रवि पत्की

इंग्लंड मध्ये ४-१ असा पराभव झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून जी सारवासारव सुरू झाली आहे तिने क्रिकेट शौकिनांची दिशाभूल करण्याचा उद्योग संपलेला दिसत नाही. आमचा संघ कसा टॉप क्लास होता पण थोडक्यात पराजय कसा पदरात पडला असाच अजूनही सूर लावला जातोय. वरवरची कारणे सांगून मूळ कारणांची चर्चा होणार नाही अशी एकंदर व्यूहरचना दिसते. व्यवस्थापन काय मुद्दे मांडत आहे आणि त्याचे वास्तव काय हे तपासून बघू.

१) व्यवस्थापन म्हणते गोलंदाजांनी अद्वितीय गोलंदाजी केली पण फलंदाजांनी निराश केले.

वास्तव: ही मालिका गोलंदाजांचीच होती. सर्व परिस्थिती गोलंदाजीला पोषक होती. अशा परिस्थितीत विकेट काढता आल्या नसत्या तर नवल होते. बरमिंघमला ८७/७ आणि साउथहॅम्पटनला ८६ /६ अशी इंग्लंडची अवस्था केली असताना दोन्ही वेळेस शेवटच्या तीन चार फलंदाजांनी २५० पर्यंत स्कोर नेला.याचा अर्थ गोलंदाज चांगले आहेत पण मॅच विनिंग नाहीत.भारतीय क्रिकेट मध्ये धोनी कर्णधार झाल्यापासून एक ट्रेंड सुरू झाला. मुलाखतीत, पत्रकार परिषदांत गोलनदाजांच्या विरूद्ध बोलायचे नाही. भारतात फलंदाजांचे वारेमाप कौतुक होते पण गोलंदाजांना काहीच श्रेय दिले जात नाही असा मतप्रवाह होता. त्यामुळे फलंदाजांवर प्रश्न विचारले तरी त्याला बगल देऊन गोलंदाजांवर आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे सुरू झाले. भारतात भारतीय फलंदाज आधी धावफलकावर ४०० -५०० धावा लावतात आणि मग गोलंदाज २० विकेट काढतात हे लक्षात घेतले पाहिजे.भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाज सामना सेट करून देतात तसा इंग्लंडमध्ये तो गोलंदाजांनीच सेट करुन दिला पाहिजे.शेवटचे तीन फलंदाज गोलंदाजीसाठी पूर्ण पोषक असलेल्या वातावरणात १५० धावा करतात तिथे सामन्याचा निकाल लागलेला असतो.

तात्पर्य: भारतीय गोलंदाजी चांगली पण विजय खेचून आणणारी नाही.

२)व्यवस्थापन म्हणते कोहली सारखा कॅप्टन सापडणार नाही.

वास्तव:कोहली उदाहरण घालून देतो,सहकार्याना स्फूर्ती देतो,त्यांना सपोर्ट करतो,त्यांचे जाहीर कौतुक करतो. हे सर्व उत्तम नेतृत्व गुण आहेत.तो चांगला नेता आहे. पण तो चांगला कर्णधार आहे का?कर्णधारातले गुण दिसतात क्षेत्ररक्षणाच्या वेळेस. संघ फलंदाजी करत असतो तेव्हा नाही. ८७ /७ आणि ८६/६ असा इंग्लडचा स्कोर असताना कर्णधार म्हणून कोहलीची वेगळी कल्पकता दिसली नाही. क्रिकेट मध्ये जर- तरला स्थान नसते.पण मार्क टेलर किंवा नासिर हुसेन सारख्या धूर्त आणि कल्पक कर्णधारांनी ह्या स्थितीत प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढू दिले नसते. वीस वर्षाचा सॅम करन मोकाट सुटतो काय, बॅट फिरवतो काय आणि आपले खेळाडू बघत बसतात काय.सारेच अगम्य. फलंदाजाच्या मनात काय चालले आहे, कोणत्या वेगळ्याच फिल्ड पोजीशनवर क्षेत्ररक्षक लावून फलंदाजाला गोंधळात टाकता येईल वगैरे अनेक कल्पक युक्त्या वापरून कर्णधार आपला ठसा उमटवत असतो. कोहलीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा असे कर्णधाराची परीक्षा बघणारे क्षण आले तेव्हा कोहलीने निराश केले.

तात्पर्य : कोहलीने कर्णधार म्हणून बरेच शिकणे बाकी आहे.

३) समालोचक म्हणतात हा इंग्लंडचा सर्वात कमकुवत संघ होता आणि त्याला हरवायलाच हवे होते.

वास्तव: इंग्लंडला आफ्रिकेने,ऑस्ट्रेलियाने इंग्लंड मध्ये येऊन हरवणे वेगळे आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात इंग्लंड सारख्या कंडिशन्स असतात तसेच त्यांची गोलंदाजी एकदा प्रतिस्पर्ध्याला खाली पाडले की चितपट करते. समालोचकांनी उगाच भारतीय संघाला संभाव्य विजेता म्हणून अगदी चौथ्या कसोटी पर्यंत घोषित केले होते आणि प्रेक्षकांना आशेला लावले होते. इंग्लंडला घरेलू परिस्थितीत मिळणाऱ्या छोट्या छोट्या फायद्यांचा विचार कोणी केला नाही.दिवसाच्या कोणत्या वेळेस चेंडू जास्त स्विंग होतो, प्रत्येक खेळपट्टीवर स्लीपच्या क्षेत्ररक्षकाने नेमके किती पुढे उभे राहावे,कोणत्या खेळपट्टीवर हुकचा फटका फाईनलेगला हातात जाईल का लॉंगलेगला ह्याच्या खडानखडा माहितीचा फायदा इंग्लंडला मिळणार होताच.मोक्याच्या क्षणी तो मिळालाच. मोईनची अश्विन पेक्षा चांगली गोलंदाजी,वोक्स आणि करन यांची फलनदाजी ही घरेलू फायद्याची उदाहरणे.

तात्पर्य: भारतीय संघाला या इंग्लंड संघाला इंग्लंड मध्ये हरवणे अवघडच होते.

ज्या इंग्लिश विकेट्सवर चेंडू सोडण्यात फलनदाज विशेष पारंगत लागतो त्या विकेट्सवर भारताने खेळलेले पहिले तीन पैकी दोन फलंदाज टी २० चे सुद्धा स्पेशलिस्ट आहेत. इंग्लंडचे टी २०चे पहिले तीन फलनदाज जेसन रॉय,हेल्स आणि बटलर आहेत त्यातले दोघे कसोटी संघात नाहीत आणि तिसरा कसोटीत ६. नंबरला येतो. टी २०चे ओपनिंग चे फलनदाज घेऊन इंग्लंड मध्ये कसोटी जिंकायला निघालेल्या भारतीय संघाचे कौतुक वाटते.
संघनिवड हा तर विनोदी विषय झाला आहे. खेळपट्टीवर सर्वात जास्त टीकणाऱ्या पुजाराला पहिल्या सामन्यात डच्चू तर स्पिन आणि बाऊन्स चांगला मिळणाऱ्या जडेजाला फक्तं शेवटच्या सामन्यात संधी.सगळंच अनाकलनीय. आयपीएलचे धनाढ्य संघ मालक राष्ट्रीय संघ निवडीवर नजर ठेवून असतात का हा ही कळीचा विषय आहे. संघ निवड फक्त गुणवत्तेवर आधारित नाही हे सिद्ध होत चालले आहे.

आता भारताने इंग्लंड मध्ये जाऊन इंग्लंडला कसे जेरीस आणले वगैरे चर्चा समालोचक,पत्रकार चालू करतील आणि ऑस्ट्रेलियात कशी भारताला संधी आहे वगैरे रेकॉर्ड चालू होईल.मग रवि शास्त्रीला संघाबद्दल अजून नवीन विशेषणे सुचतील,साक्षात्कार होतील.

आफ्रिका,इंग्लड,ऑस्ट्रेलियात तीन कासोटीची मालिका खेळणेच योग्य. तीन एक्षा अधिक कसोटीनंतर होणारी मनाची दमछाक भारतीय खेळाडूंना झेपत नाही हे वारंवार सिद्ध होतय.

sachoten@hotmail.com