जय पाटील

दिसला विषय की घाल वाद या ब्रिदाला स्मरून ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे आणि यावेळी मुद्दा आहे अनेकांचा जीव की प्राण असलेल्या बिर्याणीचा. बिर्याणीच्या उगमस्थानाचा वाद काही नवा नाही. या वादाला वरचेवर ‘दम’ दिला जात असतोच. आज हा ‘दम’ देण्यात आला आहे ‘बॉयकॉट तनिष्क’च्या पार्श्वभूमीवर.

तर झालं असं, की हिंदू सुनेचं डोहाळजेवण साजरं करणारं मुस्लिम कुटुंब दाखवणाऱ्या तनिष्क ज्वेलरीच्या जाहिरातीचा वाद सोमवारी ट्विटर आणि अन्यही समाजमाध्यमांवर चांगलाच गाजला. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याची टीका करत ती मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं. या पार्श्वभूमीवर पत्रकार सिमी पाशा यांनी बहिष्कारच घालायचा असेल, तर बिर्याणीवर घालून दाखवा, असं आव्हान देणारं ट्विट केलं आणि बिर्याणी नेमकी कोणाची या मुद्द्यावर नव्या वादाला तोंड फुटलं.

‘भात ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. मुघल जिथून आले तिथे भात पिकतंच नव्हता. त्यामुळे बिर्याणी हा त्यांचा पदार्थ असणं शक्यच नाही.’ ‘बिर्याणीत वापरले जाणारे सगळे मसाले भारतीय आहेत, मग बिर्याणी मुघलांची कशी? केवळ नाव बदलल्याने वास्तव बदलत नाही,’ असे दावे करण्यात आले. कोणाच्या मते ‘मुघल भारतात येण्याच्या खूप आधी- साधारण १५व्या शतकापासून दख्खन भागात बिर्याणी खाल्ली जात होती, त्यामुळे ती मुघलांची पाककृती असण्याची शक्यताच नाही.’ काहींनी म्हटलं आहे की, ‘बिर्याणी हा खरंतर पारसी पदार्थ आहे. हा शब्द देखील फारसी भाषेतून आला आहे. केवळ पर्शियन लोकांनी नंतर इस्लामचा स्वीकार केला, म्हणून त्यांच्या परंपरेतील सर्वच गोष्टी इस्लामशी जोडता येणार नाहीत.’

काहींच्या मते ‘बिर्याणी हा भारतीयच पदार्थ आहे, फारतर मुघल सैन्याने त्यात काही बदल केले असं आपण म्हणू शकतो.’ काहींनी म्हटलं आहे की, ‘हिंदूंच्या पुलावलाच बिर्याणी हे फारसी नाव देऊन त्याचं इस्लामीकरण करण्यात आलं आहे.’ तर कोणाच्या मते ‘आयुर्वेदाने दागधान म्हणजेच बिर्याणी हे अयोग्य अन्न असल्याचं म्हटलं आहे.’ ट्विटरवर ‘संशोधकां’ना तोटा नाही. त्यातही धार्मिक मुद्दा म्हटला की अनेकांच्या प्रतिभेलाही धार चढते. त्याचं उत्तम उदाहरण या वादांच्या निमत्ताने मिळालं आहे.

एका ट्विटराइटने म्हटलं आहे की, ‘बिर्याणीमध्ये अनेकांच्या पाककृती एकत्र आल्या आहेत. बिर्याणी कोणाच्या बापाची नाही.’ त्याला रीट्विट करत सीमी पाशा म्हणतात, ‘तुमचं म्हणणं बरोबर आहे. तनिष्काच्या जाहिरातीतही बिर्याणीप्रमाणेच विविध संस्कृतींची मिलाफ दाखवण्यात आला होता. हा मिलाफ हेच भारताचं वैशिष्ट्य आहे.’ या सगळ्या गदारोळात खवय्यांची मात्र ‘आम खाओ, गुठलीयाँ मत गिनो,’ अशीच प्रतिक्रिया आहे.