News Flash

जागतिक वारसा दिन २०२१ः भूतकाळाचं ‘भविष्य’ काय?

आपला इतिहास आपणच जपायचा आहे. परके येऊन तो फक्त उद्धवस्त करु शकतात, जपू शकत नाहीत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करुन पावलं उचलायला हवीत.

आज १८ एप्रिल म्हणजे जागतिक वारसा दिन. दरवर्षी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीची या दिवसाची थीम आहे ‘Complex Past, Diverse future’. मराठीत आपण याला ‘जटील भूतकाळ, वैविध्यपूर्ण भविष्य’ असं म्हणू शकतो. भूतकाळातल्या ऐतिहासिक स्थळांसंदर्भात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करता वैविध्यपूर्ण भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात आपण आजच्या दिवसानिमित्त चर्चा करुया. या लेखात जगभरातल्या किंवा भारतातल्या ऐतिहासिक वारसास्थळांचा उल्लेख नाही, त्यांच्याबद्दल माहिती नाही. कारण ती आपल्याला एका क्लिकवर आज सहज उपलब्ध आहे. उपलब्ध नाही तो या स्थळांच्या विकासासाठी, इतिहास संवर्धन आणि जतनासाठीचा दृष्टिकोन. तो कसा प्राप्त करता येईल यासाठी कदाचित या लेखातून चालना मिळू शकेल. ज्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळालेला आहे, त्यांच्या अनुषंगाने तर विचार व्हायलाच हवा. पण अशी अनेक ऐतिहासिक स्थळं, अनेक वास्तू जागतिक दर्जा नसला तरी तेवढ्याच महत्त्वाच्या आणि भारताच्या इतिहासात मोलाचं योगदान दिलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या जागतिक वारसादिनी अशा वास्तूंचाही विचार व्हावा, यासाठीचा हा प्रयत्न!

संपूर्ण मानवजातीला एक गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून पाहायला गेलो तर माकडाचा माणूस झाला हीच खूप मोठी क्रांती आहे. त्यानंतर माणसाने आपल्या गरजेप्रमाणे शोध लावले. चाकाचा शोध, आगीचा शोध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीचा शोध. हा सगळा इतिहास आपण आज ठामपणे सांगू शकतो कारण आपल्यापर्यंत तो तसा पोहोचला आहे. लिखित अथवा मौखिक वाङमयाच्या आधारावर हा इतिहास आपण वाचला, ऐकला आहे. हा इतिहास वारंवार सिद्धही होत आहे. जसजसा काळ पुढे गेला, तसतसं तंत्रज्ञानही पुढे गेलं. ज्या त्या काळातल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन माणसाला आपल्या उत्क्रांतीचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याची इच्छा होत होती आणि त्यामुळेच आज आपल्याला आपला इतिहास माहित आहे. किंबहुना आपण ठामपणे तो सांगू शकतो. आपल्या-आपल्यात त्याबद्दल दुमत नाही.

ऐतिहासिक स्थळांचंही काहीसं असंच आहे. त्यांना स्वतःचा एक इतिहास आहे आणि तो काळाबरोबर चालत आजपर्यंत पोहोचला आहे. परंतु, उत्क्रांतीच्या इतिहासाइतकं ठामपणे आपण या ऐतिहासिक वारश्याचा इतिहास सांगू शकत नाही. या स्थळांबद्दल अनेक बाबतीत दुमत आहे, वाद आहे. एवढंच काय, महाराष्ट्राचे आराध्य असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दलही वाद आहेत. रामायण-महाभारताबद्दलही वाद आहेत. रामायण घडलंच नाही असं म्हणणाराही गट आहे आणि ते सगळं सत्य होतं असं म्हणणाराही गट आहे. पण असे वाद, असं दुमत मानवी उत्क्रांतीबाबत नाही. का? कारण त्याबाबतचे ठोस पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या आपण त्याचा शोध घेऊ शकलो. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं माणसांनी आपल्या उत्क्रांतीबाबत नवनवीन तंत्रज्ञान वापरून संशोधन केलं, वेळोवेळी त्यात भर घातली आणि एक सर्वमान्य, ठोस निष्कर्ष काढला. या निष्कर्षाला कोणत्याही जाती-धर्माचे, पंथाचे लोक, कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आहे का असं कोणी जे ठामपणे म्हणेल की आपण माकडापासून विकसित झालो नाही? असं कोणीच नाही. कारण ते पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे आणि हे पुरावे पिढ्यानपिढ्या जपले गेले. विधानं बदलली, संशोधनं झाली तरी त्याचा पाया मात्र हाच राहिला. तो तसाच जपला गेला आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला गेला. पण जे मानवजातीच्या वारश्याच्या बाबतीत झालं, ते आपल्या ऐतिहासिक वारश्याच्या बाबतीत नाही झालं.

 

मुंबईचा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पाहाः

आपल्या देशावर मुघल, इंग्रज, पोर्तुगीज अनेकांनी आक्रमण केलं. त्यामुळे आपल्या देशातल्या साधनसंपत्तीची अपरिमित हानी झाली. आपल्या देशाचा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या अनेक वास्तू, अनेक जाती धर्मांची प्रार्थनास्थळं उद्धवस्त झाली. पण आत्तापर्यंतच्या एकाही पिढीतल्या माणसांना आपला वारसा जपावा असं वाटलं नाही का? कोणीच त्या त्या वेळी या इमारतींची डागडुजी का केली नाही? कारण कोणालाही आपल्या या इतिहासाचं महत्त्व पटलंच नाही. अर्थात याव्यतिरिक्त काळाच्या, परिस्थितीच्याही अनेक मर्यादा असतील. पण यामुळे भविष्यावर मोठा परिणाम झाला. ज्या त्या काळच्या राज्यकर्त्यांची आपल्या वारश्याबद्दलची उदासिनता आजच्या इतिहासाबद्दलच्या संभ्रमावस्थेला कारणीभूत ठरली. अयोध्येतल्या या जागी मंदिर होतं की मस्जिद हा वाद उद्भवलाच नसता जर आपल्या पूर्वजांनी आपल्या इतिहासाचं जतन आणि संवर्धन करणं महत्त्वाचं मानलं असतं. जात धर्म कोणताही असो, इतिहास हा मानवाचा आहे. जगप्रसिद्ध असलेला आग्र्याचा ताजमहाल मुसलमान व्यक्तीने बांधला असला तरी तो आज ख्रिश्चन, हिंदू, शीख, पारशी अशा अनेक जातीधर्माचे लोक असलेल्या भारताची ओळख बनला आहे. महाबलिपूरम इथल्या मंदिरातल्या देवाची पूजा जरी फक्त हिंदू किंवा एका ठराविक समाजातले लोक करत असले तरी ते जगभरात ‘भारतातलं मंदिर’ म्हणूनच ओळखलं जातं. त्यामुळे आपल्या इतिहासाचं, ऐतिहासिक वारश्याचं जतन करणं ही प्रत्येक “माणसा”ची जबाबदारी होती, आहे आणि राहील. त्यामुळे प्रत्येक पिढीतल्या माणसाने आपल्या ऐतिहासिक वारश्याला जपलं पाहिजे, त्याच्या संवर्धनासाठी काळाप्रमाणे तंत्रज्ञान वापरून योग्य ते उपाय केले पाहिजेत.

हे झालं मागच्या पिढ्यांचं. त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून आज आपल्या वारसास्थळांची ही अवस्था आहे. बरीच स्थळं छिन्नविच्छिन्न अवस्थेत आहेत, त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही चांगल्या अवस्थेत आहेत, मात्र त्यांनाही नुकसान होण्याची भीती आहेच. मागच्या पिढ्यांचं सोडून देऊ. कारण, त्यात बदल करता येणं अशक्य आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता गोष्टी आजच्या पिढीकडे आल्या आहेत. आजच्या पिढीने २१ व्या शतकाच्या दृष्टिकोनातून या वारसास्थळांकडे पाहायला हवं. आपला इतिहास आपणच जपायचा आहे. परके येऊन तो फक्त उद्धवस्त करु शकतात, जपू शकत नाहीत. न जाणो पुढच्या काळातही अनेक आक्रमणे देशावर होतील. आज जसं करोनाचं आक्रमण होत आहे, तसं अजूनही कोणतं आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे त्याचा विचार आपण आजच करायला हवा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत. आता मागे म्हटल्याप्रमाणे २१व्या शतकाच्या दृष्टिकोनातून विचार हवा म्हणजे काय…तर २१वं शतक हे तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला वारसा कसा जपू शकतो याकडे लक्ष द्यायला हवं.

यासंदर्भात दोन मुख्य पर्याय समोर दिसत आहे.

भारत तरुणाईचा देश आहे. अनेक गुणी, हुशार तंत्रज्ञ, अभियंते, स्थापत्यकार आज आपल्या देशात घडत आहेत. हे तरुण मनुष्यबळ इतिहास संवर्धन आणि जतनाच्या कार्यात मोठा हातभार लावू शकतं. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या चुका आपण काही प्रमाणात सुधारुही शकतो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचा आधार घेऊन आपण आपला इतिहास जगापर्यंत पोहोचवू शकतो. सध्या भारतात अनेक ठिकाणी लेझर शो आहेत, ज्याच्या माध्यमातून इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तशाच पद्धतीने जरा पुढे जात आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेलाच आपला इतिहास सांगायला लावला तर? अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेल्या वास्तू आपण 3D तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या पूर्वी कशा होत्या याचा अंदाज येईल अशा पद्धतीने दाखवू शकतो. युरोपातही हा प्रयोग करण्यात आला आहे. युरोपमध्ये DCH ( Digital Cultural Heritage) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये त्या भागातल्या वारसास्थळांबद्दलची माहिती, त्यांची रचना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेसमोर मांडली आहे. यासाठी त्यांनी 3D तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे पुरातन वास्तूंचा व्हर्च्युअल अनुभव घेता येऊ शकतो. ड्रोन, लेजर स्कॅनर, 360 डिग्री कॅमेरे यांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. हेच आपण भारतातही करु शकतो. भारतासाऱख्या समृद्ध वारसा लाभलेल्या आणि सक्षम तरुणाई असलेल्या या देशात हे शक्य आहे. यामुळे देशातला बेरोजगारीचा प्रश्न सुटायलाही हातभार लागेल आणि देशातलं बुद्धिमान मनुष्यबळ देशातच थांबवून त्याचा देशाच्या विकासासाठी वापर करता येईल.

पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल तेव्हा दुसऱ्या पर्यायावर घराघरात विचार होईल. दुसरा पर्याय म्हणजे इतिहास अभ्यासक, लेखक आणि संशोधकांची निर्मिती करणं. इतिहासाच्या संशोधनाला जास्तीत जास्त प्रेरणा मिळायला हवी. जेणेकरुन योग्य इतिहास लिहिला जाईल आणि आत्तापर्यंतचा इतिहास ज्याचं जतन करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तंत्रज्ञांना योग्य दिशा मिळेल. हा इतिहास संशोधक, लेखक देशातल्या सर्व जातीधर्मांमधून यायला हवा. जेणेकरून देशातल्या विविधतेचा इतिहास विविध शैलींच्या माध्यमातून आणि निःपक्षपणे लिहिला जाईल. इतिहास संशोधनासंदर्भातल्या शिक्षणाला चालना देणं, त्यासाठी संशोधकांना प्रोत्साहित करणं, त्या अनुषंगाने आवश्यक त्या योजनांची अंमलबजावणी, इतिहास मंडळांना अनुदाने असे आणि याहूनही योग्य उपाय करणं गरजेचं आहे. प्रशासनाने फक्त जागतिक दर्जाच्या वारसास्थळांवर लक्ष केंद्रित न करता इतरही ऐतिहासिक स्थळांकडे लक्ष द्यायला हवं. त्यांच्या डागडुजीकरता वेळोवेळी प्रयत्न करायला हवेत. पुरातत्व विभाग अधिक सक्षम आणि शिक्षित व्हायला हवा.

प्रशासनाची जबाबदारी यामध्ये मोठी आहे. कारण ते निर्णय प्रक्रियेत सामील असतात. पण प्रशासनावर संपूर्ण जबाबदारी सोडूनही उपयोग नाही. या पिढीतला एखादा तरुण उद्याचा पंतप्रधान, मुख्यमंत्री होऊ शकतो. तेव्हा उद्याचा विचार करुन आजच आपण आपली जबाबदारी ओळखायला हवी. सरकार काही करत नाही म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. आपण किमान आपल्या परिसरातल्या, गावातल्या, जिल्ह्यातल्या ऐतिहासिक स्थळांसाठी पुढे येऊ शकतो. फार काही आपल्या हातात नसलं तरी किमान अशा स्थळांबद्दलचा इतिहास जाणून घेणं आणि त्याची शक्य तेवढी शहानिशा करुन तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे तर आपण करुच शकतो. तेव्हा तेवढ्या पुढाकाराची तरी अपेक्षा जनतेकडून करायला हरकत नाही. इतिहासामुळे निर्माण झालेली जटीलता सोडवण्यासाठी आज केलेले प्रयत्न वैविध्यपूर्ण भविष्याचं स्वप्न साकार करण्याच्या कामी नक्कीच येतील.

वैष्णवी कारंजकर

(vaishnavi.karanjkar@loksatta.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 9:37 am

Web Title: world heritage day 2021 think how we can preserve through technology vsk 98
Next Stories
1 Blog: लिओनार्दो द विन्ची कोड
2 Story Of The Indian Second Sex; ‘पण ट्रेंडी नको शाश्वत हवं’
3 Letter from Corona: …कळावे लोभ असावा; आपला कृपाभिलाषी ‘करोना’
Just Now!
X