– सुनिता कुलकर्णी

‘टेडी बेअर ममा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगेरीमधल्या ६२ वर्षीय व्हॅलेरिया स्मिथ यांच्यापुढे टाळेबंदीच्या काळात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला; तो आहे त्या जमवत असलेल्या टेडी बेअरचं काय करायचं ?. त्या गोळा करत असलेल्या टेडी बेअरचं लहान मुलांना वितरण कसं करायचं हा प्रश्न आहे. टाळेबंदीच्या काळात हे वितरण न करता आल्यामुळे त्यांच्याकडे २० हजार टेडी बेअर झाले आहेत. त्यांनी ते सगळे नीट पॅकिंग करून ठेवले असले तरी त्यांच्यावर ज्यांचा हक्क आहे, त्या लहान मुलांपर्यंत ते लवकरात लवकर पोहोचावेत हीच त्यांची इच्छा आहे.

व्हॅलेरिया यांना लहानपणापासून टेडी बेअरची आवड होती. पण लहानपणी जिथे कपड्यांचा जास्तीचा एक जोड असणं कठीण होतं तिथे टेडी बेअर खेळायला मिळणं कठीणच होतं. लहानपणी टेडी बेअर हवा असायचा कारण त्याला मिठी मारली की आपल्याला त्याच्याकडून प्रेम मिळतं असं मला वाटायचं असं त्या सांगतात. पण थोडं मोठं झाल्यावर त्यांनी आपल्याला न मिळालेली टेडी बेअर इतर लहान मुलांना मिळावा या हेतूने टेडी गोळा करायला सुरूवात केली. गेली ४० वर्षे त्या सधन लोकांकडून टेडी बेअर गोळा करतात आणि गरीब मुलांना वाटतात. १३ हजार टेडी बेअर गोळा करून लहान मुलांना वाटल्याबद्दल त्यांना हंगेरी सरकारने पारितोषिक देऊन गौरवलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये सर्वाधिक टेडी बेअर जमवल्याबद्दल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे.

त्यांचं हे काम माहीत असल्यामुळे लोक त्यांना आपल्याकडचे नको असलेले टेडी बेअर पाठवतात आणि त्या स्वत:ही टेडी बेअर खरेदी करतात. लहान मुलांच्या नर्सरी, प्री स्कुल्स याबरोबरच त्या गरीब घरातल्या मुलांना ही टेडी बेअर वाटतात. लहान मुलांच्या संस्थांमध्ये टेडी बेअरचं प्रदर्शन भरवलं जातं. तिथं येऊन मुलं टेडी बेअरशी खेळतात.  ज्यांना खेळणी मिळत नाहीत, ज्यांना प्रेम मिळत नाही, ज्यांनापोटभर अन्न मिळत नाहीत, अशी मुलं तहानभूक हरपून टेडी बेअरशी खेळतात हे बघून मला बरं वाटतं असं व्हॅलेरिया सांगतात. आपल्याला लहानपणी जे मिळालं नाही ते इतरांना मिळावं यासाठी धडप़ड करणारी व्हॅलेरिया यांच्यासारखी माणसंच जग सुंदर करून जातात.