रवी पत्की

युवराज सिंग निवृत्त झाला. त्याने बॅट बॅगमध्ये ठेवली म्हणण्यापेक्षा त्याने बॅट म्यान केली असं म्हणावं लागेल. कारण त्यानी स्टिअर, गलान्स वगैरेचा वापर करून चित्रकाराच्या ब्रशप्रमाणे नजाकतीने बॅट वापरली नाही तर योध्याप्रमाणे बॅटची तलवार करून सपासप चौकार, षटकार खेचले. सळसळतं रक्त, आव्हानाला भिडण्याचा बेडर स्वभाव हे पंजाबी गुण वंशपरंपरागत मिळाले होतेच. त्याला प्रतिभेच्या गोफात गुंफले आणि तयार झाली भारतीय क्रिकेटला सुवर्णकाल दाखवणारी युवराज नावाची शिल्पकृती. हे शिल्प सचिन तेंडुलकर सारखे आखीव रेखीव बांधीव नियमाला धरून रहाणारे असे नव्हते. त्याचा साचा वेगळा होता. कधी प्रशिक्षकांनी कधी जेष्ठ खेळाडूंनी त्याला शिस्तीत ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न केला म्हणून आपण अनेक वर्ष या कलाकृतीची झळाळी पाहू शकलो.

7 ऑक्टोबर 2000 ची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच अजूनही डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे. दसरा होता. संध्याकाळी सोनं घेऊन देवीला जायचं होतं आणि त्याच वेळेस युवराजने कारकिर्दीच्या पहिल्या यशाचं सीमोलंघन केलं. मॅगरा, ली, गिलेसपी यांची मोठी दहशत तेव्हा होती. पण युवराजच्या बॅटीतून हुक आणि पुलचे असे कडाकड आवाज निघाले तेव्हाचं कळल होतं की ये लडका राज करेगा. तारुण्याचं चैतन्य आणि प्रतिस्पर्ध्याच्या नावलौकिकाला फाजील महत्व न देण्याची वृत्ती युवराजला वेगळी शिकवण्याची गांगुलीला गरज नव्हती. योगराज सिंह बुंदेल नावाच्या पंजाब दा पुत्तर ने ती युवराजला जन्मतःच बहाल केली होती.

लेग साईडचा बादशाह : स्क्वेअरलेग ते लॉंग ऑन या आर्क मध्ये युवराजने राज्य केलं. त्याचा पंच स्ट्रेट ड्राईव्ह सुखद होता. ऑफ साईडचा गेम त्याने हळू हळू तयार केला.तरी नैसर्गिकरित्या ऑफ साईडकडे कल नसल्याने धावा जमवण्याकरता मिडविकेट ही त्याची ‘गो टू’ जागा होती.फुटवर्क नसलेला सेहवाग केवळ हात आणि नजर यांच्या समन्वयातून कसोटी क्रिकेट मध्ये सुद्धा आश्चर्ययकारक रित्या यशस्वी झाला पण त्याच जातकुळीतल तंत्र असलेल्या युवराजला कसोटीतील यशाने हुलकावणी दिली.

फास्ट बॉलर्सचा कर्दनकाळ : फास्ट बॉलर्सचा स्पीड वापरून धावा लुटायला युवराजला आवडत असे. वेगाने येणाऱ्या चेंडूला दिशा दाखवून धावा वसूल करण्यात त्याचा हातखंडा होता. त्यामुळेच स्टुअर्ट ब्रॉडला सहा बॉल ला सहा षटकार त्याने विनासायास खेचले. हवेतून संथ वेगाने येणाऱ्या स्पिन गोलनदाजीने त्याला कायम त्रास दिला. प्रतिस्पर्ध्यांनी ही गोष्ट ओळखली होती.त्यामुळे तो फ्लनदाजीला आला की स्पिन गोलनदाज आणले जायचे.

गांगुलीच्या ड्रीम टीमचा शिलेदार : ज्या गांगुलीच्या संघाने भारतीय क्रिकेटला नवी आक्रमक ओळख दिली त्या संघाच्या यशात युवराजने कायम भरीव योगदान दिले. त्यामुळे युवराजला भारतीय क्रिकेट मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.

जीवनाचे कडू धडे : आयुष्य हे चढ उताराने व्यापलेले असते त्यामुळे स्थित:प्रज्ञनता हा जीवनाचा स्थायीभाव हवा हा धडा नियतीने युवराज इतका कुणालाही अधिक कडवटपणे शिकवला नसेल. उत्तुंग यशानंतर अपयशाचे खाचखळगे, कीर्तीच्या शिखरावर पोचताक्षणी झालेले रोगाचे निदान हे पचवताना तो काय दिव्यातून गेला असेल याची कल्पनाच केलेली बरी. या परिस्थितीचा मुकाबला करण्याचे धैर्य सुदधा त्याला क्रिकेटच्या शाळेतल्या शिकवणुकीमुळेच मिळाले असणार.

लेफ्ट आर्म स्पिनची उपयोगिता : युवराजच्या लेफ्ट आर्म स्पिन मुळे संघाला आवश्यक संतुलन कायम मिळाले. पाच ते सहा ओव्हर्स मध्ये दोन विकेट्स त्याला नियमाने मिळत असत. वेगाच्या विविधतेतून चकवणे हा त्याच्या गोलनदाजीचा स्थायीभाव होता.

इम्पॅक्ट प्लेअर : क्रिकेट मध्ये खेळावर इम्पॅक्ट करणाऱ्या खेळाडूला महत्व असते.युवराजच्या खेळीने कायम सामन्याचे निकाल ठरत. ह्या योगदानाचे मूल्य होऊ शकत नाही.

युवीज कॉर्नर : चित्त्याच्या चपळाईने केलेल्या फिल्डिंगने त्याने मैदानावर पॉइंटच्या क्षेत्रावर स्वतःचे नाव कोरले होते.समालोचकांनी पॉईंटला ‘युवीज कॉर्नर’ असे नाव देऊन युवराजला खूप आधीच जबरदस्त सन्मान दिला होता. भारतीय क्रिकेट रसिकांच्या हृदयात युवराज करता कायम एक हळवा कोपरा असेल. तोच आपला ‘युवीज कॉर्नर’