19 October 2019

News Flash

Women’s Day 2019 : मी, ती आणि आमची मासिक पाळी

मासिक पाळीच्या काळात महिलेला सर्वात जास्त गरज असते ती स्वच्छतेची, आरामाची आणि सकस आहाराची.

– शर्वरी सुरेखा अरुण (समाजबंध, पुणे)

मी वर्गात मासिक पाळी म्हटलं की आजही मुलींच्या माना लगेच खाली जातात आणि कुजबुज सुरू होते. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव सगळीकडे येतो. पण याच विषयावर ‘समाजबंध’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सचिन आशासुभाष नावाचा एक युवक काम करतोय हे समजल्यावर मी थबकलेच आणि या कामात साथ द्यायची ठरवलं. समाजबंधच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागात किशोरवयीन मुली व महिलांशी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर संवाद साधतो. त्यात मासिक पाळी का येते इथपासून ते त्यामध्ये येणाऱ्या समस्या, घ्यावयाची काळजी, स्वच्छता, आहार, व्यायाम, शोषक साहित्याचा वापर, विल्हेवाट अशा विविध विषयांची शास्त्रशुद्ध माहिती देऊन पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज, अंधश्रद्धा यांना तोडून त्यांच्यात शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न ही करतो. यासोबतच घरच्या घरी बनवता येतील असे कापडी ‘आशा पॅड’ त्यांना मोफत देऊन ते तयार करण्याचं प्रशिक्षण ही या महिलांना दिलं जातं जेणेकरून ते त्त स्वतः बनवून नियमित वापरू शकतील.

आज जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात महिला पोहोचलेल्या असताना पाळीच्या दिवसात स्वतःच्याच घरातच महिलेला मिळणारी दुय्यम वागणूक गंभीर मुद्दा आहे. आपली समाज म्हणून झालेली पुरुषसत्ताक जडणघडण या सगळ्यांच्या मुळाशी आहे असं मला वाटतं. मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र आहे. हा निसर्गाचा कोप किंवा शाप नसून उलट एक नवा जीव निर्माण करण्यासाठीची निसर्गदत्त देणगीच आहे जी पुरुषामध्ये नाही. ज्या प्रक्रियेतून नवीन जीव जन्म घेतो ती प्रक्रिया- ती मासिक पाळी अपवित्र कशी म्हणता येईल ? त्या घटनेचा विटाळ कसा पाळला जाऊ शकतो ? मासिक पाळी ही महिलेला परिपूर्ण आणि समृद्ध बनवणारी एक नितांत सुंदर प्रक्रिया आहे. पण दुर्दैवाने महिलेला कधी माणूस म्हणून न स्वीकारलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीला महिला बळी पडल्या आणि कालांतराने महिलाच या सगळ्याच्या वाहक झाल्या.

घरातील ज्येष्ठ महिला म्हणजे आपली आजी, आई या ओघाने नंतरची माझी पिढी कितीतरी शतकांपासून ह्या अंधश्रद्धा अंधपणे पाळत आलेल्या आहेत. मासिक पाळीच्या काळात महिलेला सर्वात जास्त गरज असते ती स्वच्छतेची, आरामाची आणि सकस आहाराची. पाळी आल्यानंतर बऱ्याच आया मुलीला त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती देणं सोडून स्वयंपाकघरात जाऊ नकोस आणि देवाला शिवू नको याच गोष्टी प्रकर्षानं सांगतात. आणि मग स्त्रीत्व खुलण्याच्या मुख्य टप्प्यावर इथूनच मुलीच्या मनात आपल्या स्त्रीत्वा विषयी न्यूनगंड तयार व्हायला सुरुवात होते. आपण दुय्यम आहोत, हीन आहोत, अपवित्र आहोत, कमजोर आहोत या भावना बळावू लागतात आणि मग हे शिवाशिव कितीही पटत नसलं तरी त्याला विरोध करण्याचा आणि एकूणच लढण्याचा आत्मविश्वास ती गमावून बसते.

महिला या व्यवस्थेच्या, अंधश्रद्धेच्या इतक्या आहारी गेलेल्या आहेत की त्यांना मासिक पाळीविषयी माहिती समजावून सांगताना आम्हाला तुमचं आरोग्य जपणं, हे सगळं समजून घेणं का महत्वाचं आहे हे आधी पटवून द्यावं लागतं. ग्रामीण भागात काम करण्यात वेगळीच गंमत आहे. कधीकधी वाटतं महिलाच महिलांच्या विकासातील मुख्य अडसर आहेत. महिलांना हे सगळं धार्मिक वाटतं. मी जेव्हा त्यांना हे सगळं वैज्ञानिक दृष्ट्या सांगत असते तेव्हा काही महिला मलाच म्हणतात, “बाई, असलं काही बोलू नका. देवीचा कोप होईल. पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावून बघा, दूध नाही नासलं तर सांगा.” किंवा मग लोणचं, दही नासतं. पापड लाल होतात वगैरे म्हणतात. तेव्हा मी त्यांना म्हणते, “आजी, तुम्ही कधी पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावलाय का ?” उत्तर साहजिकच नाही असतं. मग मी म्हणते, “मग तुम्ही एकदा हात लावून बघाच, दूध नाही खराब होत !

आपल्याला हे आधीच्या बायांनी सांगितलेलं असतं आणि आपण ते भीतीपोटी खरं मानून पाळू लागतो. पण प्रत्येक महिलेकडून पाळीच्या काळात कधी ना कधीतरी घरातल्या कशाला तरी चुकून हात लागलेला असतोच आणि काहीच आभाळ फाटलेलं नसतं ना कोणता कोप झालेला असतो; पण फक्त घरातील बाकी महिला रागावतील म्हणून आपण ते कुणाला सांगत नाही. खरंय का काकू ?” आणि मग सगळ्याच महिला गालातल्या गालात हसायला लागतात. त्यांना हे पटलेलं असतं, बरंच आधीपासून माहीत ही असतं पण हे सगळं नाकारायची हिंमत त्यांच्यात अजून आलेली नसते. आपण हे सगळं आयुष्यभर पाळलं पण निदान आपल्या मुलींना, सुनांना तरी हे पाळायला लावू नका असं सांगते. त्या ते ऐकतात. किशोरवयीन मुलींचा तर प्रश्नच नाही, त्यांच्या मनात याविषयी खदखद असतेच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, काहीजणी नंतर जवळ येऊन रडतात. मिठी मारतात. घरी आईला, मैत्रिणींना आम्ही हे नक्की सांगू म्हणतात. मला वाटतं हीच माझ्या कामाची पोचपावती आहे.

आदिवासी भागातील अनुभव थोडे वेगळे आहेत. भामरागड- गडचिरोली इथल्या महिलांची भाषा माडिया आणि गोंडी, माझी भाषा मराठी. आदिवासी लोक निसर्गाचे पुजारी असतात, गाईच्या दुधावर वासराचा खरा अधिकार आहे असं म्हणून ते दूध काढत नाहीत. शिवाय आपल्या इतकी त्यांच्याकडे शेती प्रगत झालेली नाहीये. परिणामी कुपोषण, महिलांच्या समस्या गंभीर आहेत. कपडेच दुर्लभ असणाऱ्या या भागात पॅड ही संकल्पनाच अजून माहीत नाही. या महिलांशी मी संवाद साधला. मी मराठीत बोलायचे आणि तिथल्या अंगणवाडी शिक्षिका त्यांना ते गोंडी भाषेत समजावून सांगायच्या. पुन्हा प्रश्न गोंडी भाषेत आणि उत्तर मराठीत. असा मजेशीर संवाद झाला. त्या महिलांना समाजबंधने बनवलेलं कापडी आशा पॅड प्रचंड आवडलं. त्यांनी लगेच ते हातशिलाई वर बनवून ही दाखवलं.

आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या महिलांना बाजारात उपलब्ध असलेले पॅड विकत घेणे परवडत ही नाही आणि शिवाय ते दुकानातून आणणार कोण ही समस्या आहेच. या कारणांमुळे आज ही भारतातील ५२ टक्के महिला पॅड वापरत नाहीत. या घरी बनवता येणाऱ्या आशा पॅडला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. शिवाय या पॅडचे काही दुष्परिणाम ही नाहीत त्यामुळे बऱ्याच महिला ते आता स्वतः घरी बनवून वापरू लागल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती आणि तंत्रज्ञान पोहोचवावं यासाठी मी समाजबंधच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. या महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नात आपण ही आमच्या सोबत यावं आणि एक दिवसाचा महिला दिन खऱ्या अर्थाने आणि दररोज साजरा व्हावा असं मला वाटतं.

First Published on March 8, 2019 10:49 am

Web Title: womens day blog written by sharvari surekha arun smajbandh pune