News Flash

BLOG : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण ?

मुख्यमंत्रीपदासाठी राज्यसभेतील नेते आणि सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेहलोत आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांच्या नावांवरही विचार झाला

संतोष प्रधान

काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस सरकार अल्पमतात गेले. कमलनाथ यांनी आपल्या जवळ बहुमत असल्याचा दावा केला होता. विधानसभेत शक्तिपरीक्षा करावी, असा आदेश राज्यपाल लालजी टंडन यांनी देऊनही काँग्रेस सरकारने वेळकाढूपणा केला. सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत शक्तिपरीक्षा करण्याचा आदेश दिला आणि त्याच्या आधी काही तास कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

नवा मुख्यमंत्री कोण ?
मध्य प्रदेशात भाजपला सत्ता मिळणार हे निश्चित झाले. मुख्यमंत्रीपदावर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची निवड होणे अपेक्षित असले तरी भाजपमध्ये सत्तासंघर्ष दिसतो. कमलनाथ यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी चौहान यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण बैठकीच्या आधी काही तास ती रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी करोनाचे कारण देण्यात आले. परंतु भाजपमधील सत्तासंघर्ष यामागे असल्याचे बोलले जाते.

मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप सरकारचे नेतृत्व शिवराजसिंग चौहान यांच्याकडे सोपवावे, असा मतप्रवाह दिसतो. कारण काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर करोनानंतर परिस्थिती सुधारल्यास जून महिन्यात पोटनिवडणुका होऊ शकतात. यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे आव्हान भाजपापुढे असेल. कारण काँग्रेसने जास्त जागा जिंकल्यास काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकतो. स्वातंत्र्यदिनी भोपाळच्या शासकीय कार्यक्रमात कमलनाथ मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा झेंडावंदन करतील, असा विश्वाास काँग्रेसने व्यक्त केला आहे.या  पार्श्वभूमीवर भाजपाला खबरदारी घ्यावी लागेल.

कोण आहे स्पर्धेत ?
भाजप नेतृत्वाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारविनिमय सुरू केला. शनिवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यात विविध पर्यायांवर चर्चा झाली. शिवराजसिंग चौहान यांच्याबरोबरच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचा संसदेचे अधिवेशन पार पडल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. तोमर आणि शिंदे हे दोघेही ग्वाल्हेर पट्ट्यातील आहेत. तोमर यांना मुख्यमंत्रीपद देऊन चौहान यांना राजकीयदृष्ट्या शह देण्याची खेळी सुरू असल्याचो बोलले जाते.

चौहान यांच्यावर खप्पामर्जी ?
शिवराजसिंग चौहान यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अपयश आले. भाजपला सत्ता गमवावी लागली. पराभवानंतर विरोधी पक्षनेते पदावर आपलीच निवड होईल या आशेवर चौहान होते. पण भाजप नेतृत्वाने चौहान यांना राजकीयदृष्ट्या शह दिला आणि विरोधी पक्षनेतेपद दिले नाही. त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपल्याला राष्ट्रीय राजकारणात रस नाही आणि मध्य प्रदेशातच काम करणार, असे चौहान वारंवार सांगत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शही ही जोडगोळी चौहान यांना अनुकूल दिसत नाही. मोदी आणि चौहान यांच्यात कधीच उत्तम संबंध नव्हते. यामुळेच पराभवानंतर चौहान यांना विरोधी पक्षनेतेपदावरही संधी देण्यात आली नाही.
मोदी यांच्याशी जमवून घेतल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानेच चौहान यांनी अलीकडे मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यास सुरुवात केली. नागरिकत्व सुधारणा कायदा करण्यात आल्यावर चौहान यांनी मोदी यांना देवाची उपमा दिली. पाकिस्तानातून स्थलांतरित होणाºया हिंदूंसाठी मोदी हे देव आहेत, असे उद््गार त्यांनी काढले होते.

अन्य नावांचाही विचार
मुख्यमंत्रीपदासाठी राज्यसभेतील नेते आणि सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेहलोत आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांच्या नावांवरही विचार झाला. बहुसंख्य आमदारांची शिवराजसिंग चौहान यांच्या नावाला पसंती असली तरी मोदी- शहा काय निर्णय घेतात यावर अवलंबून असेल

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 2:07 pm

Web Title: special blog on who will the next cm of madhya pradesh scj 81
Next Stories
1 व्हायरस – ‘करोना’चा आणि अस्वस्थतेचा !
2 Blog : निमित्त ‘कोरोना प्यार है’ चित्रपटाचे!
3 महाविकास आघाडीचा अजेंडा राबवताना तारेवरची कसरत निश्चित
Just Now!
X