– जय पाटील
पुरुषाचं स्थान स्त्रीपेक्षा वरचं आहे, या भ्रमातून समाज बऱ्याच प्रमाणात बाहेर पडला. पण तरीही कित्येक शतकांपासूनच्या या विषमतेची प्रतीकं आजही कुठे ना कुठे रेंगाळलेली दिसतात. ती इतकी अंगवळणी पडलेली असतात की यातून विषमता डोकावते हे देखील आपल्या लक्षात येत नाही. पत्त्यांचा कॅट हे अशा रेंगाळलेल्या प्रतिकांचं एक उदाहरण. राजा हा राणीपेक्षा श्रेष्ठ का असा प्रश्न पडलेल्या एका तरुणीने ही प्रतिकात्मक विषमताही दूर करण्याचा निर्णय घेतला आणि राजा, राणी, गुलामाच्या जागी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा पत्त्यांचा समावेश करून समतेचा पुरस्कार करणारा कॅट तयार केला. तिच्या या प्रयोगाची देशविदेशांत दखल घेतली जात आहे. तिने तयार केलेलं उत्पादन स्वीकारलं जात आहे. इंडी मेलिंक ही २३ वर्षांची डच मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या पुतण्याला पत्ते कसे खेळतात, हे समजावून सांगत होती. पण त्याला समजावताना तिलाच एक प्रश्न पडला. रा

जाला राणीच्या वरचं स्थान का? हा भेद दूर करणं आवश्यक आहे असं तिला वाटू लागलं. तिने याविषयी तिच्या वडिलांशी चर्चा केली. त्यांनीही तिला ही कित्येक शतकांपासून रुजलेली विषमता दूर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ‘पत्त्यांच्या डावात राजाचं मोल राणीपेक्षा जास्त असणं हे महिलांसाठी अन्यायकारक आहे. ही प्रतीकं वरवरची वाटत असली, तरी समाजमानवर त्यांचा खोलवर ठसा उमटतो. तुम्ही आमच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या आहात, असा छुपा शेराच हे पत्ते मारून जातात,l अस न्यायवैद्यक मानसशास्त्रात पदवी मिळवलेल्या मेलिंकचं म्हणणं आहे.

बराच विचार करून विविध प्रयोग केल्यानंतर मेलिंकने एक लिंगभेदरहित पत्त्यांचा कॅट तयार केला. त्यात राजाच्या जागी सुवर्ण, राणीच्या जागी रौप्य आणि गुलामाच्या ऐवजी कांस्य असे पत्ते आहेत. सुवर्ण पत्त्यावर सोन्याच्या बारचं, रौप्यच्या पत्त्यावर चांदीच्या नाण्यांचं आणि कांस्यच्या पत्त्यावर ब्रॉन्झच्या ढालीचं चित्र आहे. सुरुवातीला तिने केवळ ५० कॅट तयार करवून घेतले होते. तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवारानेच ते खरेदी केले. त्यांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांतून तिला आणखी प्रोत्साहन मिळालं आणि तिने एक हजार ५०० कॅट तयार केले. आता तिने हे कॅट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेत पाठवले आहेत. क्रीडा उत्पादनांची विक्री करणाºया काही दुकानांनीही तिच्या पत्त्यांच्या कॅटविषयी चौकशी केल्याचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

मेलिंक सध्या या पत्त्यांविषयी खेळाडूंच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. आजवर आपण कधीही पत्त्यांमधल्या लिंगभेदाविषयी विचार केला नव्हता. नवे पत्ते वापरण्याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल, असं खेळाडूंचं म्हणणं आहे. ‘आपण लिंगनिरपेक्षतेचा विचार करू लागलो आहोत, हे उत्तमच आहे, पण औपचारिकरित्या हे पत्ते वापरण्यास सुरुवात करणं थोडं गुंतागुंतीचं ठरू शकतं, कारण त्यासाठी खेळाच्या नियमांत बदल करावे लागतील. हा बदल खरंच आवश्यक आहे का, हे सांगता येत नाही, मात्र लिंगभेद दूर व्हायलाच हवेत आणि एवढ्या लहान मुलीच्या हे निदर्शनास आलं हे खरोखरंच प्रशंसीनय आहे. ही नवी पिढी आहे,’ असं ‘डच ब्रिज असोसिएशन’च्या अध्यक्ष बेरिट वॅन डॉबेनबर्ग यांचं म्हणणं आहे.