-सुनिता कुलकर्णी

आई-वडील आपल्या हातांचा पाळणा करून बाळाला जोजावताना सगळ्यांनीच बघितलं असेल, पण दोनच दिवसांपूर्वी दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोचं ६ इ १२२ हे आख्खं विमानच एका बाळासाठी आकाशपाळणा झाल्याची बातमी आहे. तीन तासांच्या या प्रवासात विमानातच एका प्रवासी महिलेची प्रसुती झाली. एका नव्या चिमुकल्या प्रवाशाला घेऊन विमान बंगळुरूला लॅण्ड झालं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात इंडोगोच्या कर्मचाऱ्यांनी बाळाचं स्वागत केलं. भारतामध्ये अशा पद्धतीने विमानात प्रसुती होण्याची ही पहिलीच घटना असून बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. त्यानंतर त्यांना विमानतळावरच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

इंडिगोचं हे विमान दिल्लीहून बंगळुरूच्या वाटेवर असतानाच आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या एका प्रवासी महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. सुदैवाने विमानात डॉ. शैलजा वल्लभानी या स्त्रीरोगतज्ज्ञ तसंच आणखी एक डॉक्टर प्रवासी होते. त्यांनी आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विमानात प्रसुती कक्ष उभा करत संबंधित महिलेला प्रसुतीसाठी मदत केली आणि विमानाच्या स्वच्छतागृहासमोरील मोकळ्या जागेत टँहँ करत या बाळाने या जगात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून फारच तत्परतेने जणू मिनी हॉस्पिटलच उभारलं आणि आपल्या प्रसंगावधानाचं उत्तम दर्शन घडवलं असं काही सहप्रवाशांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हवेत ३० हजार फुटांवर आमच्या विमानात जन्मलेल्या या बाळाचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे, असं लिहित इंडिगोने बाळाचे, त्याच्या आईचे आणि आपल्या संबंधित कर्मचाऱ्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात इजिप्त एअर फ्लाइट एमएस ७७७ या कैरोहून लंडनला जाणाऱ्या विमानातदेखील अशाच पद्धतीने हियान नस्र नाजी दाबन या येमेनी स्त्रीची प्रसुती झाली. तिला विमानाचा प्रवास सुरू असतानाच प्रसुतीकळा सुरू झाल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखत वाटेवर असलेल्या जर्मनीतील म्युनिच येथे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. पण विमान म्युनिचच्या धावपट्टीवर उतरण्याआधीच बाळाने जीवनाच्या धावपट्टीवर सुखरूप लॅण्डिंग केले होते.

या नव्या जीवाचे आपल्याशी असलेले ऋणानुबंध आणखी घटट् करत इजिप्त एअर फ्लाइट्सने त्याला त्यांच्या विमानसेवेने तहहयात कैरो ते म्युनिच हा प्रवास विनामूल्य असेल असं जाहीर केलं आहे.

आपल्याकडेही रेल्वेप्रवासादरम्यान जन्मलेल्या बाळांना रेल्वेचा प्रवास तहहयात विनामूल्य करता येतो म्हणे. इंडिगोनेही आपल्या विमानात जन्मलेल्या या बाळाला तहहयात विमानप्रवास विनामूल्य असल्याचे जाहीर करत त्याच्याबरोबरचं नातं दृढ केलं आहे.