समीर जावळे

वाघ बघायचा असेल तर लक फॅक्टर आणि पेशन्स दोन्ही लागतात. बऱ्याचदा वाघ बघण्याच्या हेतूने आपण जंगलात जातो खरं पण वाघ दिसतही नाही. तो दिसल्यावर त्याला कॅमेरात कसं टिपायचं? हे सुरुवातीला थोडं भीती वाटणारं ठरलं.. पण सरावले आणि चांगली फोटोग्राफर होऊ शकले असं दक्षा सांगते. दक्षा बापट या पश्चिम महाराष्ट्रातील वाईल्ड लाइफ फोटोग्राफी करणाऱ्या एकमेव महिला फोटोग्राफर आहेत. त्यांनी काढलेला गव्याचा फोटो हा नॅशनल जिओग्राफिकसाठीही सिलेक्ट झाला आहे. मागील आठ वर्षांपासून दक्षा वाईल्डलाइफ फोटोग्राफी करतात. त्यांचे वाईल्डलाइफ फोटोग्राफीचे अनुभव हे निश्चितच थक्क करणारे आहेत. जंगलात वाघ दिसला नाही तरीही लोकांनी जंगल बघणं आणि तिथे धमाल करणं मुळीच विसरु नये असंही दक्षा आवर्जून सांगतात.

पहिल्यांदा मी जेव्हा मुन्ना नावाचा वाघ पाहिला कान्हाच्या जंगलात त्यावेळी थोडी भीती मनात होती. वाघ कसा येतो, कसा चालतो ते माहित व्हायचं होतं. अगदी तीस फुटांच्या अंतरावर जेव्हा वाघ आला तेव्हा काळजात धडकीच भरली होती. वाघाच्या डोळ्यात गारुड असतं म्हणतात..त्यामुळे धडकी भरतेच. सुरुवातीला मी त्याचे जे फोटो काढले ते ब्लर आले. वाघ, बिबट्या यांचे फोटो पहिल्यांदा काढताना त्यांच्या बाबत मनात भीती होतीच. बिबट्याचंही दर्शन मला अगदी पंधरा फुटांवर झालं आहे. पण या सगळ्यातून निरीक्षणातून जाणवलं की वाघ हा अतिशय शांत आहे. तो हल्ला करण्याचं प्रमाण फारच दुर्मीळ आहे अशा शब्दांमध्ये दक्षाने तिचा पहिला अनुभव कसा होता हे सांगितलं.

यानंतर त्यांनी वाईल्डलाइफ फोटोग्राफीचं तंत्र अवगत केलं. मग फक्त मुन्ना वाघच नाही तर माया वाघीण, ब्लॅक पँथर, हत्ती, माकडं, चितळ, हरीण असे अनेक प्रकारचे फोटो त्यांनी कॅमेरात कैद केले. त्यांची कॅमेराशी झालेली मैत्री ही त्यांना नवनवे फोटो काढण्यास उद्युक्त करते. दक्षा यांच्या वडिलांकडून त्यांनी फोटोग्राफीची प्रेरणा घेतली. सुरुवातीला कुंभमेळा, स्ट्रीट फोटोग्राफी असं केल्यानंतर आपण वाईल्डलाइफ फोटोग्राफीच करायची ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. वाईल्डलाइफ फोटोग्राफीकडे वळल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

जिप्सीतून सफारी करत असताना माया वाघिणीचे फोटो काढले. तेव्हा लक्षात आलं की ती मायाच करते आपल्यावर. ब्लॅक पँथरचा फोटो काढायला मिळणं हा अविस्मरणीय क्षण ठरला असंही दक्षा सांगतात. काबिनी नॅशनल पार्कमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी गेलो होतो. त्यातली चौथी सफारी होती. तीन सफारींमध्ये एकच वाघ पाहिला होता. उत्सुकता होती ती ब्लॅक पँथरची.. ब्लॅक पँथर दिसला तर तो अनुभव कसा असेल हा प्रश्न मनात होताच. त्याआधी पाणवठ्यावर वाघ आहे असं लक्षात आलं. एक वाघीण आणि तिचे बछडे पाणी पित आहेत हे कळल्यानंतर तिथे त्यांचे फोटो काढले. त्यानंतर थोडेसे पुढे गेलो तर अलार्म कॉल सुरु झाले. स्पॉटेड डिअर म्हणजेच चितळ हरीण आणि माकडं जोरजोरात ओरडू लागली. गेल्या अनेक वर्षांपासून फोटोग्राफी करताना हे कॉल्स आम्हाला लक्षात येतात. काही सेकंदातच कळलं की इथे कुठलंतरी जनावर आहे. दहा मिनिटं थांबलो आणि तेवढ्यात ब्लॅक पँथरच बाहेर आला. तो दिसेल असं वाटलं नव्हतं.. पण त्याचं दर्शन सुखकर ठरलं. त्याचे फोटो काढण्यातला आनंद तर होताच पण त्याला पाहण्याचा आनंद काही औरच होता असं दक्षा सांगते.

 

ब्लॅक पँथर- (फोटोग्राफर-दक्षा बापट)

 

२०१८ मध्ये कान्हा नॅशनल पार्कमध्ये फोटोग्राफीसाठी गेले होते त्यावेळी लक्षात आलं की झुडुपात एक वाघीण आहे. आम्ही थांबलो थोड्यावेळाने वाघीण आली. तिच्यासोबत तिचे चार बछडेही होते. आम्ही आनंदात होतो की चला आपल्याला वाघाचे फोटो मिळाले. ब्रेकफास्ट पॉईंटला गेलो. पटकन ब्रेकफास्ट आटोपला आणि पुन्हा निघालो तेव्हा लक्षात आलं की काहीतरी हालचाल आहे. त्यामुळे आमच्या ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. तेव्हा लक्षात आलं की सकाळी ज्या वाघिणीचे फोटो काढले ती वाघीण रोडवर उभी होती. अर्धा तास निरीक्षणानंतर लक्षात आलं की ती दबा धरुन बसली होती. अत्यंत अनपेक्षित असताना आम्हाला आमच्या कॅमेरात शिकारही टीपता येणार होती. पुढच्या ३० मिनिटांमध्ये त्या वाघिणीने आमच्यासमोर चितळाची शिकार केली. त्याची हंट सीरिज तयार करु शकलो याचाही आनंद वेगळा होता असंही दक्षानं सांगितलं.

२०१२ पासून मी नॅशनल जिओग्राफिकची मेंबर आहे. त्यांनी युअरशॉट नावाचा एक प्लॅटफॉर्म अमॅच्युअर फोटोग्राफर्ससाठी तयार केला होता. त्यामध्ये मी फोटो पाठवत होते. अखेर २०१९ मध्ये गव्याचा फोटो निवडला गेला. त्याचा आनंद विशेष आहे. गवा आणि छोटीशी मैना यांचा जो फोटो आहे तो नॅटजिओने सिलेक्ट केला. त्या फोटोला जवळपास चाळीस हजार लाईक्स आले आहेत. मात्र इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मसाठीही काही फोटो सिलेक्ट झाले आहेत असंही दक्षा यांनी सांगितलं आहे.

नॅट जिओसाठी निवडण्यात आलेला फोटो – (फोटोग्राफर-दक्षा बापट)

 

इंदापूरजवळ जे भिगवण आहे तिथे पक्षी निरीक्षणसाठी गेल्या सहा वर्षांपासून जाते आहे. फ्लेमिंगो, रुडी शेल्डक असे खूप सारे पक्षी भिगवणला येतात. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने तर पर्वणी असते. २०१८ मध्ये पक्ष्यांची हालचाल खूप कमी होती. तेव्हा आम्ही पाहिलं की पक्षी मधेच एक पाण्यात पडला आहे. सुरुवातीला वाटलं की हे बदक आहे.. पण आम्ही त्याच्या जवळ गेलो तेव्हा लक्षात आलं की तो ऑस्प्रे नावाचा पक्षी आहे. त्याची मान वर होती आणि पूर्ण शरीर माशाच्या जाळ्यात अडकलं होतं. बोटीमध्ये कटर होतं. त्यामुळे नायलॉनच्या नेटमधून त्याची सुटका केली. त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली होती. त्याला आम्ही किनाऱ्यावर आणलं. त्यानंतर त्याने थोडा वेळ घेतला आणि आमच्यासमोरच तो उडाला. ऑस्प्रे नावाच्या दुर्मिळ पक्षाला वाचवल्याचं समाधान काही वेगळंच होतं असंही दक्षा सांगते.

माझ्या वाईल्डलाइफ फोटोग्राफीचे मेंटॉर आहेत ते सुधीर शिवराम. त्यांची फेसबुक व्हिडीओ ट्युटोरियल्स सबस्क्राईब केलं होतं. तसंच अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्या गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक लाइव्ह आणि व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत. त्यांच्याकडून मला याबाबतची खूप माहिती मिळाली असंही दक्षा सांगते. वाईल्डलाइफ फोटोग्राफी करणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एकमेव महिला फोटोग्राफर आहेत. त्यांच्या कॅमेरातून टीपले गेलेले फोटो हे त्यांच्या कौशल्याची साक्ष देतात यात काहीही शंका नाही. खरंखुरं जंगलबुक त्यांनी त्यांच्या कॅमेरात टिपलंय.