X

Blog : विराट, करुण नायरला इंग्लंड फिरवायला घेऊन गेला होतास का?

पाचव्या कसोटीतही करुणला संधी नाहीच

Ind vs Eng – इंग्लंड दौऱ्यात भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकत मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. मात्र यानंतर वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये कसोटी मालिकेत स्विकारावा लागलेला पराभव भारतीय चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी मिळाली होती. मात्र संपूर्ण मालिकेत भारतीय संघ इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामनाच करु शकला नाही, आणि अखेरीस भारताला कसोटी मालिकेतही हार स्विकारावी लागली.

५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिल्या २ कसोटी गमावल्या. या पराभवानंतर भारतीय संघात अंतिम ११ जणांना मिळणारी संधी याविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या. अनेकांनी रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यावर टिकेची झोड उठवली. प्रत्येक सामन्यात संघ बदल करुन विराटने संघाची घडीच बसू दिली नाही. बरं, प्रत्येक सामन्यात संघबदल करुन विराटला अपेक्षित निकाल मिळाले का? तर याचं उत्तर नाही असंच मिळेल. मात्र या पराभवानंतर एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली असेल ती म्हणजे, टीम इंडियातील खेळाडूंमध्ये कोहली-शास्त्री जोडीविरोधात असलेली नाराजी. भारतीय संघातील एका खेळाडूने विराटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दाखवून.

पाचव्या कसोटी सामन्यात विराटला आपली ही चूक सुधारण्याची संधी आली होती. पहिल्या ४ सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या हार्दिक पांड्याला अंतिम सामन्यात वगळून नवोदीत हनुमा विहारीला संधी देण्यात आली. मात्र आपल्याच संघात असलेल्या करुण नायरचा विराटला विसर पडला की काय असं चित्र निर्माण झालंय. हनुमा विहारीच्या संघनिवडीवर सुनिल गावसकर यांच्यासह अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. संपूर्ण मालिकेत करुण नायरला एकही संधी मिळाली नाही. त्याची न झालेली निवड अनेक प्रश्न निर्माण करुन गेली आहे.

१) जेव्हा संघातले इतर फलंदाज अपयशी होत होते, त्यावेळी करुण नायरचा विचार का केला नाही?

२) ज्यावेळी संघात ६ फलंदाज खेळवण्याचा निर्णय झाला, त्यावेळीही करुण नायरचा विचार न करता हनुमा विहारीला का संधी मिळाली?

३) करुण नायरच्या क्षमतेवर शास्त्री-कोहली जोडीला विश्वास नाही का?

४) हार्दिक पांड्याला ४ संधी मग करुण नायरला एकही संधी का नाही?

५) करुण नायरला संधी द्यायची नव्हती तर त्याला इंग्लंड फिरवण्यासाठी नेलं होतं का?

यासारखे अनेक प्रश्न सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी विचारत आहेत. संपूर्ण मालिकेत फलंदाज निराशाजनक कामगिरी करत असताना, त्याच-त्याच खेळाडूंना संधी देऊन विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी नेमकं काय साध्य केलं तेच कळायला मार्ग नाही. विराटचा अपवाद वगळता एकही फलंदाज या मालिकेत चमकू शकला नाही. संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने याची कबुली दिली आहे. त्यामुळेच विराट हा एक उत्तम फलंदाज आहे, मात्र तो एक कुशल कर्णधार आहे का असाही प्रश्न आता चाहत्यांच्या मनात यायला लागला आहे.

करुण नायरप्रमाणे इतर खेळाडूंच्या बाबतीतही विराटचं हेच धरसोड वृत्तीचं धोरण दिसलं. पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजाराला संधी न देता लोकेश राहुलला जागा देण्यात आली. यानंतर दुसऱ्या कसोटीत पुजाराने संघात पुनरागमन केलं, दुसरीकडे खराब कामगिरीमुळे मुरली विजय तिसऱ्या कसोटीत संघाबाहेर गेला. ज्या कसोटीत जलदगती गोलंदाजांना संधी मिळणं गरजेचं होतं, तिकडे भारताने कुलदीप यादवला संधी दिली. या सर्व गोष्टी विराटच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. मालिका गमावल्यानंतर विराटसेना पाचव्या कसोटीत आपली पत राखण्यासाठी खेळेल, मात्र बुंद से गई वो हौद से नही आती ही म्हण विराटच्या बाबतीत खरी व्हायला नको म्हणजे मिळवलं.

  • Tags: ind-vs-eng, karun-nair, virat-kohli,