दिलीप ठाकूर

 

कोणत्याही अडचण अथवा समस्येवर मात करता येते असा मिळणारा विश्वास ही खूपच मोठी गोष्ट आहे. कर्करोग अर्थात कॅन्सरचेच उदाहरण घ्या, पूर्वी कॅन्सर असे नुसते म्हटलं की थरकाप उडायचा. एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाल्याचे डॉक्टरांनी निदान केल्याबरोबर एक तर तो रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जाई आणि आता आपले जगण्याचे काही फक्त मोजकेच दिवस राहिलेत अशा विचाराने हैराण होई, अनेक कुटुंबात तर सगळेच हादरत. अगदी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद ‘ ( १९७०) चित्रपटात लिम्फोसार्कोमा ऑफ द इन्टेस्टाईन हा कॅन्सर असूनही ‘आनंद ‘ अर्थात राजेश खन्ना ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही ‘ असा सुखाचा मंत्र देत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात कॅन्सरग्रस्ताला तसे जगणे शक्य नव्हते. अभिनय वेगळा आणि आयुष्य वेगळे असते. कॅन्सर म्हणजे श्रीमंतांचा रोग असेही म्हटले जाते, नर्गिसच्या कॅन्सरवरील उपचारासाठी सुनील दत अमेरिकेत गेल्याने त्या मुद्द्याला पुष्टीच मिळाली. अर्थात, आजही मध्यमवर्ग आणि गरीब यांच्या आवाक्यात कॅन्सर नाही. त्यावरील उपचाराच्या खर्चानेच दबून जाणे स्वाभाविक आहे. पण कॅन्सरवर मात करून पुन्हा आपण पहिल्यासारखे आयुष्य जगू शकतो, असा विश्वास मात्र आता वाढत चाललाय आणि त्यासाठी पुन्हा सेलिब्रिटीज हेच नवीन संदर्भ ठरत आहेत. कदाचित समाजावर त्यांचा विविध प्रकारचा प्रभाव असल्याने कदाचित तसे असेल.

ताजे उदाहरण अर्थात सोनाली बेंद्रेचे. कॅन्सरवर मात करून ती पुन्हा एकदा कामाला लागलीय. तोच तिचा पहिल्यासारखा उत्साह आहे हे जास्त महत्वाचे. एका जाहिरातीसाठी शूटिंग करुन तिचे हे पुढचे पाऊल पडलेय. विशेष म्हणजे, पूर्वीही तिने चित्रपटात येण्यापूर्वी अनेक जाहिरातपटांसाठी मॉडेलिंगच केले होते. काही महिन्यांपूर्वी तिनेच आपणास कॅन्सर असून उपचारासाठी अमेरिकेत चाललोय अशी सोशल मिडियात पोस्ट केली आणि सगळेच अवाक झाले. त्याच्या अगदी काही महिन्यांपूर्वी मेहबूब स्टुडिओत एका पुस्तक मेळ्यात एका इंग्रजी पुस्तकाच्या लेखकाची तिने मुलाखत घेतली तेव्हा तिच्याशी माझी भेट झाली असता तिच्या व्यक्तिमत्वात मला तरी तसे काही जाणवले नव्हते. अमेरिकेत उपचार घेत असताना तिने स्वतः अनेकदा ट्विट करुन काही गोष्टी व्यक्त केल्याने मिडियाला योग्य माहिती मिळाली आणि उगाचच काहीच गैरसमज झाले नाहीत. सोनालीचा हा दृष्टिकोन अगदी योग्य होता. अन्यथा उगाच काहीतरी गैरसमज निर्माण होतात याची तिला जाणीव आहे. तो एक वेगळा विषय आहे. महत्वाचे आहे ते तिने अतिशय निडरपणे/निर्धाराने कॅन्सरवर यशस्वी मात केली. या गोष्टीने समाजालाही एक विश्वास प्राप्त होईल की, कॅन्सरचे निदान होताच खचून जाऊ नये. आपल्या देशातही त्यावर मात करण्यासाठीची उपाययोजना आहे.

यापूर्वी लीसा रे, माहिरा कश्यप, मनिषा कोईराला, इरफान खान, अनुराग बसू, युवराज सिंग या सेलिब्रिटींनी कॅन्सरवर मात केलीय. योग्य उपचार पध्दतीबरोबरच आपली मानसिकता जपणे, आपले कुटुंब आणि मित्रांची साथ/शुभेच्छा आणि यातून बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक वेळ देणे हे सर्वच महत्वाचे आहे. सोनाली अमेरिकेत असताना इकडे तिच्या आई बाबांशी भेट घेतली तेव्हा त्यांनीही दाखवलेला संयम मला विलक्षण भावला. खरं तर इतक्या वर्षात खुद्द सोनाली आणि तिच्या आई बाबांच्या वागण्यातून कधीच ‘स्टारचे घर ‘ हा फिल जाणवला नाही आणि यातच सोनाली एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून कॅन्सरशी लढा देण्याची मानसिकता बळकट ठेवू शकली असे वाटते. अर्थात तिच्या पतीची म्हणजे गोल्डी बहेलची तिला सावलीप्रमाणे लाभलेली साथ आणि तिला आपल्या मुंबईत शिक्षण घेत असलेल्या मुलाची असलेली ओढ या गोष्टीही तिच्या पोस्टमध्ये व्यक्त झाल्या. स्टारमध्ये एक संवेदनशील माणूस असतोच, तिच प्रामाणिक भावना यात व्यक्त झाली.

ऋषी कपूर, राकेश रोशन यांनादेखील कॅन्सर असल्याच्या पोस्ट आल्या. ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेतोय. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेले ‘भविष्यात कर्करोग हे फक्त राशीचक्रातील एक चिन्ह असावे ‘ ही ओळ कमालीची भावनिक आहे. तर आपले पिता खूप कणखर आहेत असे ह्रतिक रोशनने राकेश रोशनला असलेल्या कॅन्सरविषयी म्हटलं.

या सेलिब्रिटीजचे हे सकारात्मक दृष्टिकोन आणि सूर जनसामान्यांना खूपच मोठा आधार आहेत. अर्थात, इतरही क्षेत्रातील अनेकांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली आणि आपले गती मंदावलेले आयुष्य पुन्हा नव्यानं आणि उमेदीने सुरु केले, योग्य ते उपचार आणि पथ्य कायम ठेवतच त्यांनी ती वाटचाल सुरू ठेवली, तेही समाजासाठी चांगले आदर्शच आहेत. सेलिब्रेशनचा सामाजिक प्रभाव जास्त असल्याने ते ज्यात जिंकतात, तसेच आपणही विजयी होऊ असे अनेकांना वाटते, म्हणूनच कॅन्सरवर मात करून पुन्हा नवा जोश, नवी दृष्टी याने कार्यरत झालेल्या रुपेरी स्टार्सची अशी विशेष दखल. त्यांनी समाजाला दिलेली आशा वा विश्वास ही खूपच मोठी गोष्ट आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर असा त्यांनी दिलेला विश्वास ही ग्लॅमर आणि गॉसिप्स याही पलिकडची ती मोठीच ताकद आहे. आपण समाजाला हे खूप काही दिलेय याची त्यांनाही पटकन कल्पना येणार नाही.