समीर जावळे

हृषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य यांच्याच काळात आणखी एक दिग्दर्शक कार्यरत होते ज्यांचं नाव होतं बासू चटर्जी. सामान्यांचं जगणं, त्यांच्या कथा, त्यांच्या समस्या सगळं काही रुपेरी करणारे म्हणजेच रुपेरी पडद्यावर आणणारे दिग्दर्शक म्हणून त्यांचा लौकिक होता. होता हे क्रीयापद त्यांच्या नावापुढे लागलं कारण आहे त्यांचा झालेला मृत्यू. मात्र त्यांनी जे काम सिनेसृष्टीत करुन ठेवलं आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी आणि त्यांचे चित्रपट हे कायमच मनात राहतील. Blitz या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरु केली. पुढे सिनेमांचं दिग्दर्शन करायला लागल्यानंतर कुंचला बाजूला पडला. मात्र त्यांच्यातला व्यंगचित्रकार कायमच सजग राहिला. त्यांच्या चित्रपटांमधून त्यांनी समाजातल्या व्यंगांवर भाष्य केलं. तिसरी कसम या राज कपूर यांच्या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन केलं. तिथून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

१९७२ ते १९९७ अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द होती. हलका फुलका सिनेमा, साधी सरळ कथा आणि सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांमधून होणारी विनोदनिर्मिती हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. पिया का घर, चितचोर, ‘छोटीसी बात’, ‘स्वामी’, ‘प्रियतमा’, ‘सफेद झुठ’, ‘चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’, ‘एक रुका हुआ फैसला’ मंजिल, मन पसंद, अपने पराँये, कमला की मौत हे आणि असे एकाहून एक सरस सिनेमा देणारे बासूदा कायमच स्मरणात राहतील.

१९७२ ते साधारण पुढची वीस वर्षे ही व्यावसायिक सिनेमाच्या दृष्टीने एकाच अभिनेत्याची होती. त्या अभिनेत्याचं होतं अमिताभ बच्चन. त्यांची जादू एक वर्ग आजमावत होता. मात्र या व्यावसियक चित्रपटांच्या जोडीने समांतर सिनेमाकडे झुकतील तरीही हलकेफुलके आणि मनोरंजन करणारे वाटतील असे सिनेमा बासू चटर्जी देत राहिले. १९७५ मध्ये जेव्हा शोले सिनेमाची चर्चा होती तेव्हा बासू चटर्जी यांच्या छोटीसी बातचे प्रमुख अभिनेते हे अमोल पालेकर होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. अमोल पालेकरांनी त्याच्या चितचोर, रजनीगंधा या सिनेमांमध्येही काम केलं. मूळचे व्यंगचित्रकार असलेल्या बासू चटर्जी यांना सामान्य माणूस हा कायमच जवळचा वाटला. त्यामुळे त्यांची कथा ही लार्जर दॅन लाईफ हिरो असणाऱ्या चित्रपटांची नव्हतीच. ती तुमची आमची कथा होती. त्यामुळेच त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमा आजही स्मरणात आहेत.

एक रुका हुआ फैसला

बासू चटर्जी यांच्या सिनेमांमधला मास्टरपीस असं जर वर्णन करायचं असेल तर ते एक रुका हुआ फैसला या सिनेमाचंच करता येईल. एक खून होतो. त्यातला खुनी हा खरंच खुनी आहे की नाही यासाठी ज्युरी नियुक्त केले जातात. दीपक केजरीवाल, अमिताभ श्रीवास्तव, पंकज कपूर, एस. एम. झहीर, सुभाष उद्गाता, हेमंत मिश्रा, एम. के. रैना, के. के. रैना, अन्नू कपूर, सुब्बराज, शैलेंद्र गोयल, अझीझ कुरेशी या दिग्गज कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत. एका रात्रीचा हा सिनेमा आहे. बुद्धीभेद करणारा आणि पहिल्या फ्रेमपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा असं याचं वर्णन करता येईल. हा सिनेमा पाहणं म्हणजे एक अनुभव आहे. या सिनेमात अभिनेत्री नव्हती. होते ते १२ कसलेले कलावंत. अशा प्रकारचा प्रयोग करण्याचं धाडस हे बासू चटर्जींनी ऐंशीच्या दशकात दाखवलं यावरुनच त्यांना त्यांच्या शैलीवर किती विश्वास होता हे स्पष्ट होतं.

 

‘छोटीसी बात’
‘छोटीसी बात’ या सिनेमातला नायक हा थोडासा बुजलेला आहे. तो एका मुलीवर प्रेम करतो. मात्र तिच्याजवळ ते प्रेम व्यक्त करण्याची हिंमत त्याच्यामध्ये नाही. मग तो काय काय करतो? कोणत्या आव्हानांना तोंड देतो. त्याचं प्रेम कसं मिळवतो या सगळ्याची रंजक गोष्ट या सिनेमात आहे. अमोल पालेकरांनी या सिनेमातला नायक साकारला आहे शिवाय अशोक कुमार, असरानी आणि विद्या सिन्हा यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमातली गाणीही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘न जाने क्यूँ..’ हे गाणं असेल किंवा ‘जानेमन-जानेमन’ हे गाणं असेल आजही ते गाणं आणि त्या अनुषंगाने दक्षिण मुंबईचं झालेलं सुखद दर्शन या दोन्ही गोष्टी या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरल्या.

रजनीगंधा
‘रजनीगंधा’ या सिनेमात प्रेमत्रिकोण होता. या सिनेमातली नायिका दीपा तिच्या मित्रावर प्रेम करत असते. ते दोघे लग्नही करणार असतात. मात्र अचानक तिच्या समोर तिचा एक्स बॉयफ्रेंड येतो. त्यामुळे ती गोंधळात पडते. या गोंधळातून काय गंमत होते, काय काय प्रसंग येतात ते या चित्रपटात मांडलं गेलंय. या सिनेमातही अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांच्या मुख्य भूमिका होत्या.

बातो बातोमें
या सिनेमातही अमोल पालेकर यांनीच नायकाची भूमिका साकारली होती. टीना मुनीम या सिनेमात नायिका होत्या. अमोल पालेकर म्हणजेच टोनी आणि आणि टीना मुनीम नॅन्सी यांच्यात प्रेम जमतं. ते दोघे एकत्र लोकलने प्रवास करत असतात. अशात दोघांचं प्रेम लग्नापर्यंत येऊन ठेपतं तेव्हा टोनी नकार देतो. त्यानंतर नॅन्सीची आई काय करते? या सगळ्यातून कशी विनोदनिर्मिती होत जाते ते दाखवण्यात आलं आहे.

दिल्लगी
‘दिल्लगी’ या सिनेमात होते धर्मेंद आणि हेमा मालिनी. सिनेमाचा नायक रणवीर (धर्मेंद्र) मुंबईत एक व्यावसायिक म्हणून जम बसवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात तो यशस्वीही होतो. मात्र त्याला काय अडचणी येतात? त्यातून कशा गंमती घडत जातात हे अत्यंत साधेपणाने या सिनेमात मांडलं गेलं आहे. तुम्हाला आम्हाला भेडसावणाऱ्या समस्याच या सिनेमतल्या रणवीरलाही भेडसावत असतात. या समस्यांमधून कशी विनोद निर्मिती होते ते दाखवण्यात आलं आहे.

चमेली की शादी

‘चमेली की शादी’ या सिनेमात अनिल कपूर आणि अमृता सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. चमेली अर्थात अमृता सिंह एका कोळसा वखार मालकाची मुलगी आहे. तर अनिल कपूरने या सिनेमात चरणदास ही व्यक्तीरेखा साकारली आहे. या दोघांमध्ये प्रेम जमतं. जेव्हा त्यांच्या घरातल्यांना याबाबत समजतं तेव्हा दोघांच्या लग्नाला अर्थातच विरोध होतो. मात्र यानंतर सिनेमा एक मस्त वळण घेतो. पुढे काय काय घडतं ते आपल्याला पोट धरुन हसायला कसं भाग पाडतं हे सिनेमा पाहताना कळतंच. या सिनेमात पंकज कपूर, अमजद खान, ओम प्रकाश, अन्नू कपूर यांच्याही भूमिका होत्या

खट्टा मीठा

‘खट्टा मीठा’ या सिनेमाचा जॉनरही हलकाफुलका होता. राकेश रोशन, बिंदिया गोस्वामी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. देवेन वर्मा यांचीही या सिनेमात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमातले अनेक प्रसंग आपल्याला हसवतात. एक चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान आपल्याला मिळतं.

कमला की मौत

‘कमला की मौत’ या सिनेमाची कथा एका चाळीत घडते. कमला नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाआधीच गर्भवती राहते. ती हे सहन करु शकत नाही म्हणून आत्महत्या करते. त्यानंतर कमलाबद्दल चाळीत काय काय चर्चा रंगतात. चाळीत राहणाऱ्यांची कोणती गुपितं बाहेर येतात हे अत्यंत रंजक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. ‘कुमारी माता’ तिने केलेली आत्महत्या यासारखा गंभीर विषयही अत्यंत वेगळ्या पद्धतीने या सिनेमात हाताळण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्याच पातळ्यांवर हा सिनेमा वेगळा ठरतो. हसवतो आणि विचारही करायला भाग पाडतो. बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात पंकज कपूर, सुप्रिया पाठक, रुपा गांगुली, मृणाल कुलकर्णी, इरफान यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा आपलं मनोरंजन करतोच पण आपल्याला विचारही करायला भाग पाडतो. अवघ्या दीड तासाचा हा सिनेमा खूप काही सांगून जातो. तेही चॅटर्जी यांच्या स्टाईलने.

बासू चटर्जींनी त्यांचं वेगळेपण त्यांच्या सिनेमांमधून कायमच जपलं आहे. बासू चटर्जी यांनी हलक्याफुलक्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आणि वेगळ्या पद्धतीचे सिनेमा रसिकांसमोर आणले. समाजातल्या प्रश्नांवर, वास्तवावर भाष्य करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती. त्या शैलीत त्यांच्यातल्या व्यंगचित्रकार कायम डोकावत असे. त्यामुळेच त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही स्मरणात आहेत आणि कायम राहतील यात शंका नाही.

sameer.jawale@indianexpress.com