– योगेश मेहेंदळे

जन्माला आलेला माणूस मरणार, नोकरी-धंदा कधी ना कधी सोडावा लागणार, संघातले खेळाडू कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी बाहेर जाणार, ही शाश्वत सत्यं आहेत. पण, शेवट गोड व्हावा का कटू व्हावा हे ठरवणं आपल्या हातात आहे. विशेषत: इतिहास घडवणाऱ्या थोरांना निरोप अत्यंत सन्मानानं, कृतज्ञतेनं द्यावा असं वाटणं काही गैर नाही. परंतु, एरवी कुणालाही डोक्यावर घेऊन नाचणारे भारतीय काही बाबतीत इतके कद्रू का होतात हेच समजत नाही. सचिन, सौरभ, द्रविड, सेहवाग, गंभीर असे अनेक दिग्गज भारतीय संघाची पताका हवेत फडकवत असताना या सगळ्यांना पुरून दशांगुळं वर उरणारा एक महारथी म्हणजे महेंद्र सिंग धोनी! यशानं मत्त न होणारा नी अपयशानं खचून न जाणारा धोनी म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचं विहंगम दृष्य. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप, चँपियन्स ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कप्तान असलेल्या धोनीनं कधीही आक्रमकतेची मर्यादा ओलांडली नाही. धोनीचं सगळं व्यक्तिमत्त्व व्यक्त होतं, त्याच्या खेळातून…

मोठ्या धावसंख्येच्या पाठलागाचं आव्हान असो किंवा स्टंम्पमागचं अफलातून क्षेत्ररक्षण असो एखाद्या शल्यविशारदाच्या सफाईनं धोनीनं अनेक खेळी अजरामर केल्या. टी-२० असो, वन डे असो वा कसोटी क्रिकेट धोनी कधी बावरलेला दिसला नाही. सचिन किंवा द्रविड वा विराटसारखी तंत्रशुद्धता नसूनही केवळ अथक प्रयत्नांच्या नी इच्छाशक्तिच्या जोरावर धोनीनं भरवशाचा फलंदाज असं स्थान अबाधित राखलं. धोनीचं मैदानात असणंच इतकं दिलासादायक असतं की डीव्हिलियर्ससारख्या अद्वितीय खेळाडूनं असं जाहीरपणे सांगावं की, धोनी ८० वर्षांचा झाला नी व्हीलचेअरवर असेल तरीही मी त्याला संघात घेईन… अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी धोनीच्या क्रिकेटिंग सेन्सला नी मैदानात स्वत:ला संघासाठी झोकून देण्याच्या वृत्तीला दिलेली ती दाद आहे. गेली बारा वर्षे भारतीय क्रिकेट धोनीशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हतं, परंतु आता ३७ वर्षांच्या धोनीनं किती काळ क्रिकेट खेळावं याला मर्यादा असणंही स्वाभाविक आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडलेला धोनी कमी सामन्यांच्या खेळातूनही लवकरच बाहेर जाईल हे उघड आहे. परंतु त्याची एग्झिट दोन चार सामने खेळून अपयशामुळे बाहेर फेकल्या गेलेल्या सुमार क्रिकेटपटूसारखी असावी का सचिन तेंडुलकरला वानखेडे स्टेडियमवर दिलेल्या निरोपसमारंभासारखी असावी, हे तर ठरवता येतं ना… सचिन तेंडुलकरसाठी सगळ्या दौऱ्यांची उलथापालथ करण्यात आली, काही संबंध नसलेल्या वेस्ट इंडिजला बोलावण्यात आलं, अपेक्षेप्रमाणं त्यांची धुलाई करण्यात आली आणि सचिनला एखाद्या सम्राटाप्रमाणे निरोप देण्यात आला. धोनी सचिनएवढा विक्रमांच्या बाबतीत थोर नसेल, परंतु दिग्गज म्हणावं इतक्या थोर धोनीच्या बाबतीत आपण काय केलं? तर एखाद्या लीव अँड लायसन्सवर राहणाऱ्या भाडेकरूला करारातील अटींचा दाखला देत अर्ध्या रात्री चंबूगबाळं आवरायला लावतात तसं बसवलं.

एकदा एका मोठ्या पराजयानंतर धोनीच्या घरावर संतप्त क्रीडाप्रेमींनी दगडफेक केली होती. त्यानंतरच्या मालिकांमध्ये धोनीनं शानदारपणे गतवैभव परत मिळवलं होतं. त्यावेळी त्याच्या पालकांची प्रतिक्रिया विचारायला जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेले तेव्हा धोनीचे वडील म्हणाले होते, “ज्यावेळी भारत हरला तेव्हा आम्ही दगड खाल्ले, आज जिंकल्यावर फुलं पडतायत. दोन्हींना फारसं महत्त्व द्यायचं नाही!” धोनीच्या वडिलांनी तेव्हा उत्साही नी बढाया मारणाऱ्या प्रतिक्रियेस लांब सारलं होतं. त्यांचाच मुलगा असलेल्या महेंद्र सिंगच्या वागण्याबोलण्यातही ही शालिनता दिसून येते. त्यामुळे धोनी स्वत: कितीही वाईट वाटलं तरी कधीच काही बोलणार नाही, जिथं संधी मिळेल, मग ती आयपीएल का असेना… तिथं स्वत:ला सिद्ध करत राहील. ज्यावेळी तिथले दिवसही भरतील तेव्हा तिथूनही बाहेर पडेल, कसोटीमधून बाहेर पडला तसा…

त्यामुळे प्रश्न तो निवृत्त कधी होणार हा नाहीये तर कसा होणार हा आहे. त्याला आपण पुरेसा सन्मान देत निवृत्त करतोय की आपल्या कद्रू मनोवृत्तीचं दर्शन घडवत एखाद्या दुय्यम खेळाडूप्रमाणे बाहेर घालवतोय… विंडिज नी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत धोनीला वगळायचा निर्णय ज्या पद्धतीनं घेण्यात आला ते बघता दुसऱ्या प्रकारची शक्यता जास्त वाटत्येय… असं तर नाही ना.. की महेंद्र सिंग धोनी हा झारखंडमधल्या रांचीसारख्या ठिकाणाहून आलाय म्हणून असं होतंय… पाठिराख्यांची पुरेशी लॉबीच नाहीये त्याच्याकडे… कुणी सांगावं… तो मुंबईचा वा दिल्लीचा असता… तर कदाचित वानखेडे वा फिरोजशहा कोटलावर रेड कार्पेटवर त्याला निरोप दिला असता!