विश्वास पुरोहित

द्रविड राजकारणाचे प्रणेते एम. करुणानिधी यांचे मंगळवारी निधन झाले आणि तामिळनाडूने गेल्या दोन वर्षांमध्ये आणखी एका लोकप्रिय नेत्याला गमावले. गेली कित्येक वर्षे तामिळनाडूतील सत्ताकेंद्र जयललिता आणि करुणानिधी या दोघांभोवतीच फिरत होते. तामिळनाडूतील हे प्रभावी नेते काळाच्या पडद्याआड गेल्याने तेथील प्रादेशिक राजकारणात पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी आगामी निवडणुकांमध्ये कोण भरुन काढणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता आणि करुणानिधी या दोघांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली. जयललिता चार वेळा तर करुणानिधी पाच वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. जयललिता या अभिनेत्री तर करुणानिधी हे लेखक. या दोघांनीही तामिळी जनतेच्या मनावर अक्षरश: राज्य केले. प्रादेशिक पक्ष असूनही दिल्लीच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. पण आता या दोन्ही नेत्यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात तामिळनाडूचे राजकारण रंजक वळणावर आले आहे.

अण्णाद्रमुकला गटबाजीचे ग्रहण
जयललिता यांचा करिष्मा होता…प्रतिमा होती आणि या आधारेच त्यांचा पक्ष टिकून होता. पण जयललिता यांच्या पश्चात पक्षाची अवस्था बिकट झाली, असेच म्हणावे लागेल. जयललिता यांच्यानंतर शशीकला यांनी पक्षाची धूरा हातात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांना तुरुंगात जावे लागले. यानंतर शशीकलांविरोधात बंड करणारे पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी हातमिळवणी केली. दोन्ही नेते एकत्र आल्यावर त्यांनी शशीकला यांचे पुतणे दिनकरन यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी केली. सध्या हा पक्ष तीन गटात विभागला गेला असून याचा फटका पक्षाच्या सदस्य नोंदणीवरही दिसून आला होता. जयललितांच्या काऴात दीड कोटी सदस्य असलेल्या या पक्षाचे सदस्य आता एक कोटींवर घसरले.

द्रमुकचे नेतृत्व स्टालिनकडे पण…
करुणानिधी यांनी जवळपास ५० वर्षे पक्षाचे नेतृत्व केले. हा एक विक्रम असला तरी आता करुणानिधी यांच्या पश्चात पक्षाची वाटचाल कशी असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. करुणानिधी यांच्या पश्चात पक्षाची धूरा त्यांचे चिरंजीव एम के स्टालिन यांच्याकडेच असेल, हे स्पष्ट झाले आहे. स्टालिन यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद निर्वेध जावं, त्यांना कुठल्या अन्य नेत्यांनी आव्हान देऊ नये म्हणून लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होण्याची अपेक्षा आहे.

२०१७ च्या सुरुवातीला स्टालिन यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. करुणानिधी यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता स्टालिन यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्यात आली तरी त्यांना आव्हान घरातूनच असेल. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पूत्र अळगिरी हे आगामी काळात काय भूमिका घेतात ?, यावरही बरीच समीकरणं अवलंबून असतील. अळगिरी यांनी यापूर्वी स्टालिन विरोधात विधान केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. तर करुणानिधी यांची कन्या कनिमोळी हा स्टालिन गटातील आहे. त्यामुळे कनिमोळींकडून तूर्तास स्टालिन यांना धोका नाही.

रजनीकांत आणि कमल हसन पोकळी भरुन काढणार?
अण्णाद्रमुक आणि द्रमुक पक्षाची ही परिस्थिती असताना भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अद्याप तामिळनाडूत स्थान निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे आता रजनीकांत आणि कमल हसन यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली असून चाहत्यांच्या माध्यमातूनच रजनीकांत यांनी कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रजनीकांत यांनी अध्यात्मिक राजकारण करु, असे सांगितले आहे. तर कमल हसन यांनी देखील मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन करत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कमल हसन यांनी धर्मनिरपेक्षवादी भूमिका घेतली आहे. तामिळनाडूतील राजकारण आणि चित्रपटसृष्टीचे कनेक्शन पाहता हे दोन्ही अभिनेते आगामी काळात नेते होऊ शकतात. मात्र, चाहत्यांचे रुपांतर मतदारांमध्ये करण्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच त्या दोघांचा अभिनेता ते नेता हा प्रवास अवलंबून असेल.