दिग्विजय जिरगे

राष्ट्रीय राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. देशाच्या राजकारणात काँग्रेस-भाजपा हे जरी प्रमुख पक्ष असले तरी माया-ममता-जयललिता यांचा मोठा दबदबा होता आणि आहे. यातील जयललिता यांचं निधन झालं, त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात थोडीशी पोकळी निर्माण झाली आहे. पण मायावती आणि ममता बॅनर्जी या अजूनही त्यांच्या विरोधकांना स्वस्थ बसू देत नाहीत.

तिकडं दिल्लीत असं सुरू असताना.. इकडं आमच्या गल्लीतल्या व्हॉट्सअॅप ग्रूपवरही यावरुन प्रचंड वाद होताना दिसतात.. एकवेळ काही गोष्टींसाठी भाजपा-काँग्रेस किंवा तमाम विरोधी पक्ष एकत्र येतील.. परंतु, व्हॉट्सअॅपवर आणि फेसबुकवर केलेल्या टिप्पणीमुळे मित्रा-मित्रांमध्ये तणावाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. असो.. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या राजकारणाने मैत्रीत वितुष्ट निर्माण होत आहे..

दर आठवड्याला पुणे-सोलापूर-पुणे माझी वारी असते. बहुतांशवेळा हा प्रवास रेल्वेने होतो.. क्वचितप्रसंगी एसटीनेही मी जातो. मध्यंतरी मी नेहमीप्रमाणे पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूरला येत होतो. माझ्या आरक्षित आसनाशेजारी विशी-तिशीतले ५ ते ६ युवक बसले होते. हे सर्वजण एकमेकांना बंगाली भाषेत बोलत होते. हे बंगाली युवक सोलापूरला का येत आहेत.. याची मला प्रवास सुरू झाल्यापासून उत्सुकता लागून राहिली होती. काही वेळानंतर मी त्यातील एकाशी बोलायला सुरूवात केली (त्या मुलाचं मला नाव आता आठवत नाही). त्यांनं सांगायला सुरूवात केली…

हे सर्व युवक पश्चिम बंगालमधील होते. वेल्डिंगचं काम करणारे हे सर्वजण.. यांच्यातीलच एकजण सोलापूरमधील चिंचोळी एमआयडीसीत त्यांना मिळालेल्या कामाचा म्होरक्या.. बाकी सर्वजण त्याचे साथीदार..मला आश्चर्य वाटलं या कामासाठी हे सर्वजण इतक्या लांब कसं ? पण नंतर समजलं की त्यांनी या कामासाठी केरळपासून उत्तर भारत आदी ठिकाणी सहा महिने ते वर्षभर मुक्काम केला आहे. सोलापुरात येण्यापूर्वी ते पुण्यात एका कंपनीसाठी काम करत होते.. त्यांना सोलापुरात एकाने चांगली ऑफर दिल्यामुळे ते इकडं येत होते.. त्यांनी येताना गॅस, भांडी आदी साहित्य बरोबर घेतले होते.. यातील एकानं काही वर्षांपूर्वी सोलापुरात काम केलं होतं.. अनेक वर्षांनंतर तो पुन्हा येथे येत होता.. अनेक जण आपल्या आई-वडील, बायको, भाऊ-बहिणीपासून दूर आले होते.

यावेळी त्यांनी केरळमधील मालक लोकांचं कौतुक केले. हिशेबाला केरळी पक्के असल्याचे त्यांनी सांगितले (पुण्यातील एका नेहमीच्या तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीने त्यांच्याकडून ५ ते ६ जणांच्या पुणे-सोलापूर प्रवासासाठी तब्बल १५०० रूपये घेतल्याचेही सांगितले. वास्तवात १२५ रूपये एकाचे तिकीट आहे)).

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या गावानजिक यांचं कुठलंतरी गाव.. बोलता बोलता यांच्याशी पश्चिम बंगालमधील राजकारणावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ही मंडळी तशी अत्यंत अल्प उत्पन्न गटातील हातावर पोट असणारी.. यांना राजकारणाशी देणंघेणं नसल्याचं त्यांच्याबरोबर बोलताना जाणवलं.. पण त्यांनी ममता बॅनर्जींबद्दल त्यांची मतं नोंदवली..

पश्चिम बंगालमध्ये ममतांनी डाव्यांच्या गडाला चांगलाच सुरुंग लावला आहे. काही वर्षांतच त्यांनी आपल्या तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व निर्माण केलं आहे. मुस्लिमांचे लांगूलचालन करत असल्यामुळे त्यांच्यावर टीकाही कली जाते. विकासापेक्षा त्या जातीय राजकारण करतात, देशहिताच्या गोष्टींना त्या सातत्याने विरोध करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडव्या विरोधक अशी त्यांची ओळख आहे.. इतकं असूनही त्यांचा पक्ष नेहमी प्रचंड मताधिक्क्याने प्रत्येक निवडणुकीत विजयी होतो..हे कसं हा आजवर मला पडलेला प्रश्न..

ममतांनी राज्यात आमच्यासारख्या गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्याचे या युवकांनी म्हटले. (यातील काही युवक हे मुस्लिम तर काही हिंदू होते.) कमी दरात धान्य, मुलींना मोफत सायकली, त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी वर्षाला काही पैसे दिले जातात.. तसेच इतरही अनेक योजना असल्याचे सांगत यापूर्वी असं कोणीच केले नसल्याचे तो म्हणाला. (कदाचित विरोधकांना हे मान्य होणार नाही).. या मुलांची वडिलोपार्जित काही शेती आहे. वडील गावाकडेच असतात. तेच शेतीचे पाहतात. ममतादिदींनी हे केलं.. ममतादिदींनी ते केलं असं ते सांगत होते. मग इतकं असूनही तुम्ही पश्चिम बंगाल का सोडलं, असा त्यांना सवाल केला. त्यावर तो म्हणाला की, ही तर सुरुवात आहे.. भविष्यात आम्हालाही राज्य सोडण्याची वेळ येणार नाही.  एकंदर डाव्यांचे इतके वर्ष राज्य असूनही त्यांच्या बालेकिल्ल्यात आपलं स्थान निर्माण करणं खरंच आव्हानात्मक आहे.. परंतु, ममतांनी ते लीलया पार पाडले…

ममतांचे कौतुक करणं हे लिहिण्यामागचं प्रयोजन नाही.. फक्त या युवकांच्या बोलण्यातून जे काही आलं ते सांगण्याचा हा प्रयत्न होता.. मला प्रवासात भेटलेल्या या युवकांनी सांगितलेल्या या काही गोष्टी होत्या..