सिद्धार्थ खांडेकर

 

ख्राइस्टचर्च कसोटी सामन्यात भारताला सात विकेट्सनी हरवून न्यूझीलंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. यापूर्वी २००२ मध्ये भारत न्यूझीलंडमध्ये याच फरकाने पराभूत झाला होता. भारताच्या पराभवाची काही प्रमुख कारणे अशी आहेत.

१. नाणेफेक

२००२ मधील दौरा आणि हा दौरा यांत काही विलक्षण साम्यस्थळे आढळतात. दोन्ही कसोटी मालिका प्रत्येकी दोन सामन्यांच्या होत्या आणि या चारही सामन्यांमध्ये किवींनी नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले! स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरणात आणि खेळपट्ट्यांवर जगातील सध्याच्या कोणत्याही फलंदाजी फळीची भंबेरी उडेल. भारताला अपवाद समजण्याचे कारण नाही. यंदाच्या मालिकेत एक किंवा दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकली असती, तर विराट कोहलीनेही गोलंदाजीच स्वीकारली असती आणि बहुधा न्यूझीलंडचीही फलंदाजी लटपटली असती. न्यूझीलंडमधील वातावरण इंग्लडमधील वातावरणाशी बरेचसे मिळते-जुळते आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाच पहिले सत्र सर्वाधिक आव्हानात्मक असते.

२. ढिसाळ फलंदाजी

एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकवता आले नाही. मालिकेत भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा होत्या मयंक अग्रवालच्या ५८! मालिकेत चारही डावांमध्ये मिळून केवळ चेतेश्वर पुजारालाच १०० पेक्षा अधिक धावा बनवता आल्या. परिणामी चार डावांमध्ये भारतीय धावा होत्या १६५, १९१, २४२, १२४. प्रत्येक विकेटसाठी सरासरी धावा होत्या १८.०१! इतकी खराब कामगिरी फलंदाजांकडून होत असल्यास गोलंदाज किती राबणार? पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, हनुमा विहारी असे अननुभवी फलंदाज भारतीय संघात होते. त्यांची कामगिरी बरी म्हणावी अशी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या सिनियर फलंदाजांची कामगिरी ठरली. एकालाही नांगर टाकून डाव सावरता आला नाही. नंतरच्या पाच किंवा चार फलंदाजांनी हाराकिरी केली या विधानात फार तथ्य नाही.

३. ‘विराट’ अपयश

३, १४, २, १९… एकूण धावा ३८, सरासरी ९.५०! या कोणा ११ व्या क्रमांकावरील फलंदाच्या नाहीत, तर विराट कोहलीच्या आहेत. केवळ धावा कमी आहेत हा मुद्दा नाही. विराट स्वतःच्या ‘अॅप्रोच’विषयी भयंकर गोंधळलेला दिसला. गरज होती तेव्हा सावधपणे न खेळता आक्रमकपणे खेळला आणि विकेट गमावता झाला. कर्णधाराचे हे गोंधळलेपण संपूर्ण संघातही दिसून आले. पहिल्या सामन्यातील अपयश समजण्यासारखे आहे. त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या कसोटीतही होण्याचे काही कारण नव्हते. विराट नेहमीच परिस्थिती पाहून अनुरूप खेळतो असा त्याचा लौकिक. या मालिकेत त्याला परिस्थिती पाहून त्याच्यात बदल करता आलाच नाही. ‘सेनापती गारद नि सैन्यात पळापळ’ असा प्रकार दिसला.

४. न्यूझीलंडचे नियोजन

अर्थात न्यूझीलंडच्या नियोजनालाही श्रेय द्यावेच लागेल. नाणेफेक आणि स्थानिक परिस्थतीची माहिती हा केवळ भाग. किवी कर्णधार केन विल्यमसन आणि त्यांच्या गोलंदाजांनी विशेषतः कोहली आणि पुजारासाठी स्वतंत्र डावपेच आखले होते, ज्यात ते अडकले. त्याचप्रमाणे भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मारा बोथट करण्याचे नियोजन संपूर्ण मालिकेत सातत्याने सुरू होते.

५. दुखापतग्रस्त भारत

भुवनेश्वर कुमार हा भारताचा सर्वोत्तम स्विंग गोलंदाज. न्यूझीलंडमध्ये अत्यंत प्रभावी ठरू शकला असता. पण दुखापतीमुळे तो दौऱ्यावरच जाऊ शकला नाही. रोहित शर्मा नुकताच कसोटी संघात स्थिरावू लागला होता. त्यालाही दुखापतीमुळे दौरा अर्धवट सोडून यावे लागले. इशांत शर्मा पहिल्या कसोटीत चांगला खेळला. जायबंदी झाल्याने दुसऱ्या कसोटीला मुकला. पृथ्वी शॉ, जसप्रीत बुमरा यांच्याही दुखापती पूर्ण बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही कसोटींमध्ये भारताला सर्वोत्तम फिट संघ खेळवता आला नाही.