त्यांचा भवताल, त्यांच्यापुढची आव्हानं घराच्या चौकटीबाहेर पडली त्याला जमाना लोटला. मालिका मात्र अजूनही हे वास्तव पचवायला शिकलेल्या नाहीत. व्हाय ओन्ली रसोडा, या ट्रेण्ड मधून नव्या पिढीने मालिकांच्या या मंदपणाची खिल्ली उडवली आहे. यातून मालिकांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी आणि त्या दाखवणाऱ्या वाहिन्यांनीही वेळीच धडा घेतलेला बरा. बाकी नव्या प्रेक्षकांसाठी नवी माध्यमं खुली आहेतच!