प्रिय नाना
पत्रास कारण की.. मला ठाऊक आहे तू हे पत्र वाचू शकणार नाहीस. मला हे देखील माहीत आहे की तुला मी तू म्हणावं असं नाही. पण तरीही हे म्हणतोय कारण एकदा एका भाषणात तूच म्हणाला होतास ए नान्या म्हणून जी हाक मारली जाते ना तोच खरा माझा प्रेक्षक. त्याच भावनेतून हे पत्र लिहायला घेतलं आहे.
मला तुझ्या अभिनयातला सर्वात महत्त्वाचा पैलू वाटला तो म्हणजे तो तुझा आक्रमक आणि बंडखोर स्वभाव. पडद्यावरचा तुझा वावर तो पडदा व्यापून टाकणारा असायचा. प्रेक्षक म्हणून पाहताना अगदी छाप पडायची तुझी. तू नाटकात जे काम करायचास तेदेखील तसंच असायचं. तुझा वावर आपला वाटत होता. त्यामुळेच तू मला आणि माझ्यासारख्या प्रत्येकाला आणि असंख्य प्रेक्षकांना आपलंसं केलं होतंस. अशातच बातमी आली ती तुझ्या निधनाची. क्षणार्धात मन भूतकाळात रमलं आणि तुझ्या चित्रपटांमधले असंख्य सीन नजरेसमोर तरळले.
‘परिंदा’त तू साकारलेला ‘अन्ना’ अजरामर ठरला. “अब्दुल, भाई भाई का प्यार बीच में आये तो दोनो को गोली मार दे” हे तू ज्या निर्विकारपणे सांगतोस त्याला तोड नव्हती. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर असे एकाहून एक रथी, महारथी परिंदामध्ये होते तरीही तू तुझ्या भूमिकेचं वेगळेपण जपलंस. आगीची भीती वाटली की तुझा पारा कसा सुटतो हे डोक्यावर हात मारून आणि बोंबा मारून दाखवून दिलं होतंस ते केवळ लाजवाब. तुझी भीती वाटावी इतका क्रूर अन्ना तू उभा केला होतास. क्लायमॅक्सच्या सीनमध्ये अन्नाला जाळून मारण्यात येतं. या सीनमध्ये तू खरोखर भाजला होतास तरीही तू सीन सोडला नाहीस ही तूच अलिकडे सांगितलेली आठवण. भूमिकेत जीव ओतून काम करणं काय हे यालाच म्हणतात.
त्यानंतर आलेले तुझे ‘अग्निसाक्षी’, ‘यशवंत’, ‘युगपुरूष’ हे चित्रपटही तसेच. यशवंतमध्ये एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है ही तुला सुचलेली कविता तू चित्रपटात ज्या अंदाजात म्हटलीस आणि तमाम प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडलंस. तसंच वेगळ्या धाटणीचे किंवा ज्याला आर्ट फिल्म म्हणता येतील असे ‘दिक्षा’, ‘सलाम बॉम्बे’, ‘थोडासा रूमानी हो जाये’ हे चित्रपटही तू केलेस. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो तुझ्या क्रांतीवीर आणि तिरंगा या चित्रपटांचा. दोन्ही चित्रपट त्या काळातले सुपरहिट ठरले. त्यातले तुझे संवाद आजही प्रेक्षकांना पाठ आहेत. “ये देख ये हिंदू का खून ये मुसलमान का खून बनाने वालेंने इसमे फर्क नहीं किया तो तू कौन होता है फरक करनेवाला?” हे तुझं विचारणं असेल किंवा तिरंगा मधला तुझा “मै शिवाजीराव वागले, मराठा, मराठा मारता है या मरता है.” हा संवाद असेल त्या चित्रपटांनी तो काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
‘प्रहार’ चित्रपटात मेजर चौहान बनून आलास तेव्हा जाणवलं की, असा मेजर करावा तर तो तूच. ‘राजू बन गया जंटलमन’ मधल्या तुझ्या ‘जय’ने हलकीफुलकी कॉमेडी करत हसवलं. तर ‘खामोशी’मधल्या तुझ्या जोसेफने रडवलं. तू कायम व्यवस्थेशी भिडणारा ‘नायक’ साकारत आलास पण खामोशीतल्या तुझ्या मूक अभिनयाने तू काय कमाल करू शकतोस आणि त्या भूमिकेत कसे रंग भरतोस हे सगळ्यांनाच कळलं. ‘वजूद’ मधली “कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिये तुम कौन हो” ही कविता जशी तुला माधुरीच्या प्रेमात पाडणारी ठरली तशीच ती आम्हालाही. कैसे बताऊं मैं तुम्हे हे माधुरीसाठी म्हटलं होतं म्हणून लक्षात राहिली कविता हे सांगण्याचा मोकळाढाकाळा स्वभावही तुझा होताच.
मला कायमच असं वाटत आलंय की ‘अब तक छप्पन’ हा शिमीत अमीन दिग्दर्शित चित्रपट तुझ्या चित्रपट कारकिर्दीला वेगळं वळण देणारा सिनेमा ठरला. कारण यात तू भूमिका साकारली एन्काऊंटर स्पेशालिस्ट साधू आगाशेची. हे पात्र दया नायक यांच्यावर बेतलेलं होतं असं सांगितलं गेलं. पण मुंबई पोलीस खातं, त्यांची काम करण्याची पद्धत, एन्काऊंटर स्क्वाड या सगळ्यात तू ‘साधू’ या भूमिकेत ज्या संयतपणे वावरलास त्याला तोड नाही. तेवढीच मजा आणली ती तुझ्या ब्लफमास्टर सिनेमातल्या ‘चंद्रकांत पारेख’ या व्यक्तिरेखेने. स्वतःची आरती करणारा, नुकसान भरपाईसाठी कारवर स्क्रॅच करणारा तुझा चंद्रकांत छानपैकी आनंद पेरून गेला. खळखळणाऱ्या नदीचं पात्र जसं नंतर शांत होतं तसं काहीसं तुझ्या भूमिकांच्या बाबतीच झालं असं नंतरच्या टप्प्यात केलेल्या भूमिका पाहून जाणवतं.
मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतही तू काम करत राहिलास. मग हमीदाबाईची कोठी, पुरुष ही नाटकं असोत किंवा भालु मधला तुझा व्हिलन, पकपकाक मधला तुझा ‘भुत्या’ देऊळमधला भाऊसाहेब गलांडे सगळेच आम्हाला ‘आपले’ वाटले कारण तू या सगळ्याच भूमिका जगून त्यांचं सोनं केलं आहेस. नाना एकदा तू म्हणाला होतास की कलाकार कायमच दुसऱ्याचं दुःख झेलत जगत असतो, याचं कारणही तू सांगितलं होतंस की जी भूमिका साकरतो ती भूमिका तशी आत्मसात करावी लागते. आजवर तुझी सेटवर, दिग्दर्शकांशी झालेली भांडणं असतील किंवा तुझे त्यांच्याशी झालेले मतभेद असतील हे सगळंच आम्ही वाचत आलो. पण प्रेक्षक म्हणून सांगतो आम्हाला तू कायमच आपला वाटत आलास.
नाना तू आपला वाटलास कारण, तुझा अभिनय सच्चा होता. भूमिका साकारण्याची तुझी पद्धत सहज होती. एखाद्या भूमिकेत शिरून ती जिवंत करायचं कसब तू अंगी बाणवलं होतंस. नटसम्राटमधली तुझी स्वगतं असतील, विक्रम गोखले आणि तुझा कृष्ण आणि कर्णाचा सीन असेल किंवा The Attacks of 26/11 मध्ये तू साकारलेला राकेश मारिया कसाबला जे सांगतो ते स्वगत असेल ते कायमच आठवत राहील. अंतरंगीच्या नाना कळा दाखवत तू अभिनय करत राहिलास, पुन्हा पुन्हा आम्हाला तुझ्या प्रेमात पाडत राहिला आहेस. खंत इतकीच आहे की हे पत्र वाचायला तू हवा होतास.. पण नियतीला हे मान्य नसावं.
तुझाच
समीर जावळे
(एक प्रामाणिक प्रेक्षक)
