डॉ.प्रदीप आवटे

Dr. Ambedkar Jayanti 2023 “अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद किती तोकडी आहे ते पाहा. एकूण अर्थसंकल्पीय खर्चाच्या अवघी अडीच टक्के! आमची खेडी पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. शेकडो गावांना पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. आमची खेडी म्हणजे निव्वळ उकिरडे झाले आहेत. त्यांना गाव म्हणणेच चूक आहे. ग्रामीण भागात सांडपाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. मलेरियाने, इतर आजारांनी शेकडो लोक मरण पावताहेत. ग्रामीण भागात क्वचितच एखादा दवाखाना दिसतो आहे. औषधवाटपासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी कोठेही, कसलीही सुविधा दृष्टोत्पत्तीस येत नाही. पिण्याच्या पाण्याअभावी, वैद्यकीय मदतीअभावी शेकडो लोक मरताहेत.”
दि. २ मार्च १९३८ रोजी त्या वेळच्या मुंबई प्रांताच्या असेम्ब्लीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे भाषण !

Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!
only 600 objections and suggestions filed on thane development plan
ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती
Which regions of the world are safe from nuclear war Which areas are most at risk
अणुयुद्ध झालेच तर… जगातील मोजकेच सुरक्षित प्रदेश कोणते? कोणत्या भागांस सर्वाधिक धोका?
Shah discusses with Tawde regarding non Maratha Chief Minister post Print politics news
बिगरमराठा मुख्यमंत्रीपदाबाबत शहांची तावडेंशी चर्चा

आणखी वाचा : ‘गंगा भागिरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

बाबासाहेब आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी सार्वजानिक आरोग्याचे सामाजिक प्रगतीतील स्थान नेमके ओळखले होते आणि म्हणूनच सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातील आपली भूमिका अधिक विस्ताराने विविध अभ्यासांचे संदर्भ देत ते अनेक वेळा मांडताना दिसतात. देशभरातील दलित पददलित जनसमूह हा बाबासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या जनसमूहाला सुखी-समाधानी करण्याची क्षमता असणारा सार्वजनिक आरोग्याचा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता आणि म्हणूनच या वंचित समाजगटाला सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात ते वेळप्रसंगी आक्रमक होताना दिसतात. सार्वजनिक आरोग्यासाठीची आर्थिक तरतूद अत्यंत अपुरी आहे, असे आपण विधिमंडळात सांगत असताना अर्थमंत्री मात्र हसताना दिसतात आणि बाबासाहेबांचा राग अनावर होतो, “ माझे सन्माननीय मित्र, मंत्रिमहोदय हसताहेत. त्यांनी हसलेच पाहिजे. ते दुसरे काय करू शकतात?” असे बाबासाहेब संतापाने म्हणतात. त्यावर दुसरा एक सदस्य खोडकरपणे बोलतो, “ मग त्यांनी रडावे का ?” यावर बाबासाहेब म्हणतात, “ होय त्यांनी रडायला हवे. त्यांना रडताना पाहायची माझी इच्छा आहे, कारण त्यांचे अश्रू त्यांच्या भावना सांगतील, या प्रश्नाबद्दल असणारी त्यांची सहानुभूती दाखवतील. पण असे संवेदनशून्य हसू आपणाला कोठे घेऊन जाईल ?” बाबासाहेबांची ही प्रतिक्रिया त्यांचा सार्वजनिक आरोग्यविषयक जिव्हाळा स्पष्ट करते. या जिव्हाळ्यातूनच सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील अनेक प्रश्नांवर आपल्याला आजही थक्क करणारी, काळाच्या पुढे जाणारी सुस्पष्ट भूमिका बाबासाहेब घेताना दिसतात.

आणखी वाचा : व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!

संततिनियमन हा असाच एक महत्त्वाचा प्रश्न. आज सहजतेने प्रत्येकाने स्वीकारलेला हा विषय स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अत्यंत वादग्रस्त विषय होता. १९२० सालापासून र. धों. कर्वे यांनी संततिनियमनाचा प्रचार आपल्याकडे सुरू केला होता खरे; पण रधों अक्षरशः आगीतून चालत होते. १९२१ साली मार्गारेट सॅंगरने ‘अमेरिकन बर्थ कन्ट्रोल लीग’ स्थापन केली होती. १९३५ साली ती भारतात आली होती आणि संततिनियमनासंदर्भात ती महात्मा गांधींना भेटली होती; पण माल्थसपासून महात्मा गांधीजींपर्यंत सर्वांची भूमिका एकच होती. संततिनियमनाची आवश्यकता त्यांना मान्य होती; पण त्यासाठीच्या कृत्रिम उपायांना त्यांचा विरोध होता. आत्मसंयमन हा त्यावरील सर्वोत्तम उपाय वाटत होता. एक किंवा दोन अपत्यप्राप्तीनंतर विवाहांतर्गत ब्रह्मचर्य पाळणे हाच गांधीजींच्या संततिनियमनाचा मार्ग होता. डॉ. आंबेडकरांनी या विषयावर घेतलेली भूमिका गांधी आणि माल्थसच्या भूमिकेपेक्षा अधिक व्यवहार्य आहे. एकमेकांवर प्रेम करणारे दोन तरुण जीव पती-पत्नी या नात्याने एकत्र राहत असताना आत्मसंयम आणि ब्रह्मचर्य या गोष्टी अत्यंत अव्यवहार्य आहेत, असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. सर्वसामान्य माणसे वासनेला बळी पडतात, हे उघड्या डोळ्यांना दिसणारे वास्तव नाकारण्यात काय अर्थ ? १० नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात बाबासाहेबांच्या वतीने संततिनियमनविषक ठराव पी.जे रोहम यांनी मांडला. या ठरावात बाबासाहेबांची संततिनियमनविषयक भूमिका सविस्तरपणे येते. या प्रश्नाचा बाबासाहेबांनी सर्व बाजूंनी विचार केला आहे, हेही आपल्याला जाणवते. कुटुंबनियोजनाची कृत्रिम साधने वापरणे पाश्चात्त्य समाजासाठी योग्य आहे; पण आपला समाज हा आध्यात्मिक समाज आहे, त्यामुळे आत्मसंयमन आणि ब्रह्मचर्य यांचे महत्त्व त्याला उमजते, अशी अनेकांची भूमिका होती. मुंबई विधिमंडळातील एक सहकारी सरोजिनी मेहता यांनी वाटलेली पत्रके बाबासाहेब उद्धृत करतात. ‘ केवळ जग हे माया आहे, ही व यासारखी वाक्ये पोपटपंचीसारखी म्हटल्याने कोणी आध्यात्मिक होतो का, असा रास्त प्रश्न विचारून स्त्री-पुरुष संबंधांतील वास्तव बाबासाहेब मांडतात आणि लोकसंख्या नियंत्रणासाठीची व्यवहार्य भूमिका घेण्याची विनंती करतात.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

संततिनियमनाच्या अभावाचे चटके बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवनात घेतले होते. ते स्वतः त्यांच्या माता-पित्यांचे चौदावे अपत्य होते. कुटुंबाच्या अवाजवी आकारामुळे बसणारे दारिद्र्याचे चटके त्यांनी सोसले होते. मांजरपाटाचे शर्ट, फाटलेला कोट, चपला नसणे, अनेक वेळा खिशात दिडकीही नसणे अशा अवस्थेत त्यांना शिक्षण घ्यावे लागले होते. बाबासाहेबांना स्वतःला पाच मुले झाली होती. त्यातील चार मूत्यू पावली. राजरत्नाच्या वेळी तर बाबासाहेब धाय मोकलून रडले. या पाच बाळंतपणामुळे त्यांच्या प्रिय रमाबाईंची प्रकृती खालावली. त्यातच १९३५ साली त्यांचे निधन झाले. बाबासाहेब अत्यंत हळवे होते. आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल त्यांनी लिहिले आहे,– “आमच्या चार लहानग्यांचे अन्त्यविधी करण्याचे दुर्दैव आम्हांवर ओढवले या विचारांनीच मला गुदमरायला होते. माझा लहानगा राजरत्न तर फारच गोजिरा होता. त्याच्या जाण्याने माझे आयुष्य काट्याचे बन झाले आहे.” पण महापुरुष आपली दुःखे कवटाळून बसत नाहीत. समाजाच्या विशाल दुःखाशी त्यांची नाळ जोडतात आणि नव्या परिवर्तनासाठी संघर्षशील होतात. अतिरेकी जन्मदर हाच आपल्या समाजातील वाढत्या दारिद्र्याचे, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे कारण आहे, हे बाबासाहेबांनी नेमके हेरले होते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटले आहे- “ आपल्याला मूल होऊ द्यावे अथवा नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असले पाहिजे आणि कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असली पाहिजे.”

प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे तपासून पाहणारा बाबासाहेबांमधला समाजशास्त्रज्ञ संततिनियमनावरील या चर्चेत आपल्याला ठळकपणे दिसतो. बालविवाह बंद होऊन मुलींच्या विवाहाचे वय वाढल्याने आपोआपच लोकसंख्या नियंत्रण होईल, त्यासाठी संततिनियमनाची गरज नाही, असे काहींना वाटत होते; पण १९३१च्या जनगणनेवरील पी.के वत्तल यांचे जननदरासंबंधीचे अभ्यासपूर्ण संशोधनच बाबासाहेबांनी सभागृहासमोर ठेवले आहे, वीस वर्षांच्या नंतर लग्न झालेली मुलगी वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीपेक्षा कमी मुलांना जन्म देते आणि वीस वर्षांनंतर लग्न झालेल्या मुलीला झालेली मुले वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीच्या अपत्यांपेक्षा जगण्याची शक्यता जास्त असते. ‘सर्व्हायवल रेट’ असा शब्दप्रयोग बाबासाहेबांनी वापरला आहे. म्हणजेच केवळ मुलीच्या लग्नाचे वय वाढून लोकसंख्या नियंत्रण होणार नाही, त्यासाठी संततिनियमनाच्या पद्धतीच वापराव्या लागतील, हे बाबासाहेब सप्रमाण सिद्ध करतात. देशांतर-स्थलांतर, संपत्तीचे समान वाटप किंवा स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपोआप लोकसंख्या नियंत्रण होणार नाही. त्यासाठी संततिनियमन साधनांचा आधार घ्यावाच लागेल, हे बाबासाहेब सोदाहरण स्पष्ट करतात. चौथ्या बाळंतपणानंतर माता मृत्यू आणि बालमृत्यूदेखील अत्यंत वेगाने वाढतात, हे डॉ.मुन्रो यांच्या Maternal Mortality and Morbidity या पुस्तकातील वैद्यकीय वास्तवही ते सभागृहापुढे ठेवतात.

संततिनियमनामुळे आपल्या वंशाची, धर्माची लोकसंख्या कमी होऊन आपले बळ घटेल असा भयगंडही अनेक मूलतत्त्ववाद्यांच्या मनात घर करून बसला आहे. जननदर नव्हे तर ‘सर्व्हायवल रेट’ महत्त्वाचा आहे, हे आंबेडकर स्पष्ट करतात. वाढत्या जन्मदरासोबत बालमृत्यूदर व मातामृत्यूदरही वाढतो. महायुद्धामध्ये कमी जननदर असणाऱ्या राष्ट्रांनी अधिक जननदर असलेल्या राष्ट्रांवर कुरघोडी केली या इतिहासापासून धडा घेण्यास बाबासाहेब सांगतात. आधुनिक युद्धांना माणसे लागत नाहीत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्धे खेळली जातात आणि मुळात लोकसंख्या नियंत्रणामुळे दारिद्र्य कमी झाले की युद्धखोरी आपोआपच कमी होते. ऐश्वर्य, संपत्ती, प्रतिष्ठा, संस्कृती या गोष्टी लोकसंख्येवर नव्हे, तर गुणवत्तेवर अवलंबून असतात, हे सांगताना बाबासाहेब आपल्याकडील पारशी समाजाचे उदाहरण देतात.

लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व विशद करताना बाबासाहेबांनी अनेक देशांचे दाखले दिले आहेत. ‘एकतृतीयांश अमेरिकन नागरिकांना कमी प्रतीच्या अन्नावर गुजराण करावी लागते’ हे त्या वेळच्या अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट याचे उद्गार आंबेडकरांनी उद्धृत केले आहेत. आपल्यापेक्षा कमी जननदर असलेल्या अमेरिकन जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही, यापासून आपण बोध घ्यायला हवा. प्रत्येक विषयातील बाबासाहेबांचा सूक्ष्म अभ्यास ठायी ठायी दिसून येतो. मुंबईचे उदाहरण देत बाबासाहेब सांगतात, “ मुंबईला दर माणशी दररोज एक पिंट (सुमारे अर्धा लिटर) दुधाची गरज आहे पण प्रत्यक्षात अवघे सव्वा तोळा दूध मिळते.”

संततिनियमनावरील हा बिनसरकारी ठराव विधिमंडळात मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबई विधानसभेतील नेते होते. त्यांचे १४ सहकारीही विधानसभेवर होते. हा ठराव मतदानासाठी मांडताना बाबासाहेब म्हणाले होते, “ मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार आहे. याच प्रवेशद्वारातून संततिनियमनाची ही चळवळ या प्रांतात प्रवेशली आहे. या प्रांतात ही चळवळ फोफावायला हवी. आपले नाव अमर होईल अशी कृती करण्याची संधी व्यक्तीला क्वचितच लाभते. आपल्या प्रांतिक सरकारला ही संधी संततिनियमनाच्या चळवळीने दिली आहे. आमचे प्रांतिक सरकार ही संधी हातातून दवडणार नाही.” परंपरेचा पगडा असणाऱ्या विधिमंडळाला बाबासाहेबांची ही कालदर्शी नजर उमजली नाही आणि संततिनियमनाचा हा ठराव ५२ विरुद्ध १ एवढ्या प्रचंड फरकाने फेटाळला गेला पण त्यानंतर १३ वर्षांनी म्हणजे १९५१ साली भारत सरकारला बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेनेच जावे लागले आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजन धोरणाचा अवलंब करण्यात आला. अर्थात बाबासाहेबांना आपल्या जनतेच्या शहाणपणाबद्दल पुरेपूर खात्री होती आणि म्हणून ते १९३८ सालीच म्हणाले होते, “ आपले हित कशात आहे हे आपल्या देशातील अडाणी माणसालाही चांगले कळते. संततिनियमनाच्या साधनांच्या शोधाबद्दल व त्यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळताच ते त्याचा पुरेपूर वापर करतील यात मुळीच शंका नाही.”

इतिहासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांना आपण सारेच ओळखतो पण सार्वजानिक आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घ्यावयाची गरज आहे. फेब्रुवारी १९२७ मध्ये मुंबई विधिमंडळात दारू प्रश्नावर बोलताना भारतातील विविध प्रांतात दरडोई दारूवर होणाऱ्या खर्चाचे आकडेच उद्धृत केले आहेत आणि इतर प्रांताच्या तुलनेत मुंबई प्रांतात दारूवरील दरडोई खर्च अडीच पट आहे, हे सांगितले आहे. प्रत्यक्ष खपापेक्षा जास्त दारूचे परवाने का दिले जात आहेत, असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे. दारूचे व्यसन सर्वसामान्यांच्या बरबादीचे प्रमुख कारण आहे आणि म्हणूनच बाबासाहेब प्रांतिक सरकारला खडसावतात, “ जनतेची उन्नती हे सरकारचे उद्दिष्ट असले पाहिजे. तुम्ही त्यांना भिकारी बनवू नका.जनतेला भिकेस लावणारे सरकार अखेरीस स्वतःच भीक मागू लागते.” बाबासाहेबांचे हे जहाल शब्द सर्वसामान्यांविषयी असलेल्या कळवळ्यातून आले आहेत.

१९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केली. कामगारांच्या कामाचे तास व किमान वेतन ठरविण्यासोबतच आजारी रजा, वृद्धत्व पेन्शन, अपघात नुकसानभरपाई इतर आरोग्य सुविधा या साऱ्या गोष्टी पक्षाच्या ध्येयधोरणाच्या प्रमुख घटक होत्या. स्त्री कामगारांना गरोदरपणात हक्काची पगारी सुट्टी मिळावी, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चातही विश्रांती मिळावी आणि साऱ्याची आर्थिक जबाबदारी सरकारने घ्यावी, ही बाबासाहेबांची इच्छा होती. मजूरमंत्री असताना “मॅटर्निटी बेनेफिट ॲक्ट” लागू होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

सार्वजनिक आरोग्य हा खरे म्हणजे आंतरविद्याशाखीय समज असणाऱ्या प्रज्ञावंतांचा विषय. आणि म्हणूनच इतिहास,अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, राज्यशास्त्र यांसारख्या विषयात गती असणारे बाबासाहेब जेव्हा सार्वजनिक आरोग्यावर बोलू लागतात तेव्हा ते रूढार्थानेही समाजाचे खरेखुरे ‘डॉक्टर’ आहेत याची खात्री पटते. नाही तरी एका माणसाच्या दुखण्याचा इलाज कोणा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये होऊ शकत असेल पण समाजाच्या सामूहिक दुखण्यांसाठीची वाट सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनातूनच गवसत असते.
बाबासाहेबांबद्दल लिहिताना एका कवितेत मी म्हटले आहे-
“आवस माखल्या आभाळाची
लालतांबडी पहाट तू !
न आटणाऱ्या आडाचा
गुणगुणणारा रहाट तू !

कोरड पडलेल्या ओठांसाठी
चवदार तळ्याचे पाणी तू !
माणूस हरविलेल्या दुनियेसाठी
कबिराची वाणी तू !”
सार्वजनिक आरोग्यातील गळाबंद कोटांना आणि एसी सेमिनार रूममधील चर्चांना ही कबीर वाणी सर्वसामान्यांवरील प्रेमाचे ‘ढाई अक्षर’ पाजून प्रत्येक झोपडीच्या दारापर्यंत घेऊन जाईल, यात काय शंका ?
या कबीराची गरज आज कधी नव्हे एवढी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आहे.
dr.pradip.awate@gmail.com

Story img Loader