News Flash

BLOG: काळजाला भिडणारा मृदू आवाज हरपला!

गायक एस. पी. बालसुब्रण्यम यांचं निधन

समीर जावळे

‘ख्वाबोंमे तुम साँसो मे तुम रोजा… ‘हे त्यांचं गाणं ऐकलं… एकदा ऐकलं.. त्यानंतर शेकडोवेळा ऐकलं. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या रॉच्या अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीची आठवण येत असते. त्यावेळी तो ज्या आर्तता काळजापर्यंत भिडवली ती एस.पी. बालसुब्रण्यम यांच्या आवाजाने. अरविंद स्वामी, मधू यांची सुंदर केमिस्ट्री, ए. आर. रहमानचं संगीत आणि मणिरत्नमचं संगीत यांचा सुंदर मिलाफ असलेला सिनेमा होता ‘रोजा’. एस. पी. बालसुब्रण्यम यांनी गायलेलं ते गाणं अजूनही तसंच्या तसं मनात रुंजी घालतं आहे. असा हा जादुई आवाजाचा माणूस अनंतच्या प्रवासाला निघून गेला आहे. मागे उरल्या आहेत त्या फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांनी गायलेली अनंत गाणी. एक प्रतिभावंत गायक अशी त्यांची ओळख होती. ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे  एवढंच नाही तर एका दिवसात २१ गाणी म्हणण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

 

 

तमिळ, कानडी, हिंदी आणि मल्याळम या चारही भाषांमध्ये मिळून ४० हजारांपेक्षा जास्त गाणी एस. पी बालसुब्रण्यम यांनी गायली आहेत. लोण्यासारखा मऊ आवाज, स्पष्ट उच्चार, सूरांवर हुकूमत आणि गाणं म्हणण्याची हटके स्टाईल यामुळे त्यांची गाणी आजही आपल्याला आपलीशी वाटतात. १९६६ मध्ये त्यांनी गाणं गाण्यास सुरुवात केली. तेलगू सिनेमा श्री श्री श्री मर्यादा रामण्णा असं या सिनेमाचं नाव होतं. त्यांचे गुरु एस.पी. कोडानडपानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी कन्नड भाषेतलं गाणं म्हटलं. ते एक उत्तम डबिंग आर्टिस्टही होते. तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, संस्कृत या भाषांवर त्यांची उत्तम पकड होती. एक दुजे के लिये या सिनेमातून त्यांनी हिंदी गाणी गाण्यास सुरुवात केली. एक दुजे के लिये या सिनेमात कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांनी काम केलं होतं. कमल हसनला त्यांनी प्ले बॅक दिला. त्या सिनेमातलीही सगळी गाणी हिट ठरली. या सिनेमातील गाण्यांसाठी एस. पी. बालसुब्रण्यम यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.

एस. पी बालसुब्रण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ ला आंध्रप्रदेशात झाला होता. त्यांचे वडील एस. पी. संबमुर्ती हे हरिकथा सांगत, तसंच विविध नाटकांमध्येही काम करत होते. आपण कला क्षेत्रात यावं ही प्रेरण त्यांना वडिलांकडूनच मिळाली होती.

सागर या सिनेमात त्यांनी गायलेलं सच मेरे यार है.. हे गाणं गायलं हे गाणंही अनेकांच्या पसंतीस उतरलं. १९८९ मध्ये मैने प्यार किया हा सिनेमा आला. त्यात सलमान खानला त्यांनी प्ले बॅक दिला. त्या सिनेमातलीही सगळी गाणी हिट ठरली. बस तेव्हापासून सलमान खानचा आवाज म्हणजे एस. पी. बालसुब्रण्यम असं जणून काही समीकरणच झालं. जसं पूर्वी राज कपूर यांचा आवाज म्हणजे मुकेश असं समीकरण झालं होतं अगदी त्याचीच आठवण ९० च्या दशकात सिनेमा पाहणाऱ्या संपूर्ण पिढीला झाली. मैने प्यार किया सिनेमातली ‘आते जाते हसते गाते’ ‘आजा शाम होने आयी’ ‘दिल दिवाना बिन सजना के माने ना’ ‘आया मौसम दोस्ती का’ अशी एकाहून एक सरस गाणी त्यांनी गायली. सोबतीला लता मंगेशकर यांचाही आवाज होताच. मैने प्यार किया है या सिनेमातील प्ले बॅकसाठी बालसुब्रण्यम यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

 

मात्र या सिनेमानंतर सलमान खानला त्यांनी अनेक सिनेमात प्ले बॅक दिला. मग ते ‘पत्थर के फूल’मधलं ‘कभी तू छलिया लगता है’ असो किंवा ‘तुमको जो देखतेही प्यार हुआ’ गाणं असो सगळी गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी ठरली.  ‘लव्ह’मधलं ‘साथिया तुने क्या किया’, ‘जागृती’मधलं ‘हवामें क्या है खुशबू है’, साजनमधली बहुत प्यार करते हैं, तुमसे मिलने की तमन्ना, देखा है पहली बार साजन की आँखोमें प्यार ही त्यांची गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत.

अंदाज अपना अपना या सिनेमात आमिर आणि सलमान एकत्र होते. एक धमाल सिनेमा अशी या सिनेमाची ओळख आहे. या सिनेमातही सलमानला प्ले बॅक दिला तो बालसुब्रण्यम यांनीच. १९९४ मध्ये आला हम आपके हैं कौन आला. या सिनेमात १२ पेक्षा जास्त गाणी होती. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची जोडी. सलमानला एस. पी. बालसुब्रण्यम यांचा आवाज. सूरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असं परफेक्ट रसायन या सिनेमातही जमून आलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलं. यातली दीदी तेरा देवर दिवाना, पहला पहला प्यार है, धिकताना, मौसम का जादू है मितवा, जुते दो पैसे लो ही गाणी आजही आपल्याला आठवतात.

 

 

या सगळ्या दशकात एस.पी. बालसुब्रण्यम हे फक्त सलमानलाच प्ले बॅक देत होते असं नाही. खास उल्लेख करावा लागेल तो वंश या सिनेमातील आके तेरी बाहोंमे या गाण्याचा आणि गर्दिश या सिनेमातल्या हम न समझे थे बात इतनीसी या गाण्यांचा. गर्दिश सिनेमात वडील मुलाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. दोघांमध्ये आधी असलेलं प्रेम त्यानंतर झालेले मतभेद हे अभिनयाने जिवंत केले ते अमरिश पुरी आणि जॅकी श्रॉफ यांनी..तर मुलाला वाटणाऱ्या भावना आर्त स्वरात काळजाला भिडवल्या त्या एस.पी. बालसुब्रण्यम यांनी. एवढंच नाही तर हमसे है मुकाबला या सिनेमात त्यांनी प्रभू देवाच्या मोठ्या भावाचंही काम केलं. ‘प्रेमिकाने प्यार’से जो भी कह दिया…हे गाणं ज्यांनी ऐकलं आहे आणि पाहिलं आहे ते कुणीही विसरुच शकत नाही. एस. पी. बालसुब्रण्यम यांनी अनेक सिनेमांमध्ये अभिनयही केला होता. तसंच ते एक उत्तम डबिंग आर्टिस्टही होते.

आपल्या आवाजाची जादू वैविध्यपूर्ण गाण्यांमधून लोकांच्या काळजाला हात घालण्याची हातोटी एस.पी बालसुब्रण्यम यांच्या सूरांमध्ये होती. अत्यंत मृदू आवाज आणि इतर आवाजांपेक्षा जपलेलं आपल्या आवाजाचं वेगळेपण यामुळे गायक एस. पी. बालसुब्रण्यम हे कायम आपल्या आठवणींमध्ये राहतील यात काहीही शंका नाही. आकाशात अढळपद मिळवलेला ध्रुवासारखा तारा कोसळला तर काय वाटेल? तशाच काहीशा भावना एस. पी. बालसुब्रण्यम यांच्या निधनाने संगीत विश्वात निर्माण झाल्या आहेत. अनंताच्या प्रवासाला गेलेला हा गायक त्याच्या गाण्यांमधून आपल्या स्मृतींमध्ये अनंत काळ राहिल… त्याचे सूर आपल्याभोवती त्याच ताकदीने रुंजी घालतील हेच या माणसाचं वेगळेपण ठरलंय..

sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 3:03 pm

Web Title: special blog on singer sp balasubrahmanyam his songs and films scj 81
Next Stories
1 BLOG : समालोचकांवर ‘ट्रोल’धाड
2 BLOG : संजू सॅमसनवर आपण अन्याय करतोय का??
3 चिरतरुण मैत्रीण आशालता
Just Now!
X