29 October 2020

News Flash

काय ? सरकारची ‘सेक्स’वर बंदी ?

'सपोर्ट बबल' म्हणजे काय ?

-सुनिता कुलकर्णी

तुम्ही एकमेकांपासून लांब राहता? तेही करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक विभागात ? मग तुम्हाला एकमेकांना भेटल्यावर बंद दाराआड ‘काहीही’ करता येणार नाही, कारण तुम्हाला ‘बंद दाराआड’ भेटता येणार नाही, असा फतवा काढला आहे ब्रिटिश सरकारने.

करोना संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या नव्या, अधिक कडक नियमांमध्ये एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना एकमेकांना भेटता येईल, पण ते खुल्या जागेत, बंद दाराआड नाही, असा नवा नियम ब्रिटिश सरकारने जाहीर केला आहे. सरकारची सेक्सवर बंदी असा त्याचा गर्भितार्थ आहे असं ‘जाणकारां’चं म्हणणं आहे.

जोडप्यांना आणि एकटे राहणाऱ्या लोकांना काही हॉटस्पॉटच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी भेटता येईल पण एकमेकांना स्पर्श करता येणार नाही, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्याने ‘गार्डियन’च्या प्रतिनिधीला सांगितलं.

इंग्लंडची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायकच नव्हे, तर अति धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा करोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी हा नवीन नियम करण्यात आला असून, त्यानुसार एकत्र राहणारे आणि त्याच ‘सपोर्ट बबल’मध्ये राहणारे लोक टाळेबंदीच्या काळात एकमेकांना ‘एकांता’त भेटू शकतात.

इंग्लंडमध्ये सध्या करोना संसर्गाच्या व्याप्तीनुसार देशाची टियर एक, दोन आणि तीन अशी विभागणी करण्यात आली असून टियर दोन आणि तीन धोकादायक आणि अति धोकादायक विभाग आहेत तर टियर एक मध्यम धोकादायक विभाग आहे.

त्यासंदर्भातल्या नव्या नियमांनुसार धोकादायक आणि अति धोकादायक विभागात सार्वजनिक वावरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याअंतर्गत कुणालाही आपल्या घराबाहेरच्या तसंच आपल्या ‘सपोर्ट बबल’ बाहेरच्या व्यक्तींना ‘बंद दाराआड’ किंवा ‘एकांता’त भेटता येणार नाही. त्याबरोबरच ‘रूल ऑफ सिक्स’ करण्यात आला असून त्यानुसार सहापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक पातळीवर एकमेकांना भेटता येणार नाही.

अर्थात सरकारने जाहीर केलेल्या नियमांमध्ये जोडपी असा स्पष्ट उल्लेख नसला, तरी पंतप्रधानांच्या कार्यालयाने मात्र टीयर दोन आणि तीनमध्ये जोडप्यांना हे निर्बंध काटेकोरपणे पाळावे लागतील असं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच सरकारने ‘कॅज्युअल सेक्स’वर बंदी घातली आहे, असा अर्थ नागरिकांनी लावला आहे.

याचा अर्थ ‘सपोर्ट बबल’बाहेरचे किंवा त्या परिसराबाहेरचे लोक ‘एकांता’त भेटू शकणार नाहीत असाच आहे, असं पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने मान्य केलं. पण मग आधीपासूनच एकमेकांबरोबर प्रेमसंबंधात असलेल्या पण वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्यांना या नियमांमधून सवलत का नाही याबाबत या प्रवक्त्याने सांगितलं की, अशा पद्धतीने वेगवेगळ्या संसर्गग्रस्त भागात राहणारी जोडपी एकमेकांना ‘एकांता’त भेटली तर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ती साखळी तोडण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

‘सपोर्ट बबल’ म्हणजे काय ?

ब्रिटिश सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ज्या घरात एकच व्यक्ती राहते असं घर आणि कितीही माणसं एकत्र राहतात असं घर यांच्यामधलं नेटवर्क म्हणजे ‘सपोर्ट बबल’. अशा ‘सपोर्ट बबल’ मधील दोन व्यक्ती एकांतात भेटू शकतात. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज नाही. त्यांना एकत्र रात्र घालवायलाही परवानगी आहे.

वृद्ध माणसं तसंच लहान मुलं असणारे एकल पालक यांच्या मदतीसाठी ‘सपोर्ट बबल’ ही संकल्पना निर्माण करण्यात आली आहे. एकेकटी राहणारी माणसं या पद्धतीने ‘सपोर्ट बबल’ निर्माण करू शकतात. टाळेबंदी शिथिल करायला सुरूवात केल्यानंतर सरकारने ही संकल्पना जाहीर केली.

सरकारने पहिली टाळेबंदी जाहीर केली तेव्हाच दोन वेगवेगळ्या घरांमधील लोकांना ‘एकांता’त भेटण्यावर निर्बंध घातले तेव्हा लोकांनी त्या नियमाची ‘सरकार सेक्सवर बंदी घालत आहे’ अशी टिंगल उडवायला सुरूवात केली. त्यामुळे मग सप्टेंबर महिन्यात टाळेबंदीसंदर्भातले नवे नियम जाहीर करताना सरकारने ‘सपोर्ट बबल’ ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे आता ‘सरकारने कॅज्युअल सेक्सवर बंदी घातली आहे’ असं म्हणत ब्रिटनचे नागरिक या नव्या नियमाची चेष्टा करत आहेत.

समाप्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:37 pm

Web Title: uk new sex ban restricts couples in covid19 tiers from meeting indoors bmh 90
Next Stories
1 धोनीप्रेमाचा असाही रंग
2 BLOG: कोविडपूर्वीचा लोकलप्रवास आठवतोय?
3 राणीही कंटाळली टाळेबंदीला
Just Now!
X