17 January 2021

News Flash

BLOG : पोलीस झाले डिलिव्हरी बॉय…

इंग्लंडमध्ये थेम्स व्हॅली विभागाच्या पोलिसांनी बजावली भूमिका

सुनीता कुलकर्णी
एखाद्या कारणासाठी एखाद्या माणसाला अटक झाली तर पोलिसांनी काय करणं अपेक्षित असतं ? आपल्या कल्पनेप्रमाणे ते त्या माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन जातील, त्याच्यावरचे आरोप काय आहेत ते बघून पुढची कायदेशीर कारवाई वगैरे करतील. त्याच्या जवळच्या लोकांना फोनबिन करून कळवतील इत्यादी. पण इंग्लंडमधल्या पोलिसांची बातच न्यारी…

इंग्लंडमध्ये थेम्स व्हॅली विभागाच्या पोलिसांनी गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद वाटली म्हणून एक गाडी थांबवली. तो एक डिलिव्हरी बॉय होता. पोलिसांनी त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना, गाडीच्या विम्याची कागदपत्रं यांची मागणी केली. त्याने पोलिसांना हे तपशील दिले खरे पण ते बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तो नशेमध्ये असल्याचंही पोलिसांना आढळलं. हे सगळं कमी होतं म्हणून की काय त्याच्या गाडीचे टायर चांगल्या अवस्थेत नसल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे असे टायर असलेली गाडी चालवून त्याच्याकडून अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे त्याला अटक करण्याशिवाय पोलिसांकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

इथपर्यंत सगळी कहाणी जगात कुठेही घडू शकणारी आहे. आपल्याकडे तर पावलोपावली असे प्रकार आढळतात. पण त्यानंतर घडलं ते खरंच नवल होतं. अटक करण्यात आलेली व्यक्ती अन्नपदार्थांचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होती. अटक करण्यात आली तेव्हा ती एका ठिकाणी डिलिव्हरी देण्यासाठी निघाली होती.

मग पोलिसांनी काय करावं? त्यांनी संबंधित माणसाला अटक केलीच, पण त्याच्या गाडीत असलेला डिलिव्हरीचा बॉक्स उचलून सरळ संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन त्याने दिलेल्या कबाबच्या ऑर्डरची डिलिव्हरीच करून टाकली. आपण अॅपवरून केलेली अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्यासाठी साक्षात पोलीस आल्याचं बघून तो ग्राहक फक्त बेशुद्ध पडण्याचंच बाकी होतं.

आजच्या जमान्यात आपण केलेली कुठलीही चांगली गोष्ट समाजमाध्यमांवरून ताबडतोब जगाला कळवून टाकायची असते. थेम्स व्हॅली पोलिसांनी ट्वीट करून ते शास्त्रही उरकून टाकलं. बनावट कागदपत्र, नशेचा अंमल, खराब टायर या सगळ्या कारणांसाठी आम्ही एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. आम्ही त्याला जिथून अटक केली तिथून त्याला डिलिव्हरी द्यायचं होतं ते घर अगदी जवळ होतं. त्यामुळे आम्ही त्या पार्सलची डिलिव्हरीही करून टाकली. पोलीसच डिलिव्हरी द्यायला आल्याचं बघून संबंधित ग्राहक आश्चर्यचकीत झाला. त्याने आमचं तोंड भरून कौतुक केलं.
असं ट्वीट थेम्स व्हॅली पोलिसांच्या ट्वीटर हॅण्डलवर प्रसिद्ध झाल्यानंतर
त्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला.

एकजण लिहितो, ‘तुम्ही ज्याला ती पार्सलची डिलिव्हरी दिलीत, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला मला फार आवडलं असतं.’

एक नागरिक लिहितो, ‘ही आहे थेम्स व्हॅली पोलिसांची ग्राहकसेवा. अशी सेवा जगात कुठेच मिळणार नाही.’
‘लोकांचं संरक्षण करायचं आणि त्यांना खायलाही घालायचं… उत्तम आहे तुमची सेवा’
‘पोलिसांनी अशी डिलिव्हरी देणं हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे’

अशाही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

‘या सगळ्या झटापटीत कबाब कसे खराब झाले नाहीत?’, ‘त्या ग्राहकाने कबाब थंड झाले होते म्हणून पोलिसांविरुद्ध कस्टमर केअरकडे तक्रार केली नाही हेच नशीब समजा’, ‘थंड कबाब मिळाले म्हणून त्या ग्राहकाला रिफंड मिळाला की नाही? असे विनोदही अनेकांनी केले आहेत.दुसरीकडे पोलिसांच्या या कार्यक्षमतेचं गारुड अनेकांच्या मनातून अजूनही उतरायला तयार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 9:30 pm

Web Title: special blog on uk police scj 81
Next Stories
1 BLOG : ‘वेल डन मुंबई पोलीस’ ट्रेंड
2 BLOG: Definitely Not म्हणणारा धोनी IPL 2021चं आव्हान पेलू शकेल?
3 Blog : अरविंद बाळ नावाचे ब्रह्मवाक्य
Just Now!
X