वबा (महामारी) फैली हुई है हर तरफ
अभी माहौल मर जाने का नहीं

राहत साहब, तुम्हीच हे सांगितलं आणि एक्झिट घेतलीत. तुम्ही गेल्याच्या वृत्तानं प्रचंड कालवाकालव झाली. खरंतर इंदौर कधी बघितलं नाही, ना तुम्हाला मुशायऱ्यात ऐकायची संधी मिळाली. उर्दूच्या प्रेमात पडत असतानाच तुम्ही लिहिलेलं, ऐकवलेलं कानावर पडत गेलं आणि जवळीक वाढत गेली. मिर्झा गालिब, वसीम बरेलवी, निदा फाजली, मोहम्मद फराज, साहिर लुधियानवी, जॉन एलिया अशी कितीतरी नावं… शेरोशायरी ही केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी नसते, त्यापलीकडेही राजकीय, सामाजिक आत्मभान जागं करणारी साहित्यकृती असते हे तुमच्या गझला वाचताना कळालं. मुशायऱ्यात तुम्ही उभं राहिल्यानंतर लोकं अक्षरक्षः डोक्यावर घ्यायचे. हे तेव्हाच होतं जेव्हा त्यांच्या मनातील भावभावना आणि विचार कवीच्या लेखनातून प्रतिबिंबित होतात.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही

कवी, लेखक आणि सत्ता यांचं फारसं जमतं नाही. कवी थेट सत्तेलाच आव्हान देतो त्यामुळे कदाचित दोघांमध्ये सख्य नसावं. पण, यालाही अपवाद आहेतच. भूमिका, विचार गुंडाळून ठेवून सत्तेच्या घरी पाणी भरणारेही भरपूर आहेत. तुम्ही त्यापैकी नव्हता आणि तुम्हाला ते कधी जमलं नाही. तुमच्या सुरूवातीपासूनच्या संघर्षानंच तुमच्यात हा स्वाभिमान पेरला असावा. कुणाला विश्वास बसेल की तुम्ही एमएचं शिक्षण घेण्याआधी ट्रकच्या नंबरप्लेट लिहायचे. नंतर प्राध्यापक… मग मुंबईत चित्रपटांसाठी गीत लेखन, मग पुन्हा इंदौर आणि मुशायरे… या संघर्षांमुळेच तुमच्या स्वाभिमानाची किंमत कुणाला लावता आली नाही, ज्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यांनाही तुम्ही किती सणसणीत सुनावलं…

वो चाहता था कि कासा ख़रीद ले मेरा,
मैं उस के ताज की क़ीमत लगा के लौट आया

तुमच्या विषयीचा आदर वाढला तो तुमच्या ठाम राजकीय, सामाजिक भूमिकेमुळे. लिहिणाऱ्या हातांनी सत्तेच्या पंखाखाली आसरा शोधायचा नसतो. तर सतत प्रश्न विचारून आव्हान द्यायचं असतं, हे तुम्ही तुमच्या साहित्यकृतीतून दाखवून दिलं. त्यामुळेच सत्तेच्या आजूबाजूला असलेले मुंगळे तुम्हाला चावायचे आणि तुमच्या नावावरून तुमच्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित करायचे? अगदी शेवटपर्यंत… पण तुम्ही त्यांना बधला नाहीत. तुम्ही जशास तसं उत्तर दिलं.

मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना,
लहू से मेरी पेशानी पे हिन्दुस्तान लिख देना।

हे इतकं धारदार शब्द येतात कुठून? नंतर लक्षात येतं इथल्या लोकांनी दिलेल्या वागणुकीतून. राहत साहब,  तुमच्यावर प्रेम करणारी जितंकी माणसं आहेत. तितकंच तुमच्या नावामुळे आणि धर्मामुळे नफरत करणारीही आहेतच. नावावरून, धर्मावरून तुमच्या देशप्रेमावर शंका घेणाऱ्या लोकांबद्दलची सल तुम्ही बोलून दाखवली होती. तुम्हाला जिहादी संबोधलं होतं, कट्टरतावादाची पट्टी बांधलेल्यांना तुम्ही सत्तेला दिलेलं आव्हान बोचलं असावं. म्हणून मग तुम्हाला थेट जिहादी संबोधून मोकळे झाले. म्हणून मग तुम्ही रात्रभर विचार करत बसलात. तुम्हाला वाईट वाटलं असेलच… त्यानंतर तुम्ही दिलेलं हे उत्तर देश सोडून जा म्हणाऱ्यांना विचार करायला लावणार होतं.

अपनी पहचान मिटाने को कहा जाता है
बस्तियाँ छोड़ के जाने को कहा जाता है

राहत साहब, मला तुमच्या प्रेमाच्या शायरीपेक्षा सत्तेला आव्हान देणाऱ्या राजकीय रचना अधिक जवळच्या वाटतात. सध्या तर त्याचीच जास्त गरज आहे. विशेषतः अलिकडच्या काळात… उगीच नाही तुम्ही २५-३० वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या रचनेतील

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.

हा शेर प्रत्येकावेळी सत्ताधाऱ्यांना राष्ट्रभक्ती सांगणाऱ्यांना ऐकवला जात नाही. खरंतर ही पूर्ण रचनाच सत्तेला आव्हान देणारी आहे. तुमची ही रचना वाचली की फैज अहमद फैज यांच्या

हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
याची आठवण होते. इतकं स्पष्टपणे तुम्ही सत्तेत असणाऱ्यांना सांगितलं. थेट आणि सत्तेच्या दबावाला धुडकावून लावणारं.

अगर खिलाफ हैं, होने दो, जान थोड़ी है
ये सब धुँआ है, कोई आसमान थोड़ी है
लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है
मैं जानता हूँ कि दुश्मन भी कम नहीं लेकिन
हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है
हमारे मुंह से जो निकले वही सदाक़त है
हमारे मुंह में तुम्हारी ज़ुबान थोड़ी है
जो आज साहिब-इ-मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं जाती मकान थोड़ी है
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.

राहत साहब, तुम्ही गेलात. तुम्ही जे मांडून ठेवलंय. ऐकवून गेलात. ते सगळं राहिलंच सोबत. पण, आजच्या स्थितीत व्हॉटस अ‍ॅपनं साक्षरतेचा ठेका घेतलाय. लोकांना तिथूनच इतिहास, भूगोल, गणित आणि एंटायर पॉलिटिकल सायन्स समजावलं जातंय. गोंधळाच्या, भ्रमिष्ट वातावरणाच्या काळात नजरेला नजर भिडवून उत्तर देणाऱ्यांची गरज आहे. म्हणून तुमच्या जाण्याची उणीव जास्त जाणवतेय… राहत साहब, तुम्ही गेल्यापासून साकिब लखनवी यांचा शेर वारंवार ओंठावर येतोय…

ज़माना बड़े शौक़ से सुन रहा था हमीं
सो गए दास्ताँ कहते कहते

राहत साहब, आम्ही तुम्हाला ऐकत असतानाच असाच काहीसा तुम्ही आमच्यातून निरोप घेतलात…!

तुमचा एक चाहता

– भागवत हिरेकर

(Email : bhagwat.hirekar@loksatta.com )