धवल कुलकर्णी

सध्या भारतावर फक्त करोना व्हायरसचं संकट आहे असं नाही. देशावर आणि समाजावर सुद्धा एक भयंकर संकट घोंगावू लागला आहे ते म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाच. दिल्लीत तबलीगी जमातने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे करोनाचा फैलाव देशभरात झाल्याचे लक्षात येताच हा धार्मिक विद्वेष भलताच वाढू लागला आहे. करोना जिहादसारख्या संकल्पना जन्माला घालून या इस्लामोफोबियाला खतपाणी घातले जात आहे.

या अशा सामाजिक वातावरणामध्ये हिंदू आणि मुस्लीम समाजात वाढत जाणारी दरी बुजवण्यासाठी आणि बहुसंख्य असलेल्या समाजाला समजून घेऊन त्यांच्या मनात मुसलमानांविषयी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे. कारण तसे झाले नाही तर त्याचे रुपांतर पुढे भीती आणि द्वेषात होते. त्यामुळे ते दूर करण्यासाठी लिबरल मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी समाजातल्या पुरोगामी वर्गातून होऊ लागली आहे.

“कुठलीही आपदा आली तर माणूस, मग हिंदू असो अथवा मुसलमान त्याच्या मनात एक फोबिया निर्माण होतो. हा फोबियाच त्याला सैरभैर करतो. देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी अज्ञान आहे आणि ते अगदी आधीपासूनच. हे दोन्ही समाज गेली जवळजवळ चौदाशे वर्ष जरी एकत्र राहत असले तरीसुद्धा मुसलमानांबद्दल हिंदूंना अगदी बेसिक माहिती सुद्धा नाही. एखादी संस्कृती किंवा लोक समूह यांच्याबाबत अज्ञान असले तर मग त्याचे रूपांतर हळूहळू अविश्वास आणि भीती मध्ये होऊन शेवटी त्याची जागा द्वेषाने घेतली जाते,” असे हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे तरुण कार्यकर्ते आणि पत्रकार समीर दिलावर शेख सांगतात.

या आणि त्याला अनुषंगून इतर विषयावरती समीर शेख ट्विटरवर व्यक्त झाले होते. त्यांच्या या व्यक्त होण्याला अर्थातच हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाकडून प्रतिसाद मिळाला आणि शेख यांच्या पारड्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया पडल्या हे वेगळे सांगायला नको.

लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना शेख म्हणाले की “अज्ञानातून निर्माण झालेली ही भीती आणि द्वेष यांचा पगडा समाजावर काही काळा पासून जरी असला तरी त्या भावना काही काळ सुप्त रूपाने व्यक्त होत होत्या. मात्र सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या संकटात माणसं paranoid झाली आहेत आणि मुस्लिम द्वेषाला खतपाणी मिळते आहे.”

त्याचबरोबर आपण आपला स्वतःचा समाज कसा सुधारता आहोत हे दृश्य स्वरूपामध्ये दाखवण्याची जबाबदारी लिबरल मुस्लिमांनी उचलावी. यातून हिंदूंचे हळूहळू मन परिवर्तन होणे शक्य आहे. आधी आत्मपरीक्षण करून आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि नंतर त्याप्रमाणे सुधारणा कराव्यात. मात्र सध्या समाजामध्ये एकूणच वाढत असलेल्या मुस्लिम समाजाबाबतच्या विद्वेषामुळे समाजाला आत्मपरीक्षण करणे मुश्कील होऊन बसले आहे. हा समाज एका victimhood च्या पातळीवर जाऊन पोहचला आहे. तरीसुद्धा याच्यावर मात करून समाजाने अंतर्मुख व्हावे आणि सुधारणा कराव्यात. हिंदू मध्ये मुसलमान बाबतचे अज्ञान सुद्धा दूर करावे. मुस्लिम समाजाबाबत विखारी प्रचार केला जात आहे हे जरी सत्य असले तरी सुद्धा याचा मुकाबला कोरोणा चे संकट दूर झाल्यावर सुद्धा केले जाऊ शकतो.

ताबलिघी जमातीच्या प्रकारामुळे ही मुसलमानांबद्दल बाबतची भीती आणि अज्ञानाला खतपाणी घातले जात आहे. त्यात पुन्हा मुस्लिम समाजा बाबतचे व्हिडिओ हे जाणून-बुजून समाज माध्यमावर पसरवले जात आहेत. मालेगाव मधल्या एका टिक टोक स्टार’ला नाशिक पोलिसांनी अटक केली कारण तो नोटावर आपली थुंकी टाकत होता. त्याच वेळेला काही खोटे व्हिडिओ सुद्धा पसरवण्यात आले. एका व्हिडिओमध्ये एक मौलवी अन्नामध्ये थुंकत असल्याचा भास होतो. वास्तविक पाहता कुठलाही मोठा कार्यक्रम असला तर मुस्लिम समाजामध्ये अन्न कमी पडू नये म्हणून आणि बरकत व्हावी यासाठी दुवा म्हणजेच प्रार्थना करून त्या मध्ये फुंकण्याची प्रथा आहे. पण व्हिडिओमध्ये हे धर्मगुरु अन्नामध्ये थुंकत असल्याचा भास होतो, असे शेख म्हणाले.

सध्या लिबरल मुसलमान एका फार विचित्र पेचात अडकले आहेत. कारण एकीकडे देशात बहुसंख्याक वाद वाढत असताना मुस्लीम द्वेषही वाढीला लागला आहे. मात्र सध्याच्या काळामध्ये लिबरल मुस्लिमांनी बहुसंख्याकांना समजून घेऊन त्यांच्या मनातला मुस्लीम समाजा बाबतचा अविश्वास दूर करावा असे शेख म्हणाले. अनेक बिनडोक मौलाना समाजाला असा चुकीचा संदेश देतात की हा मुस्लीम समाजासाठी परीक्षेचा क्षण आहे आणि परमेश्वर तुमच्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. या अशा लोकांचा मुकाबला करण्यासाठी करोनाचे संकट दूर होई पर्यंत मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे बंद करावेत. कारण अजान देण्यासाठी यांचा वापर केला जातो. इस्लाममध्ये  सामूहिक प्रार्थना ही सक्तीची आहे. अजान म्हणजे मुसलमानांनी मशिदीतून प्रार्थना करावी याच्यासाठी दिलेली एक हाक आहे. हा सायरन बंद झाला तर मशिदीत जाऊन सामूहिक प्रार्थना करण्यासाठीचा मुस्लीम समाजातल्या संवेदना सुद्धा निदान या काळापुरत्या कमी होतील.

शेख यांनी असे नमूद केले की मुस्लिमांची एकूण जीवनपद्धती ती करोनासारख्या विषाणूच्या संक्रमणासाठी पूरक आहे. उदाहरणार्थ दिवसातून पाच वेळा नमाज पडणे हे कुठल्याही मुसलमानासाठी सक्तीचे आहे. अर्थात सगळेच मुसलमान या सक्तीचे पालन करतात असे नाही पण बऱ्याचदा लोक सामूहिक नमाज पठणासाठी जातात कारण तसं करणं धर्माप्रमाणे सक्तीचे आहे. हेच सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर लोक एकमेकांचे दोन्ही हात हातात घेऊन अभिवादन करतात आणि काही लोक एक आदरार्थी भावनेने तेच हात तोंडाला किंवा छातीला लावतात. अनेकदा एकाच ताटातून  तीन किंवा चार लोक जेवण करतात.

तबलीगी जमात याची कुठली राजकीय किंवा सामाजिक भूमिका नाही आणि त्यांचा पूर्ण भर हा धार्मिक जागृतीवर आहे. तबलीगी मंडळी टीव्ही आणि What’s App  असलेले मोबाइल सुद्धा बाळगत नाहीत. सध्याच्या माहितीच्या युगात सुद्धा ते स्वतःला त्याच्यापासून जाणून-बुजून तोडतात. अर्थात त्यांचे असे म्हणणे आहे कि आम्ही हे विरक्ती साठी करतो कारण या गोष्टींच्या जाळ्यात  गुरफटलो तर आम्ही धर्मापासून आणि परमेश्वराच्या साधनेपासून अलिप्त होऊ. पृथ्वीवरचं आयुष्य कवडीमोल आहे अशी जमातीची समजूत असल्यामुळे त्यांच्या अनुयायांकडून कसल्याही प्रकारच्या आत्मपरीक्षण आला वाव नाही. यामुळेच तबलीगी जमातीला प्रचंड कडवा विरोध केला जातो तो मुस्लिम समाजाकडूनच. पर्यायाने या प्रथा परंपरांपासून लिप्त राहणार्‍या मुसलमानांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न  तबलीग जमातकडून केला जातो. एखादा cult म्हणावा असेच सर्व कॅरेक्टरस्टिक्स तबलीग जमात मध्ये आहेत. दारूसारख्या व्यसनातून सुटण्यासाठी बरेच मुसलमान त्यांच्याकडे आकृष्ट होतात तर गरीब घरातल्या काही मंडळींना तिथे जाऊन दोन वेळचे अन्न हवे असते.

जगात सर्वत्र मुस्लिम समाज असला तरीसुद्धा पाकिस्तान भारत आणि मलेशिया यांच्यासारख्या तबलीगी जमातीचे प्रस्थ असलेल्या ठिकाणी करोनाचा पहिला का झाला याचा सुद्धा विचार व्हावा असे शेख यांना वाटते.