X

BLOG: वर्षभरातील बंदचं एखादं वेळापत्रकच बनवा ना…

इतक्या वरचे वर बंद होतात की बंदकडे रोजगाराचे माध्यम म्हणूनही बघता येईल

प्रती,

बंद पुकारणारे

सर्वात आधी आजच्या बंदसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा बंद यशस्वी होवो हीच सदिच्छा, आणि नाही झाला तरी तुम्ही ताकद दाखवण्यासाठी तो करालच अगदी साम-दाम-दंड-भेद प्रकाराने त्यात काही शंकाच नाही. असो तरी तुम्हाला शुभेच्छा…

आता मुद्द्याकडे वळूया, आम्ही म्हणजे बंदला कंटाळलेले सर्वचजण काय म्हणतोय की तुम्ही बंद पुकारणाऱ्यांनी एखादी बैठक घेऊन बंदचं एक वेळापत्रकच बनवा ना. म्हणजे वर्ष सुरु झाल्यापासून हा आठवा की नववा बंद आहे. नाही असं वेळापत्रक असलं तर सर्वांनाच बरं पडेल. सार्वजनिक सुट्ट्या असतात तसं. कारण बंद आहे की नाही याबद्दल व्हॉट्सअपवर डिस्कशन होईपर्यंत बंदचा दिवस येतोसुद्धा. आणि बंद असेलच तर तो सकाळी साडेचारपासूनच सुरु करा. नाही होतं काय की सकाळच्या शिफ्टला आम्ही येतो आणि मग सगळं बंद पडू लागलं की घरून सारखे फोन सुरु होतात. लॉजिक वापरून संध्याकाळी निघायचं ठरवतो आम्ही पण तरीही घरच्यांना चिंता लागलेलीच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंदच्या दिवशी मूड पण नसतो कामाचा. अनेकजण मध्येच निघून जातात घरी. एचआरवाले पण कमाल करतात सेकण्ड शिफ्टवाल्यांना आणि मॉर्निंगला आलेल्यांना एकाच वेळी मेल करतात गरज असली तरच या. आता मॉर्निंगला आलेला ऑफिसमध्येच तो मेल वाचतो यापेक्षा विरोधाभास काय असावा नाही का.

तर बंदचं वेळापत्रक बनवलं तर अनेक फायदे आहेत. म्हणजे ढिगभर सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत बंदच्या सुट्ट्यांची यादी मिळवून मोठे विकेण्ड प्लॅन करता येतील. कारण या वर्षी झालेले बरेचसे बंद सोमावरचेच आहेत. म्हणून मंडे मॉर्निंगला ट्विटवर ट्रेण्डिंग असणारा #MondayMotivation हा हॅशटॅगही साजरा होईल. कारण सुट्टीपेक्षा मोठं मोटिवेशन काय असणार ना. आणि बंदचे पण प्रकार ठेऊयात. म्हणजे आता आम्हा मुंबईकर कमर्चाऱ्यांचंच बघा ना. भारत बंदला गोंधळ, महाराष्ट्र बंदला गोंधळ एवढचं काय तर मुंबई बंदलाही गोंधळ. कोणी पाठिंबा दिलाय, कोणी नाही याची गणितं पण हल्ली चुकतात रावं आमची. म्हणजे आधी कसं साहेबांनी पुकारलेला बंद म्हणजे बंद बाकी सगळं नकली..पण हल्ली तसं नाही राहिलयं. काय, कधी आणि कसं पेटेल सांगता येत नाही. त्यामुळे बंदचं वेळापत्रक खूपच फाद्याचं ठरेल.

आणि केवळ ऑफिसला येणाऱ्यांसाठीच नाही तर ऑफिसच्या मॅनेजमेन्टसाठी आणि नेत्यांसाठीही. म्हणजे कसं सुट्टी जाहीर केली की लोक घरी पोहचले की नाही, खायला काय अरेंज करायचं वैगेरे बोगस प्रश्नांची एचआरला उत्तरे शोधावी लागणार नाहीत. आणि नेत्यांचं म्हणाल तर चांगलं प्लॅनिंग करता येईल. म्हणजे कुठून कुठे मॉब आणायचा वगैरे कसं सॉर्टेड सगळं. तसचं यामुळे कॉर्पोरेट कार्यकर्त्यालाही बंदमध्ये सहभागी होता येईल. आत्ता होतयं कसं की कोणीही उठतो आणि अचानक तारीख ठरवून बंद जाहीर करतो. तर तो पाळायचा की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो कंपन्यांचाही. आणि ऑफिसात आलेल्यांना घरी सोडायचं की परिस्थिती पाहून संध्याकाळी सोडायचं यासाठीही मीटिंग घ्यावी लागते. खूप त्रास होतो हो… केवळ आलेल्यांनाच नाही तर ज्यांच्यासाठी आलेत त्या कंपन्यांनाही. सुट्टी असल्याने ज्यांचा कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही ते बंद संपल्यावर सोमावारी संध्याकाळी घरी येतील एक्स्टेन्डेड विकेण्ड सेलिब्रेट करुन.

शाळांचाही फायदाच आहे असं वेळापत्रक बनवल्यास. म्हणजे शिक्षणमंत्री सकाळी दहा वाजता सुट्टी जाहीर करतात आणि सकाळच्या सत्राची पोरं उगाच शाळेत बसू की घरी जाऊ अशी गोंधळतात. तर हा गोंधळ टाळता येईल. आणि शाळांनाही सरसकट दैनंदिनीमध्ये हे बंदचं वेळापत्रक छापता येईल. पालकही खूष, विद्यार्थीही खूष आणि शाळाही खूष. सगळे मिळून बंद बंद खेळतील म्हणजे.

याशिवाय दुसरा अँगल सांगायचा तर बंदकडे रोजगाराचे माध्यम म्हणूनही बघता येईल. म्हणजे बघा ना महिन्यात दोन तीन बंद तर सहज होतात. तर जे बंदमध्ये सहभागी होतात त्यांना एक मेंबरशिप कार्ड द्यावे. आणि काही विशेष योजना लागू कराव्यात. जसं वर्षभरात दोन हॉकी स्टीक, दोन जोडी कपडे आणि प्रत्येक बंदच्या दिवशी दोन वेळचं जेवण दिलं जाईल, वगैरे टाईप. एखादं मंत्रायलच सुरु करता येईल मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाअंतर्गत. बंद मंत्रालय. नाही नाही नावप्रमाणे ते कायम बंद नसेल ते सुरुच राहिल. पण ज्या कारणासाठी सुरु करण्यात आलेय त्या कारणाच्या नावानेच ते सुरु करावे म्हणजे लक्षात रहायला सोप्पं. आणि ही योजना लागू केल्याने एका दगडात दोन पक्षी मारले जातील पहिला म्हणजे बंद यशस्वी होतील आणि दुसरा म्हणजे रोजगार मिळेल.

बघा कसं जमतयं ते. कारण वर दिलेल्या प्रत्येक सोल्यूशनमुळे दर महिन्याला बंदच्या दिवशी होणारा गोंधळ नक्कीच कमी होईल. कोणाशी आणि कसा पत्र व्यवहार करायचा ते कळवा. तशी कॉर्पोरेट आणि सरकारी कर्मचाऱ्यांची आणि शाळांची एकत्र संस्था स्थापन करुन त्या मार्फत पत्रव्यवहार करू.

कळावे

महिन्यातून चार बंदला कंटाळलेला

सामान्य माणूस

– स्वप्निल घंगाळे

swapnil.ghangale@loksatta.com

First Published on: September 10, 2018 10:02 am