– प्रथमेश दीक्षित

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा इंग्लंड दौरा काही चांगला गेला नाही. सलामीच्या टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर भारताला वन-डे आणि कसोटी अशा दोन्ही मालिकांमध्ये हार पत्करावी लागली होती. एक फलंदाज या नात्याने विराटने या मालिकेत खोऱ्याने धावा ओढल्या, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला. संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. विराट कोहली आणि काही सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल व ऋषभ पंतचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज ढेपाळले. मधल्या फळीतल्या फलंदाजांचं अपयश हे इंग्लंडमधल्या भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलेलं आहे.

सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर डावाला आकार देण्याचं महत्वाचं काम मधल्या फळीतल्या फलंदाजांवर असतं. मात्र या दौऱ्यात भारतीय फलंदाज हे काम एकदाही करु शकले नाहीत. संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने खुद्द याची कबुली दिली आहे. अखेरच्या कसोटीतही लोकेश राहुल आणि ऋषभ पंतने केलेल्या शतकांमुळे भारताने आपली थोडीशी पत राखली. मात्र इंग्लंडची कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघासमोर आता आशिया चषकाचं आव्हान असणार आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. वन-डे मालिकेत भारताचे सलामीवीर आतापर्यंत चांगली कामगिरी करत आलेले आहेत. मात्र गेल्या काही स्पर्धांमधील भारतीय संघाची कामगिरी पाहता मधल्या फळीतली फलंदाजी अधिक मजबूत करण्यावाचून भारतीय संघापुढे पर्याय नसणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पर्धेत संघाची घडी बसेपर्यंत मधल्या फळीत काही फलंदाजांना संधी देणं गरजेचं बनलं आहे.

१) लोकेश राहुल – (फलंदाजीत तिसरा क्रमांक)

गेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये लोकेश राहुलने फलंदाजी केली आहे, मात्र त्याला हव्या तितक्या धावा काढता आल्या नाहीत. मात्र राहुलला कोणत्याही जागेवर स्थिर होण्याची संधी मिळाली नाही, हे देखील तितकच सत्य आहे. इंग्लंड दौऱ्याच्या अखेरीस शतक झळकावत राहुलने आपण अद्यापही फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे वन-डे संघातही राहुल आपली जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यंदा विराट संघात नसल्यामुळे राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यास हरकत नाहीये.

२) अंबाती रायडू – (फलंदाजीत चौथा क्रमांक)

आयपीएलमध्ये बहारदार कामगिरी केल्यानंतर अंबाती रायडूला भारतीय संघाची कवाडं खुली झाली. मात्र यो-यो चाचणीत नापास झाल्यामुळे अंबाती रायडूला हक्काच्या जागेवर पाणी सोडावं लागलं. मात्र आशिया चषकासाठी यो-यो चाचणी पास केल्यामुळे त्याला भारतीय संघात जागा मिळाली आहे. अंबाती रायडू हा आक्रमक शैलीचा फलंदाज असल्यामुळे तो कोणत्याही जागेवर फलंदाजी करु शकतो. मात्र ३४ वन-डे सामने आणि २ शतकं नावावर असलेल्या रायडूला चौथ्या क्रमांकाची जागा ही योग्य ठरु शकते. सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यास भारताला धावगती वाढवून देण्याचं मोठं काम रायडू करु शकतो.

३) महेंद्रसिंह धोनी – (फलंदाजीत पाचवा क्रमांक)

याआधी अनेक मुलाखतींमध्ये धोनीने आपल्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल असं सांगितलं होतं. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने ५३.९८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या आशिया चषकात धोनी पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो.

४) दिनेश कार्तिक – (फलंदाजीत सहावा क्रमांक)

२००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या दिनेश कार्तिकला संघातलं आपलं स्थान कायम राखता आलं नाही. मात्र २०१६ नंतर स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत दिनेश कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केलं. श्रीलंकेतील निधास चषक टी-२० मालिकेत दिनेश कार्तिकने बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात ८ चेंडूत २९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे वन-डे संघात दिनेश कार्तिकला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात काहीच हरकत नाहीये. आगामी २०१९ विश्वचषकाआधी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीचा प्रयोग करण्यासाठी दिनेश कार्तिक हा भारतासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.