-सुनिता कुलकर्णी

जवळपास २.५ अब्ज डॉलर्स कमावणारा सिलिकॉन व्हॅलीतील स्टार म्हणून एकेकाळी फोर्ब्जने ज्यांना मानांकन दिलं होतं, ते श्रीधर वेंबू ते सगळं झगमगतं जग सोडून गेल्या वर्षीच दक्षिण तमीळनाडूत परत आले. वेष्टी ही तिथली पारंपरिक लुंगी नेसून लहान मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करत एका सायकलवरून गावखेड्यांमध्ये फिरणाऱ्या या माणसाकडे बघितलं तर तो एवढं जग फिरून आला आहे असं चुकूनही वाटत नाही.

सहा महिन्यांपूर्वी टाळेबंदी सुरू झाली तेव्हा परिसरातील शेतमजुरांच्या तीन मुलांना त्यांच्या घरी जाऊन दोनतीन तास शिकवायचं या त्यांच्या उपक्रमाने आता अधिक व्यापक स्वरूप धारण केलं आहे. आता त्यांच्यासह चार शिक्षक मिळून ५२ मुलांना धडे गिरवायला मदत करत असून त्यातूनच ग्रामीण भागातील शाळेचं स्टार्टअपच सुरू झालं आहे.

ही शाळा मुलांना फक्त शिक्षणच देत नाही तर अन्नदेखील पुरवते. कारण भुकेल्या पोटी शिक्षण घेता येत नाही, हे वेंबू यांच्या लक्षात आलं आहे. त्यांची ही शाळा मार्क्स, डिग्र्या, पदव्या, सर्टिफिकेट्स या कशापेक्षाही निखळ शिक्षणावर भर देणारी शाळा आहे. तिच्या माध्यमातून सीबीएससी किंवा तत्सम इतर पारंपरिक व्यवस्थेशी कोणताही संघर्ष होणार नाही अशी शिक्षणव्यवस्था उभी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अर्थात हे सगळं वेंबू यांच्यासाठी नवं नाही. गेली दहा वर्षे सुरू असलेल्या त्यांच्या झोहो कार्पोरेशनच्या झोहो विद्यापीठाने १०, ११, १२ पर्यंत पोहोचून शिक्षण सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांवर काम करून त्यांना आयटी तसंच इतर व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

पण कोविड- १९ ने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे गावखेड्यातील आव्हानांचं स्वरूप बदललं असल्याचं सांगून ते त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर लिहितात, अनेक पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हतं. माझ्याकडे वेळच वेळ होता. त्यामुळे मी मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांना विज्ञान, गणित आणि इंग्रजी शिकवण्याचा निर्णय घेतला.

सोशल डिस्टन्सिंग पाळत तीन मुलांपासून सुरू झालेला त्यांचा वर्ग लवकरच २५ मुलांपर्यंत पोहोचला. या वर्गाने मला बरंच काही शिकवलं. शिकायला येणारी ही मुलं भुकेलेली असायची. पोटात अन्न नसेल तर डोक्यात कसं शिरणार… मग त्यांच्यासाठी दोन वेळचं जेवण आणि एक वेळचा नाश्ता ही व्यवस्था केली.

या सहा महिन्यांच्या उपक्रमातून त्यांना अनेक गोष्टी समजल्या. पारंपरिक शाळेत इयत्ता सातवीपर्यंत पोहोचलेल्या मुलांना इंग्रजी आद्याक्षरंदेखील येत नव्हती. ३०-४० किलोमीटरवर राहणारे शिक्षक जमेल तेव्हा शाळेत येऊन जात. या मुलांच्या पालकांकडे कायमच पैशांची तंगी असे. दारुड्या वडिलांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊन त्यांचे शिक्षण बंद होई. त्यात शिक्षणव्यवस्था खऱ्या ज्ञानापेक्षा मार्कांवर भर देणारी. मुलांना काय चांगलं येतं यापेक्षा त्यांना अपेक्षित चौकटीमध्ये बसवण्याची धडपड करणारी. आसपासची ही सगळी परिस्थिती जवळून बघितल्यानंतर वेंबु यांचा आपल्या झोहो विद्यापीठाच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदमच बदलला आहे.

२०१८-१९ या वर्षी आपल्या ५० दशलक्ष ग्राहकांबरोबर काम करून ३३०० कोटींचा महसूल उभा करणाऱ्या झोहो विद्यापीठाने आता टाळेबंदीच्या काळात तामीळनाडूच्या ग्रामीण भागात ५० हून अधिक कार्यालयं उभी केली आहेत. मूळच्या ग्रामीण भागातल्या पण आता शहरांमध्ये जाऊन काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी गावखेड्यात येऊन शिक्षण आणि शेती क्षेत्रासाठी योगदान द्यावं आणि त्याचा ग्रामीण भागातल्या गरीब मुलांना उपयोग व्हावा यासाठी यापुढ्च्या काळात झोहो विद्यापीठ काम करणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या अरूण जनार्दनन यांनी हे वृत्त दिले आहे.