सुनिता कुलकर्णी

क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आणि सिनेमा हा श्वास आहे हे ट्वीटरवर गेले दोन दिवस सुरू असलेल्या #शेमऑनविजयसेतुपती या ट्रेण्डने सिद्ध केलं आहे. अर्थात विजय सेतुपती कोण हा प्रश्न तुम्हा विचारालच… पण त्या आधी या ट्रेण्डचा क्रिकेटशी काय संबंध असाही प्रश्न तुम्हाला पडेल…

तर नुकताच मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स, आणि विवेक रंगाचारी यांची निर्मिती असलेल्या एम. एस. श्रीपती दिग्दर्शित ‘800’ या सिनेमाचं पोस्टर प्रसिद्ध झालं. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणारा एकमेव क्रिकेटपटू असलेल्या मुथय्या मुरलीधरन या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरच्या या सिनेमात प्रमुख भूमिका तमीळ सिनेस्टार विजय सेतुपती करणार असल्याचं या पोस्टरमधून समजल्यावर त्यांचे चाहते भडकले आणि त्यांनी ट्वीटरवर #शेमऑनविजयसेतुपती हा ट्रेण्ड व्हायरल केला.

वास्तविक क्रिकेटच्या खेळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये मुथय्या मुरलीधरनचं नाव घेतलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणारा मुलरीधरन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. तो ३५० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळला असून त्यात त्याने ५३४ तर १२ ट्वेंटीट्वेंटी मध्ये १३ बळी घेतले आहेत. १८ वर्षांची आपली क्रिकेट कारकीर्द त्याने २०१० मध्ये निवृत्ती घेऊन थांबवली. ८०० हा आकडा त्याच्या कारकीर्दीत महत्त्वाचा असल्यामुळे सिनेमाला हे शीर्षक देण्यात आलं असावं.

त्याच्यावरच्या या बायोपीकचं २०२१ च्या सुरूवातीला चित्रिकरण सुरू होणार असून तो श्रीलंका, इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चित्रित केला जाईल. वर्षाच्या शेवटी सिनेमा प्रदर्शित होणारा हा सिनेमा मूळ तमीळ भाषेत असेल आणि मुरलीधरन आणि सेतुपती या दोघांची लोकप्रियता लक्षात घेता तो हिंदी, बंगाली आणि सिंहली भाषेतही प्रदर्शित केला जाईल. इंग्रजी सबटायटल्ससह तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही जाणार आहे. सिनेमाचं हे सगळं व्यावसायिक नियोजन म्हणून ठीक आहे. पण त्यामध्ये विजय सेतुपती या आपल्या आवडत्या कलाकाराने भूमिका करावी हे त्यांच्या तमिळी फॅन्सना अजिबात आवडलेलं नाही आणि त्यामुळेच विजय सेतुपती समाजमाध्यमांवर ट्रोल झाले आहेत.

श्रीलंकेतील मूळचे रहिवासी असलेले सिंहली आणि भारतातून तिथे जाऊन पिढ्यानपिढ्या स्थायिक झालेले तमीळ यांच्यातील संघर्षाने काही दशकं श्रीलंकेत भयंकर असा वांशिक उत्पात घडवला होता. मूळ तमीळ वंशाच्या असलेल्या मुथय्या मुरलीधरनने श्रीलंकेतल्या सरकारकडून तिथल्या तमीळींवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात एक शब्दही कधी उच्चारला नाही म्हणून तमीळ लोकांचा मुथय्यावर राग आहे. तर जन्माने श्रीलंकन तमीळ असलेल्या मुरलीधरनच्या मते तो स्वत:देखील १९७७ पासून त्यादेशात सुरू असलेल्या या वांशिक संघर्षाचा बळी आहे. त्याचे चटके त्याच्या कुटुंबाने सोसले आहेत.

पण विजय सेतुपती यांच्या फॅन्सना हे काहीही एेकून घ्यायचं नाहीये. त्यांच्या मनामधला श्रीलंकेतल्या सरकारवरचा, तिथल्या सिंहली लोकांवरचा राग अजूनही धगधगता आहे. म्हणूनच ट्वीटरवरून त्यांनी तो विजय सेतुपती यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

‘विजय सेतुपती अभिनेता म्हणून मला कायमच आवडतात. पण त्यांनी मुथय्याची भूमिका साकारून हा आदर, प्रेम गमावलं आहे.’ ‘सिंहली सरकारने दोन लाख तमिळींचं शिरकाण केलं. विजय सेतुपती आमची ही वेदना समजून घेऊ शकत नाही याचा यापेक्षा दुसरा पुरावा असू शकत नाही. हा सिनेमा स्वीकारल्याबद्दल विजय सेतुपतीचा निषेध’ ‘शाहीद आफ्रिदीवरचा सिनेमा केला आणि त्याला भारतातून पाठिंबा मिळाला असं होऊ शकतं का?’ अशा शब्दांत आपला राग त्यांनी व्यक्त केला आहे. मुरलीधरनवरच्या रागाची अशा पद्धतीने विजय सेतुपतीना झळ बसत असली तरी ते आता पुढे काय करतात याकडे जाणकारांचं लक्ष लागलं आहे.