News Flash

BLOG : टोनी ग्रेगचं बोचरं वक्तव्य आणि ‘फायर इन बॅबलॉन’चा जन्म !

हरभजनच्या त्या वक्तव्यामुळे जाग्या झाल्या आठवणी

– केदार ओक

क्रिकेटमध्ये पूर्वी वेस्टइंडीज उर्फ विंडीज असं होतं. गेल्या वर्षीपासून मात्र ‘विंडीज’ हे त्यांचं टोपणनाव नं राहता अधिकृत नाम झालं आहे. बाकी एव्हाना वेस्टइंडीज हे नाव इतकं रुळलं आहे की इतक्यात जीभेची सवय बदलेल असं वाटत नाही. अर्थात नाव बदललं तरी त्यांच्या खालावलेल्या कामगिरीत काहीही फरक पडलेला नाही. इथे आपण फक्त कसोटी आणि पन्नास ओव्हर्सच्या सामन्याबद्दल बोलतो आहोत कारण विंडीजचा टी-२० संघ मात्र लाजवाब आहे. वैयक्तिकरित्या बोलायचं तर विंडीजचा एक संघ म्हणून खेळणंच मला पटत नाही. वेस्टइंडीज बेटसमूहातल्या देशांनी अन्य खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही स्वतःचा वेगळा संघ काढावा कारण वेस्टइंडीज ह्या संयुक्त आघाडीला फार अर्थ राहिलेला नाही. खेळाडू, क्रिकेटबोर्ड कुणीही समन्वयाने काम करत नाहीयेत. राजकारणातल्या युतीहून इथली परिस्थिती फार वेगळी नाही. मूळ मुद्दा हा आहे की विंडीजला जरी असंख्य कारणांनी ग्रासलं आहे हे मान्य केलं तरी त्यांची मैदानावरची खराब कामगिरी सतत ठसठशीतपणे समोर येतेच. लढाऊ वृत्ती दाखवली तर किमान सहानुभूती तरी पदरात पडते पण सपशेल लोटांगण घातलं की कुणी विचारत नाही.

परवा विंडीजचा भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या हरभजनसिंगने अत्यंत बोचरं वक्तव्य केलं. एकेकाळी अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाचा दाखला देत हरभजनने सध्याचा वेस्टइंडीज संघ भारतातील रणजी ट्रॉफी खेळण्याच्या क्षमतेचा तरी आहे का अशा धाटणीचा टिवटिवाट ट्विटरवरून केला. त्यावर वेस्टइंडीजचा माजी गोलंदाज टिनो बेस्ट वैतागला आणि त्याने भज्जीला प्रत्युत्तर दिलं की – बाबारे, इंग्लंडकडून तुमचा संघ हरत होता तेव्हा तू असं काही बोलला नाहीस. आमचे खेळाडू नवखे आहेत, शिकतील हळूहळू.

कोणत्याही खेळात ही अशी टोमणेगिरी चालूच असते. मर्यादा रेषा ओलांडू नये असं सगळेच म्हणतात, पण गोची अशी आहे की ही मर्यादा फार पुसट असते आणि माणसागणिक, प्रसंगानुरूप ती बदलतही राहते. कधीकधी मात्र टोमणे, कुत्सित बोचरी टीका, अपमान भविष्यात काहीतरी मोठं, दिव्य घडवून आणू शकतात. त्यासाठी समोरची व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह तितका कणखर असावा लागतो. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे – You throw a stone at me, I will use it as a stepping stone. सध्याचा विंडीजच्या संघात ही आग केव्हा लागेल ते काळच ठरवेल पण अशीच आग ४२ वर्षांपूर्वी लागली होती आणि जन्म झाला – ‘फायर इन द बॅबलॉन’चा.

“वेस्टइंडीजचा संघ चांगला खेळत असतो तेव्हा खूप चांगला खेळतो पण जेव्हा नाही तेव्हा ते अक्षरशः हतबल होतात. We intend to make them grovel, अर्थात, आम्ही त्यांना दयेची भीक मागत लोळण घ्यायला लावू.” – टोनी ग्रेग. साल – १९७६.

टोनी ग्रेगची धबधब्यासारखी खळाळत वाहणारी, बऱ्याचदा अतिरंजित पण तरीही लोकांना तितकीच खिळवून ठेवणारी कॉमेंट्री. स्वतः खेळत असताना मात्र वर उल्लेखलेली वदंता त्याला फार महागात पडली. वेस्टइंडीजला सहजपणे हरवू असा अर्थ त्याला अपेक्षित असावा पण जीभेने दगा दिला आणि जे बोलायला नको होतं ते तो बोलून गेला.

१९७६ सालच्या वेस्टइंडीजच्या इंग्लंड दौऱ्याआधीची ही गोष्ट. ७५ सालचा पहिला वर्ल्डकप जरी त्यांनी जिंकला असला तरी ते काही सार्वभौम जगज्जेते नव्हते. एक चांगला संघ इतपत त्यांची ओळख होती. १९७६ च्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या लिली आणि थॉमसन द्वयीकडून तुफान मार खाऊन वेस्टइंडीजचा संघ एकदम गार पडला होता. पाठोपाठ भारताने वेस्टइंडीजमध्ये त्रिनिदादला ४०० हून अधिक धावांचा पाठलाग अगदी हसतहसत केला आणि मग मात्र वेस्टइंडीजचे खेळाडू भर थंडीतल्या सकाळी अंगावर गार पाण्याची बादली पडल्यासारखे खडबडून जागे झाले. आपली ताकद निव्वळ वेगवान गोलंदाजीमध्ये आहे हे वेस्टइंडीजच्या क्लाइव्ह लॉईडला उमगलं आणि पुढल्याच सामन्यामध्ये त्यानी भारताविरुद्ध जमैकाला रक्ताचा सडा सांडला. भारताचं नशीब थोर की मालिका तिथेच संपली. भारतीय संघ कसाबसा वाचला पण वेस्टइंडीजच्या नव्या अवताराचा खरा फटका इंग्लंडला मात्र बसायचाच होता. टोनी ग्रेगला तरी काय गरज होती चिडलेल्या हुप्प्याला वाकुल्या दाखवण्याची? आपल्या सिंघम सिनेमात एक भारी वाक्य आहे – कुछ भी करनेका लेकीन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करने का, बास. टोनी ग्रेगने नेमकं हेच केलं होतं. वेस्टइंडीजचा इगो दुखावला होता.

आपल्याला असं वाटेल की इतकं काय वाईट बोलला टोनी ग्रेग? प्रत्यक्ष खेळ चालू व्हायच्या आधी असे वाग्बाण नेहमीच सोडले जातात. पण टोनी ग्रेगच्या वाक्याला केवळ क्रिकेटपुरता अर्थ नव्हता. त्या ‘ग्रॉव्हेल’ ह्या शब्दाला ‘रेसिझम’ अर्थात वर्णभेदाची किनार होती. सामान्यतः पूर्वीच्या काळी असणाऱ्या काळ्या गुलामांच्या संदर्भात तो शब्द वापरला जात असे. म्हणूनच ग्रेगच्या वक्तव्याला मिळणारे प्रतिसादही तीव्र होते. गोरे विरुद्ध काळे असा सरळसरळ सामना रंगणार होता. टोनी ग्रेगचे शब्द वेस्टइंडीजच्या लोकांना जाळत गेले होते. आगीत तेल ओतायचंच काम त्याच्या हातून घडलं होतं. ते मुद्दाम झालं की चुकून झालं ह्याला आता काही अर्थ नव्हता, आग भडकली होतीच.

पाच कसोटी सामन्यांचा हा बहुचर्चित दौरा अखेर चालू झाला. पहिल्या दोन सामन्यात तोडीस तोड खेळ होत दोनही सामने अनिर्णित राहिले. वेस्टइंडिजकडे जुने जाणते खेळाडू होतेच पण तरुण खेळाडूंचाही अधिक भरणा होता. अँडी रॉबर्टस आणि मायकेल होल्डिंग ह्या सुपरफास्ट गोलंदाजांच्या जोडीला वेन डॅनिअल, व्हर्नबर्न होल्डर, बर्नार्ड ज्युलियन अशी फौज होती. सलामीला जुन्या जाणत्या रॉय फ्रेड्रिक्सच्या जोडीला गॉर्डन ग्रिनीज आणि पाठोपाठ विव्ह रिचर्ड्स हे दोघे उमदे तरुण होते. मध्ये लॅरी गोम्स, अल्विन कालीचरण मग अनुभवी कर्णधार क्लाइव्ह लॉईड, विकेटकीपर डेरेक मरे होतेच. तिसऱ्या मॅचपासून मात्र वेस्टइंडिजचं आग्या मोहोळ पुन्हा एकदा उठलं आणि मग इंग्लंडचा उरला सुरला प्रतिकार संपुष्टात आला. फक्त ४ सामने खेळूनदेखील रिचर्ड्सने ८०० हून अधिक धावा काढल्या. विव्ह रिचर्ड्स टोनी ग्रेगच्या वक्तव्याबद्दल बोलून गेला की – “This was the greatest motivational speech given to us. टोनी ग्रेगचं बोलणं आमच्यासाठी सर्वात प्रेरणादायी होतं.”

एकीकडे गॉर्डन ग्रिनीजसुद्धा इंग्लंडची यथेच्छ धुलाई करत होता. त्यानेही अगदी अमाप धावा काढल्या. वेस्टइंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी बाऊन्सर्सचा तुडुंब पोट भरेपर्यंत मारा केला. तिसरी आणि चौथी कसोटी जिंकून झाल्यावर समारोप म्हणून होल्डिंगने शेवटच्या ओव्हल सामन्यात वेगवान गोलंदाजीचं अक्षरशः प्रदर्शन भरवलं होतं. झकास जेवणावर एक उत्कृष्ट ‘स्वीट डिश’. निव्वळ आणि निव्वळ वेगाच्या जोरावर त्याने इंग्लंडला गारद केलं. जवळपास सगळे ‘क्लीन बोल्ड’ किंवा पायचीत. इंग्लंडला ते होल्डिंगचं वारं झेपतच नव्हतं.

ह्याच दौऱ्यादरम्यान इंग्लंडचा एक खेळाडू ब्रायन क्लोजची एक गोष्ट. ह्या वयस्कर खेळाडूने मालिकेदरम्यान वेस्टइंडीजच्या कधी त्रिकूटाकडून तर कधी चांडाळचौकडीकडून भरपूर मार खाल्ला. त्याचा एक बॉल लागून लागून सुजलेला फोटो आहे. पण खंबीर गडी होता बरंका. खूप वेळ तग धरला त्याने. वयसुद्धा बरंच होतं त्याचं तेव्हा. पण चांगला लढला. ब्रायन क्लोजचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास २७ वर्षं तो कसोटी क्रिकेट खेळला. अर्थात संघात कायमचं स्थान नसल्यामुळे फार काही सामने खेळू शकला नाही. पण ही शेवटची मालिका मात्र त्याच्या कायम लक्षात राहिली असेल.

वेस्टइंडीजने शेवटी ३-० अशी मालिका जिंकली आणि इंग्लंडचा आवाज पुरता बंद झाला. टोनी ग्रेगलासुद्धा मानलं पाहिजे बरंका. मालिका हरताना त्याने ओव्हल मैदानावर स्वतःहून ‘ग्रॉव्हेल’ ह्या क्रियेचं प्रात्यक्षिक करत जमिनीवर लोळण घेतलं. ह्या कृत्याने त्याने स्वतःचा पराभव खुल्या दिलाने सर्वांच्यासमोर मान्य केला होता. वेस्टइंडीजच्या प्रेक्षकांनी पूर्ण सिरीजभर इंग्लंडला त्राही भगवान करून सोडलं होतं. ग्रेगच्या शब्दाने दुखावलेला त्यांचा इगो त्याच्या कृतीने मात्र शांत झाला. उगाच म्हणत नाहीत की – Action speaks louder than words. त्यांनीही टोनीला माफ केलं. एका कटू सिरीजचा शेवट गोड झाला. अजून काय पाहिजे? शेवटी हा जंटलमेन्स गेम आहे, नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:33 pm

Web Title: tony greg comment on west indies and emerge of fire in babylon special article by kedar oak
Next Stories
1 BLOG: IndVsWI- जिमी जिमी जिमी आजा आजा..
2 विंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराटऐवजी मयांक अग्रवालला संधी द्या – मुरली कार्तिक
3 सुलतान जोहर चषक – भारताची जपानवर १-० ने मात
Just Now!
X