सुरवातीलाच लेखाचं शिर्षक मराठीत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकायची हे वर्षानुवर्षाचे स्वप्न साकार झाल्याची अद्वितीय भावना व्यक्त करायला ह्या हिंदी वाक्यात जास्त हुंकार आहे असे वाटले म्हणून हिंदीचा आश्रय घेतला. हा विजय संपूर्ण भारताचा आहे त्यामुळे हा राष्ट्रीय आनंद व्यक्त करण्यास प्रांत, भाषा वगैरे कुठल्याही निकषाची गरज नाही असे वाटते. आज भारतीय क्रिकेटच्या माळकऱ्याला अखेर विठ्ठलाने सगुण, साकार दर्शन दिले. कुणीतरी सांगा हे स्वप्न नाहीये, सत्य आहे.

भारतीय क्रिकेटचा माळकरी हा भारतीय संघाबरोबर शरीराने अथवा मनाने वारीला निघतो. संघाचा प्रत्येक दौरा ही प्रत्येक खेळाडूबरोबर प्रत्येक चाहत्याची सुद्धा वारी असते. बॉल बाय बॉल, मॅच बाय मॅच तो चाहता मनाने संघाबरोबर असतो. उगाच सासवड पर्यंत वारीबरोबर चालत जातो मग एस.टी. ने पंढरपूरला पोहचतो असे नाही. रेडिओ समालोचनाच्या काळात ऑफिस मध्ये छोटा रेडिओ घेऊन जाणारा, नंतर टी. व्ही. च्या जमान्यात पहाटे उठून, मध्यरात्री जागून आणि आता स्मार्टफोनच्या जमान्यात क्रिकेटची एखादी वेब साईट चालू करून ऑफिस मध्ये समोर क्लाएंट बसलेला असेल तरी सुद्धा दर पाच मिनटानी ड्रॉवर मधला मोबाईल हळूच बघून “अजून सचिन आहे, विराटचे पुन्हा शंभर, अजून एक गेला (प्रतिस्पर्ध्याची अजून एक विकेट पडली) वगैरे ऑफिसभर ओरडून सांगणारा, त्या भारतीय क्रिकेटच्या माळकऱ्याला आज विठ्ठलाने अखेर सगुण, साकार दर्शन दिले. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेचा विजय म्हणजे त्या विठ्ठलाने विटेवरून उतरून माळकऱ्याला घट्ट आलिंगन दिल असेच म्हटले पाहिजेे. काही ज्येष्ठ माळकरी तर 71 वर्षे या क्षणाची वाट बघत होते. आमची वैयक्तिक 42 वर्षांची तपश्चर्या फळाला आली हे अतिशय नम्रपणे नमूद करतो. (पहिली ऑस्ट्रेलिया सिरीज रेडिओ वर 1977 ची ऐकली होती आणि सिलसिला सुरू झाला. आमच्या आधी हे स्वप्न जगलेले सर्व हयात आणि निरोप घेतलेल्या सर्व क्रिकेटवेड्या गहिऱ्या दोस्तांना आजचा दिवस समर्पित.

  • हा विजय निर्भेळ आहे

या विजयानंतर प्रत्येकाचं विश्लेषण चालू होईल.  काय परिस्थितीत विजय मिळाला,  अजून काय हवे होते, काय कमी पडले वगैरे उहापोह चालू होईल. पण अशा कुठल्याही बुद्धिभेदाला बळी न पडता या विजयाच्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. कारण हा विजय निर्भेळ आहे. 24 कॅरेट सोनं, 100 टक्के साजुक तुप, कोल्हापूरची मिसळ, वऱ्हाडातला ठेचा, पुण्याची बाकरवडी आणि आपलयाला अजून माहीत असलेल्या शुद्धतेच्या कोणत्याही  निकषावर 100 टक्के झळाळून उठणारा हा विजय आहे.  हा विजय येताजाता मिळालेला नाही.  सर्व फलंदाजांनी छातीवर, खांध्यावर, मांडीवर, हातावर, हेल्मेटवर घेतलेले 140 च्या वेगाचे चेंडू या दिग्विजयाची साक्ष पटवून देणारे आहेत. सर्व गोलंदाजानी दाखवलेला अत्त्युच दर्जाचा संयम आणि कौशल्य हे अथक परिश्रमातून आणि विजिगिशु वृत्तीतून आलेले आहे.  गुडघ्याच्या वर चेंडू न येणाऱ्या पिचेसवर खेळण्याची सवय असणाऱ्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात एकदम जुळवून घेणे सोपे काम नाही. पहिल्या  कसोटी पासूनच लक्षात आले होते की आधी ऑस्ट्रेलिआच्या दौऱ्यावर येऊन गेलेले कोहली,रहाणे, पुजारा,विजय ,राहुल सारख्या फलंदाजांना ऑस्ट्रेलिआचा बाऊन्स खूप आवडतो पण अगरवाल, पंत, विहारी वगैरे नवीन फ्लनदाजाना देखील जलद बॅटवर येणाऱ्या चेंडूमुळे बॅटींगचा विलक्षण आनंद मिळत होता. एकदा का भितीचा अंमल गेला आणि आनंदाचा संचार वाढला की यश येणे स्वाभाविक  होते. उसळी घेणाऱ्या टकाटक पिचेसवर  वाहवत न जाणे जितके फलंदाजांना आवश्यक होते तितकेच गोलनंदाजाना देखील होते, त्यामुळे गोलंदाजांचे विशेष कौतुक वाटले. आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या तिन्ही दौऱ्यातून भारतीय गोलंदाजांनी सातत्याच्या अभावाचा अडथळा दूर केल्याचे लक्षात आले.

  • निवडी योग्य झाल्या

शेवटच्या दोन सामन्यासाठी संघ निवड योग्य झाली. ज्या एक दोन चुकीच्या निवडींमुळे निकालावर परिणाम होत होता त्या दुरुस्त झाल्या आणि संघाचे संतुलन योग्य झाले.

  • लायनला शिकार करता आली नाही

नेथन लायनला अत्यंत सुरेख रणनीतीने खेळून पूर्ण बोथट केल्याने ‘भारत आता फिरकी गोलंदाजी नीट खेळत नाही’ ही तयार झालेलीे निराशाजनक प्रतिमा आता नष्ट होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाज फिरकीपटूंना क्रिज सोडून खेळणेच बंद झाले . होते त्यामुळे मोईन अली सुद्धा आपल्याला गुंडाळत होता. या मालिकेत लायनविरुद्ध गाजवलेली हुकमत तबियत खुश करणारी होती.

  • पुजारा आणि गोलंदाजानमुळे अशक्य ते शक्य झाले

 हा सांघिक विजय असला, सर्वांनी चोख काम केले हे खरे असले तरी मालिकेवर इम्पॅक्ट पुजारा आणि गोलंदाजांचा झाला हे सत्य आहे. 1981 च्या ऍशेस सिरीजला जसे बोथम्स-ऍशेस म्हटले जाते तशी ही मालिका पुजारा सिरीज म्हणून इतिहासात नोंद व्हावी इतके त्याचे योगदान मोठे आहे. हा विजय भारतीय क्रिकेटचा कंठमणी म्हणून ओळखला जाईल. वर्ल्डकप येतील आणि जातील. पण, क्रिकेटच्या एव्हरेस्टवर भारतीय झेंडा खरा फडकला तो आजच. आज भारतीय क्रिकेट संघाला पत्र लिहायचे ठरले तर ते पत्र एव्हढेच असेल.