News Flash

BLOG :शिक्षण, बुद्धिमत्ता आणि आपली समज

प्रशासनाचे आदेश धुडकवण्यामागे शिक्षित वर्गच जास्त आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

डॉ. अनुश्री खैरे

शिक्षण आणि हुशारी किंवा आपली उपजत समज आणि बुद्धिमत्ता अर्थाअर्थी फारसा संबंध असतोच असे म्हणता येणार नाही. याचे कारण सध्याच्या परिस्थितीत लोक कसे वागताहेत हे आपण बघतोय. खरं तर बुद्धी अधिक प्रगल्भ व्हावी, माणसाची समज वाढावी हा शिक्षणाचा उद्देश. वास्तविक हे खरेही आहे. पण बदलणाऱ्या काळाच्या संदर्भानुसार शिक्षण हे नोकरी मिळवण्याचे साधन झाले आणि गुणवत्ता हरवत गेली. प्रगल्भता तर सोडाच, पण माणूस म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टीं जसे संवेदनशीलता, सहानुभूती, सहनशीलता, सहृदयता यांपासून ही आपण दूर जात आहोत. हे विशेषत्वाने जाणवले.

परवा एका वृत्तवाहिनीवर बीड जिल्ह्यातील पाटोदा गावाचे सरपंच  भास्करराव पेरे यांची मुलाखत पहिली. तसे त्यांना आधीही बरेचदा ऐकले होते आणि त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचीही मनापासून इच्छा आहे. भास्करराव पेरे यांनी सर्वसामान्य माणसांना काय हवे याचा अभ्यास केला. अतिशय कुशलतेने उपलब्ध साधनसामग्रीचा, आपल्या बुद्धिकौशल्याचा, कल्पकतेचा वापर गावासाठी केला. त्यांच्या गावाविषयी बोलायचे तर सर्वांना सोलरचे गरम पाणी मोफत मिळते, वर्षभर गिरणीतून दळण मोफत मिळते, गावातील अंतर्गत रस्ते पेव्हर ब्लॉकने तयार केले आहेत आहेत. महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळतात. घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. या आणि अशा अनेक सोयी, सुविधा देण्याचे काम त्यांनी केले आणि करत आहेत.

सध्या जगभर करोनाचा धुमाकूळ सुरू आहे. हा धोका त्यांनी वेळीच ओळखला आणि करोनाच्या बाबतीतही योग्य ती पावले काळजीपूर्वक आधीच उचलायला सुरूवात केली. त्यांचे शिक्षण पाहिले तर फक्त सातवी पास आहे. मग प्रश्न पडतो गावाचा विकास, जनहिताची कामे, लोकांचे प्रबोधन यासाठी नेमके काय हवे असते ? इच्छाशक्ती, दूरदृष्टी हेच ना … यावरूनच लक्षात येते की गावाचा किंवा आपल्या विभागाचा विकास करणे हे तेथील नेतृत्वास सहज शक्य असते पण त्यासाठी लागणारी दृष्टी, कल्पकता आणि बुद्धिमत्ता या गोष्टी जर सत्तेवर येण्यासाठी तिथल्या नेतृत्वाने गहाण टाकल्या तर विकास या विषयाशी निगडित पुढील राजकीय, सामाजिक समीकरणं बदलतात. यातूनच स्व -विकास केंद्रित सत्ता अस्तित्वात येताना दिसते. यामुळेच विकास खुंटतो, असे हे दुष्टचक्र गेली कित्येक वर्षे लोटली तरी चालू आहे.

या जागतिक महामारीच्या काळात, करोनामुळे लोकांमधील वागणुकीचे संदर्भ कसे आहेत, याचे विश्लेषण केले असता  यावरून असे लक्षात येईल की मागास समजल्या जाणाऱ्या बीड, उस्मानाबाद, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या कोविडचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. कारण अडाणी किंवा मागास समजले जाणारे लोक सर्व नियम काटेकोरपणे पाळताना दिसतात.

प्रशासनाचे आदेश धुडकवण्यामागे शिक्षित वर्गच जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात मॉर्निंग वॉकला जाणारा, विनाकारण एखादी चक्कर मारून येणारा सुशिक्षित वर्गच आहे. १०० टक्के लॉककडाऊन असताना जीवनावश्यक वस्तू मिळणं बंद असताना धोका पत्करून बांधकाम चालू ठेवणारे, लग्न आणि मयताच्या ठिकाणी मनाई असताना देखील गर्दी करणारे बहुतांशी लोक शिकलेलेच असतात.  वरील दोन्ही उदाहरणांवरून हेच लक्षात येते की आरोग्य , राजकीय वा कोणतेही संदर्भ असो आजचे शिक्षण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय विकासासाठी निश्चितच कमी पडत आहे.

(ब्लॉग लेखिका डॉ. अनुश्री खैरे या प्राध्यापिका आहेत )

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 9:20 pm

Web Title: special blog on situation in corona outbreak and lockdown
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनानंतर शिक्षणक्षेत्रात ‘या’ पाच प्रकारे परिवर्तन घडून येईल
2 BLOG : लेकराला परत गावात येऊ द्या!
3 शेवटचं स्थलांतरण!
Just Now!
X