– कीर्तिकुमार शिंदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोल्हापुर जिल्ह्यातल्या इचलकरंजी येथील सभेला (मंगळवार १६ एप्रिल) प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इचलकरंजीत यापूर्वी इतकी मोठी सभा यापूर्वी कधीही झाली नव्हती. गेल्या काही दिवसांत राज यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रसारमाध्यमात होणारी चर्चा पाहता राज पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतील आणि मनसे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याला एक राजकीय चमत्कारच म्हणावं लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची राज यांच्याकडून केली जाणारी पोलखोल हळूहळू राजकीय जागरात रुपांतरीत होत आहे. प्रत्येक सभेत राज नवनवीन मुद्दे मांडून भाजपला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांना प्रत्युत्तर देण्याचा एक प्रयत्न केला खरा, मात्र तो त्यांच्याच अंगलट आला. राज यांनी सभेत सुरू केलेला व्हिडिओ क्लिप सादरीकरणाचा प्रयोगही कमालीचा यशस्वी झाला आहे. ‘मोदीशाही’विरोधात लढू पाहणाऱ्या प्रत्येकाला राज ठाकरे आपल्या मनातलंच बोलत आहेत, असं वाटतंय. त्यामुळेच असेल कदाचित विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासक मंडळी हे सुद्धा आता सोशल मीडियावर मोदी-शाह-भाजप विरोधातील मुद्दे साधार पुराव्यांसह मांडत आहेत. आपले मुद्दे राज यांच्यापर्यंत पोहोचून ते सभेत मांडले जावेत, असाही आग्रह अनेकजण सोशल मीडियावर धरत आहेत. या सर्व गोष्टींमुळे मनसेच्या स्थापनेचे दिवस आणि त्यानंतरची १३ वर्षं माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. या १३ वर्षांच्या कालखंडाला चार टप्प्यात विभागता येईल.

पहिला टप्पा :

मार्च २००६ पासून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर हा टप्पा सुरू होतो. शिवाजी पार्कवर पक्षाच्या स्थापना मेळाव्यात राज यांनी केलेल्या भाषणामुळे, त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे प्रभावित होऊन लाखो तरुणांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यात जसे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते, तसे इतर राजकीय पक्षांतील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तरुणही होते. या पहिल्या टप्प्यातच २००७ ची महापालिका निवडणूक येते. पक्ष स्थापनेनंतर एका वर्षाच्या आताच झालेल्या या निवडणुकीत मुंबई आणि पुण्यात मनसेचे प्रत्येकी सात नगरसेवक, तर नाशिकमध्ये १४ नगरसेवक निवडून आले होते. मनसे हा पक्ष आता विधानसभेतही आपलं अस्तित्व निर्माण करणार, ही चर्चा सुरू झाली.

दुसरा टप्पा :

साधारण फेब्रुवारी २००८ पासून मनसेच्या राजकीय प्रवासातला दुसरा टप्पा सुरू होतो. परप्रांतीय उत्तरभारतीय विरुद्ध भूमिपुत्र मराठी हा लढा दीर्घ काळानंतर मुंबईत पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला. परप्रांतीयांच्या विरोधातील या नव्या लढ्याचे नायक आता शिवसैनिक नव्हते, तर म.न.सैनिक – महाराष्ट्र सैनिक होते. विक्रोळी इथल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांची बाजू घेणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांना खडे बोल सुनावले, तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका केली. ‘महाराष्ट्र धर्म’ काय आहे, याची मांडणी राज त्यांच्या सभांतून करू लागले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि पहिल्याच म्हणजे २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना तब्बल लाख-दीड लाखांहून अधिक मतं मिळाली. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार बनले. दोन वर्षांच्या राजकीय पक्षासाठी हे निश्चितच घवघवीत यश होतं.
याच टप्प्यात म्हणजे ऑगस्ट २०११ मध्ये राज ठाकरे यांनी गुजरातमधील विकासकामांची पाहणी करण्यासाठी गुजरातचा दौरा केला आणि गुजरातचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाचं नेतृत्व करावं, असं मत व्यक्त केलं. यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीतही मनसेने खणखणीत यश मिळवलं. मुंबईत २७, पुण्यात २९, तर नाशिकमध्ये ४० नगरसेवक निवडून आले. मनसेची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी होती.

तिसरा टप्पा :

नरेंद्र मोदींची लाट म्हणजे मनसेच्या राजकीय प्रवासातला तिसरा टप्पा म्हणता येईल. नरेन्द्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि माझे-मनसेचे खासदार हे त्यांना संसदेत समर्थन देतील, अशी भूमिका राज यांनी जाहीरपणे मांडली. राज यांची ही भूमिका मतदारांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे, २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जिथे दीड लाख मतं मिळाली होती, तिथे २०१४मध्ये जेमतेम सत्तरेक हजार मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीत तर मनसेच्या तिकिटावर एकच जण निवडून आला आणि आमदार बनला. अनेक माजी आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या सर्व घटनांचा फटका बसलाच. मुंबईत मनसेचे फक्त सात नगरसेवक निवडून आले आणि त्यातले सहा नगरसेवक शिवसेनेत गेले. मनसेचं राजकीय अस्तित्व संपल्याची चर्चा सुरू झाली. आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा एकमेव आमदारही सोडून गेला.
पण या टप्प्याला आणखी एक पदर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर सडकून टीका करायला राज यांनी २०१५-१६ पासूनच सुरुवात केली होती. मोदींच्या नोटबंदीच्या आणि इतर निर्णयांवर राज यांनी कडक शब्दात समीक्षा केली. मोदी-शाह यांच्या राजकारणाची खिल्ली उडवणारी अनेक व्यंगचित्रं राज यांनी २०१५ ते २०१९ या काळात काढली. पक्षाचे मेळावे, सभा, पत्रकार परिषदा यांमधूनही राज यांनी आपला मोदी-शाह विरोध व्यक्त केला.

चौथा टप्पा :

‘मोदी-शाहमुक्त भारत’ या घोषणेपासून मनसेचा चौथा टप्पा सुरू होतो. तसं पाहिलं तर मोदी-शाह यांच्या हुकूमशाहीविरोधात तिसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचा बिगुल राज यांनीच पहिल्यांदा वाजवलं, तेसुदधा २०१८च्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात. भाजपविरोधात देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन राज यांनी तेव्हाच केलं होतं. त्यानंतर मनसे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत महाआघाडीत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या, या चर्चा थांबल्या त्या थेट एक वर्षानेच. स्वतःचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा न करता राज यांनी मोदी-शाह विरोधात प्रचार सभा घ्यायला सुरुवात केली, आणि म्हणता म्हणता वातावरण बदललं. ‘उमेदवार नसलेली सेना’ असं ज्या पक्षाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याच पक्षाच्या नेत्याने केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांची दमछाक होते आहे. ज्या पक्षांच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीत घेण्याच्या चर्चेच्या वेळी नाकं मुरडली होती, त्याच पक्षांचे नेते आज “आम्हाला सुद्धा राज ठाकरे यांची सभा हवी” असं म्हणत नाक घासत आहेत. प्रत्येक सभेगणिक राज ठाकरेंचं आणि मनसेचं राजकीय महत्व वाढत आहे. मोदी-शाह यांच्या फेकूगिरीला- भूलथापांना फसू नका, असं म्हणत राज ठाकरे जागल्याची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की, एकही उमेदवार उभा न करणारा नेता निवडणुकीत अत्यंत गांभीर्याने सर्वाधिक प्रभावी प्रचार करत आहे. राज यांचे वैचारिक विरोधक, विरोधी पक्षातील नेते, नामवंत पत्रकार सुदधा राज यांच्या धैर्याची, वक्तृत्वाची आणि मांडणीची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत. राज ठाकरे यांच्या सध्याच्या प्रचार सभांना स्मार्ट राजकारण म्हणायचं की ‘जनजागर मोहीम’ हे येणारा काळ ठरवेल. त्याच काळाच्या उदरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेला बळ मिळेल का, या प्रश्नाचंही उत्तर दडलेलं आहे.