05 December 2020

News Flash

TIME म्हणतं VOTE

त्याला कारणीभूत आहे, ३ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक

अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकाच्या अंकाचं मुखपृष्ठ.

-सुनिता कुलकर्णी

निवडणुका आल्या की आपल्याकडे सगळेचजण अंगात आल्यासारखे वागायला लागतात. काही माध्यमसंस्थादेखील त्याला अपवाद नसतात. विपरित परिस्थितीत काही माध्यमं कशी वागतात हे गेल्या काही महिन्यांमधल्या घडामोडींमधून आपण बघतो आहोत. अशा वेळी ‘टाइम’ या अमेरिकी वृत्त साप्ताहिकाने केलेली एक कृती जबाबदारीचं दर्शन घडवणारी तर आहेच शिवाय आपल्या लहानशा कृतीमधूनही किती मोठं विधान करता येतं हे दाखवणारी आहे.

गांभीर्याने पत्रकारिता करणारं साप्ताहिक म्हणून ‘टाइम’ हे न्यूयॉर्कस्थित अमेरिकी माध्यम जगप्रसिद्ध आहे. या वृत्त साप्ताहिकाने आपल्या अमेरिकी आवृत्तीच्या ताज्या अंकात TIME हा लोगो नेहमीच्या जागेवरून हलवला आहे आणि तिथे VOTE हा शब्द प्रसिद्ध केला आहे.

कोणत्याही ब्रॅण्डचं छापील नाव, त्याची जागा, रंग, आकार, टेम्पेट या गोष्टी अत्यंत नेमकेपणाने ठरलेल्या असतात. त्या कधीही उगीचच बदलल्या, हलवल्या जात नाहीत. कारण या सगळ्या गोष्टींशी त्यांच्या ग्राहकांचं, इथे वाचकांचं एक नातं जोडलेलं असतं. TIME असं म्हटल्यावर वाचकाच्या डोळ्यासमोर कोणती अक्षरं, रंग, त्यांची जागा येणार हे निश्चित असतं. मग टाईम साप्ताहिकाला TIME च्या लोगोची जागा बदलावीशी का वाटली? असं काय घडलं ?

तर त्याला कारणीभूत आहे, ३ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक. ती यावेळी अनेक अर्थांनी ऐतिहासिक असणार आहे. म्हणूनच अवघ्या तीनच वर्षांनी म्हणजे २०२३ मध्ये आपली शंभर वर्षे पूर्ण करत असणाऱ्या TIME ला आपल्या मास्टहेडची जागा बदलून त्या जागी VOTE हा शब्द छापावासा वाटला आहे. या ऐतिहासिक निवडणुकीसाठी जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं हे आवाहन त्यांनी अशा अभिनव पद्धतीने केलं आहे. त्याबरोबर त्यांनी केलेलं लेखी आवाहन आवर्जून वाचण्यासारखं आहे.

TIME साप्ताहिक म्हणतं…

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या माध्यमातून आपण जगाला ऐतिहासिक वळण देणारा ठरू शकतो अशा एका दुर्मिळ, निर्णायक क्षणाला सामोरे जात आहोत. आपण अशा बिंदूवर उभे आहोत की ज्यामुळे याआधीचं जग आणि यापुढचं जग पूर्णपणे बदलून जाणार आहे. आपल्या निर्णयाचा पुढच्या कैक पिढ्यांवर निर्णायक परिणाम होणार आहे. म्हणूनच जगाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक नुसती निवडणूक नाही तर ती जग पुढच्या काळासाठी कायमचं बदलणारी निवडणूक असू शकते. पुढच्या घटनांना दिशा देणारी, इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे. तेव्हा प्रत्येकाने यंदाच्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा हे अधोरेखित करण्यासाठी TIME साप्ताहिकाने जवळजवळ १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकी आवृत्तीच्या मुखपृष्ठावरचा लोगो त्याच्या जागेवरून हलवला आहे.

समाप्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 6:28 pm

Web Title: time magazine changes its name to say vote bmh 90
Next Stories
1 ट्रम्प-बायडन वादात ‘पेट्रोल’
2 BLOG: मेडिकल वेस्टमधून अवतरली दुर्गा
3 BLOG : दुखापती आणि चुकीचे निर्णय KKR ला महागात पडणार का??
Just Now!
X