11 December 2019

News Flash

BLOG: Thackeray Movie: न पेललेलं ‘शिव’धनुष्य!

बाळासाहेबांसारखं दिसण्याची किंवा त्यांची नक्कल करण्याची गरज नसून बाळासाहेबांचा आत्मा असलेली शिवसेना चित्रपटात दिसत नाही!

– योगेश मेहेंदळे

काही व्यक्तींबद्दल असं म्हटलं जातं की “एकतर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता किंवा द्वेष करू शकता परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही” (Either you can Love them or Hate them; but you can’t ignore them). अशा व्यक्तिंमधली उत्तुंग व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तब्बल सहा दशकांचा काळ महाराष्ट्राच्या घराघरामध्ये अवीट ठसा उमटवणारं आणि शेवटच्या तीन दशकांमध्ये तर संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणाऱ्या बाळासाहेबांचं जीवन दोन अडीच तासांमध्ये पडद्यावर दाखवणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. संपूर्ण जग लोकशाहीचे गोडवे गात असताना, हिटलरला क्रूरकर्मा म्हणत असताना, सेक्युलर हा शब्द प्रत्येकाच्या तोंडात रामनामाप्रमाणे जपला जात असताना “असली लोकशाही मी मानत नाही”, “होय मी आहे हिटलर”, “बाबरी मशिद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे” असली वक्तव्यं जाहीरपणे करणारे बाळासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्व. बाबरी मशिदीच्या पतनासाठी जे कारणीभूत होते, त्यांनी ऐनवेळी चक्क हात वर केले आणि बाळासाहेबांनी सरळ कसलीही पर्वा न करता शिवसैनिकांची पाठ थोपटली. वास्तविक शिवसैनिक हे बाबरी मशिदीपर्यंत पोहचलेदेखील नव्हते आणि त्यांनी ती पाडायचा प्रश्नच नव्हता. परंतु राजकारणाचं हे टायमिंग असेल किंवा पारंपरिक राजकारणाला छेद देत आपला वेगळा ठसा जनमतावर उमटवण्याचं त्यांचं कौशल्य असेल, हे केवळ बाळासाहेबच करू जाणोत. म्हणून म्हटलं की, असं हे व्यक्तिमत्त्व दोन तासांमध्ये पडद्यावर दाखवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे.

बाळासाहेबांचं फोटोचरित्र राज ठाकरे यांनी प्रकाशित केलं तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, की मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही, शिवसेनेचं आत्मचरित्र हेच माझं आत्मचरित्र आहे. थोडक्यात शिवसैनिक आणि बाळासाहेब यांच्यातलं नातं हे अद्वैत आहे आणि या अद्वैताचं दृष्यरूप म्हणजे शिवसेना.. त्यामुळे बाळासाहेबांचं आत्मचरित्र म्हणजे केवळ बाळ केशव ठाकरे यांचं आत्मचरित्र नव्हे तर शिवसेनेच्या उभारणीमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचं ते आत्मचरित्र आहे. आणि बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल तन-मन-धनानं स्वीकारलेल्या अशा शिवसैनिकांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नाही तर कदाचित ती काही लाखांत जाईल. त्यामुळेच बाळासाहेबांना दोन अडीच तासांत पडद्यावर रंगवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं व आहे.

हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न कट्टर शिवसैनिक असलेले निर्माते संजय राऊत व बाळासाहेबांवर प्रेम करणारे गुणी दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी केला. परंतु खेदाची बाब म्हणजे हे शिवधनुष्य त्यांना पेलता आलेलं नाही. बाळासाहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं दर्शन या चित्रपटात होतच नाही. मादाम तुसाँच्या संग्रहालयात जसेजसे हुबेहुब मेणाचे पुतळे असतात, ते चालते बोलते केले तर कसे वाटतील असे नवाजुद्दिननं रंगवलेले बाळासाहेब वाटतात. बाळासाहेबांसारखा मेकअप केला, बाळासाहेबांच्या लकबी अंगीकारल्या, आणि बाळासाहेबांच्या आवाजाशी साम्य असलेल्या आवाजात चित्रपट डब केला की बाळासाहेब उभे राहतात हे त्रैराशिक सपशेल फसल्याचं हा चित्रपटात दिसून येतं. हे जसं ही भूमिका रंगवणाऱ्या नवाजुद्दिनचं अपयश आहे, तसंच दिग्दर्शक म्हणून अभिजित यांचं आणि मी हवं ते त्याच्याकडून करून घेतलंय असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांचंही अपयश आहे. बाळासाहेबांचे डायलॉग आहेत, पण त्यातून साधला जाणारा परिणाम नाही, शिवतीर्थावर शोभणारी भाषणं चक्क कोर्टात दाखवली आहेत पण ती अंगावर शहारा आणण्यात कमी पडतात, कृष्णा देसाईचा खून ते राज्यात सत्ता असा हॉलीवूडपटाला शोभेल इतका मसाला आहे, पण इतक्या सगळ्यातलं काय दाखवायचं हेच समजेनासं झाल्यामुळे येते ती फक्त घटनांची जंत्री, विकिपीडियावर वाचायला मिळते तशी! आख्खा चित्रपट संपला तरी बाळासाहेबांशी अद्वैत असलेली शिवसेना घडली कशी याची प्रचिती येत नाही. अपेक्षा होती की, बाळासाहेब ठाकरे समोर पडद्यावर दिसल्यावर कुणाची मान अभिमानानं ताठ होईल, कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कुणाच्या कपाळी चीडेची आठी येईल, कुणा शिवसैनिकाच्या मुठी वळतील, कुणी आठवणीनं हुंदका काढील, कुणी आज साहेब हवे होते असं म्हणत गदगदेल… थोडक्यात प्रेम केलं जाणाऱ्या किंवा द्वेष केला जाणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य तितक्या भावभावनांचं प्रकटीकरण होईल असं वाटलं होतं. परंतु राऊत नी पानसे यांना हे शिवधनुष्य न पेलल्यामुळे धड ना डॉक्युमेंटरी झाली धड ना सिनेमा घडला… आणि बाळासाहेबांचं, शिवसेनेचं वा शिवसैनिकांचं आत्मचरीत्र तर नक्कीच या चित्रपटात उलगडत नाही.

चित्रपटाच्या शेवटी To Be Continued… अशा ओळी येतात, म्हणजे कदाचित दुसरा भाग येण्याची शक्यता आहे. आशा आहे दुसऱ्या भागात अपेक्षा पूर्ण होतील. आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांच्यात एक साम्य होतं; ते म्हणजे त्यांची सगळी भाषणं, साहित्य निर्मिती प्रथम पुरूषी होती. म्हणजे त्यांनी कधी, “यांनी सांगितलं, अमक्याच्या सांगण्याप्रमाणे, तमक्याच्या मते” अशा भाषेत एक वाक्य देखील लिहिलं नाही. स्वत:वर दृढ विश्वास असल्याचं हे लक्षण आहे. बाळासाहेबांवरील चित्रपटाचं शिवधनुष्य तेव्हाच पेललं जाईल जेव्हा हा आत्मविश्वास पडद्यावर अवतरेल. त्यासाठी त्यांच्यासारखं दिसण्याची, त्यांच्या नकला करण्याची किंवा हुबेहुब आवाज काढण्याची गरज नसून बाळासाहेबांचा आत्मा असलेली शिवसेना चित्रपटात दिसायला हवी. कारण तेच त्यांचं खऱ्या अर्थी चरित्र आहे. आशा करूया दुसरा भाग येईल आणि ही उणीव भरून निघेल!

First Published on January 28, 2019 1:00 pm

Web Title: thackeray movie failed to create an impact
Just Now!
X